प्रा. डॉ. विनय सुपे
९४०३१८८७३६
मोठमोठ्या हुद्द्यांवरील मान्यवर मंडळी भविष्यातील शेतीविषयी (Future Agriculture) खूप आशादायक चित्र रेखाटत असतात. परंतु वस्तुस्थितीचा धांडोळा घेण्यास कोणी तयार नाही. भविष्यातील शेतीविषयी चार दशकांपासून मातीत (Soil) काम करणारा संशोधक म्हणून मी जे अनुभवतो आहे तेच तुम्हाला सांगणार आहे. काही चिंताजनक मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. याचा अर्थ भविष्याच्या शेतीबाबत मी निराशावादी आहे, असा होत नाही.
मात्र, काळ्या आईचे होणारे हाल आणि तिची मरणासन्न स्थिती मला सहन होत नाही. तिची दुर्दशा दिसत असताना उद्याच्या शेतीचे भवितव्य खूप चांगले असेल, असे मी छातीठोकपणे अजिबात बोलू शकत नाही. कारण मी एक शास्त्रज्ञ आहे आणि शेतकऱ्यांना आहे ती वस्तुस्थिती सांगणे हेच माझे कर्तव्य आहे. माझ्या मते शेती म्हणजे कष्टकरी शेतकरी आणि सूक्ष्मजीव, अशा दोन घटकांच्या कष्टातून तयार झालेला कारखाना आहे.
शेतकऱ्याने एकदा पेरले की त्याची सर्व काळजी पुढे केवळ सूक्ष्मजीव घेतात. जमिनीतील अन्न गोळा करणे आणि ते मुळांना देणे, त्यातून पिकाला वाढविणे ही कामे मातीमधले सूक्ष्म जिवाणू करीत असतात. भरपूर सूक्ष्मजीव संख्या असलेल्या जमिनीचाच सेंद्रिय कर्ब जास्त असतो आणि अशीच जमीन तुम्हाला अधिकाधिक सुपीक दिसेल. शेती कितीही आधुनिक केली आणि कितीही तुम्ही पैसा ओतला तरी सूक्ष्मजीव असतील तेथेच तुम्हाला शेती सुबत्ता आढळून येईल.
शास्त्रज्ञ म्हणून मी अनेक भागांमधील शेतांना तसेच फळबागांना भेटी देत असतो. त्यावेळी तेथील मातीचे नमुने घेऊन मी तपासत असतो. कारण या मातीमधील इतर कोणत्याही घटकांपेक्षा सूक्ष्मजिवांची संख्या समजून घेण्याची उत्सुकता मला असते. दुर्दैवाने काही भागांमधील मातीमध्ये मला सूक्ष्मजीव आढळूनच आलेले नाहीत. बहुतेक भागात सूक्ष्मजीवांचे प्रमाण साधारण आढळून आलेले आहे. असे व्हायला नको. कारण जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होणे म्हणजे एक प्रकारे तुम्ही मृत शेत सांभाळणे होय.
दुर्दैवाने काही भागांमध्ये कीटकनाशकांचा वापर थेट जमिनीत केला जाऊ लागला आहे. कोणताही शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ किंवा पुस्तक असे सांगत नाही, की तुम्ही कीटकनाशके मातीत टाकून वापरा. पण आता आपण सर्रासपणे मातीला विष पाजत आहोत. काही गावांमध्ये खुशाल क्लोरपायरिफॉस व इतर कीटकनाशकांचे ड्रेंचिंग म्हणून वापर करीत आहेत. त्यामुळे आपली जमीन लवकर मृतप्राय होईल.
पूर्वजांनी आपल्या जमिनीला काळ्या आईची उपमा उगाच दिलेली नाही. तुमच्या शेतजमिनीतील माती म्हणजे केवळ दगडाचा चुरा नव्हे. ही माती एक तर मृत, सुपीक किंवा कुपोषित अशा तीन स्थितीत आढळत असते. मातीची काळजी न घेणाऱ्या गावांना भविष्यात वाळवंटाचे रूप येईल. तुम्हाला आठवते का? पूर्वी पहिला पाऊस होताच मातीला गंध सुटायचा. आपण खूप आनंदून जात होतो. मातीचा हा गंध आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग बनला आहे. तो ग्रामीण कृषी साहित्यात देखील कायमचा घर करून बसला आहे.
मात्र आता पाऊस झाल्यानंतरही मातीला सुगंध येत नाही. कारण मातीला गंध मिळवून देणारे सूक्ष्मजीव कमी झाले आहेत. सूक्ष्मजीव हे खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीला वरदान आहेत. त्याचे संवर्धन करणारी धोरणं, कार्यक्रम किंवा योजना भविष्यात राबवाव्याच लागतील. सूक्ष्मजीवांची संख्या वाढल्याशिवाय कृषी व्यवस्थेला बळकटी येणार नाही. धोरणकर्त्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे.
कृषी क्षेत्रात खासगी व सरकारी यंत्रणांमध्ये सूक्ष्मजीवांवर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांना भविष्यात खूप महत्त्व प्राप्त होईल. कारण सूक्ष्मजीवांची काळजी घेतली नाही तर हवामान बदलाच्या संकटाशी अजिबात सामना करता येणार नाही. काही जण असे सांगतील, की मातीविना शेती म्हणजेच हायड्रोपोनिक शेतीचा पर्याय आहे. मात्र तो भक्कम तोडगा नाही. हायड्रोपोनिक्सला मर्यादा आहेत. त्याआधारे कोट्यवधी माणसांचे अन्नधान्य पिकू शकणार नाही. त्यामुळे सूक्ष्मजीवांना सांभाळणारी सेंद्रिय व रासायनिक अशी एकात्मिक शेतीच उद्याचे भवितव्य असेल.
(शब्दांकन ः मनोज कापडे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.