Sugarcane  Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Crop Management : कागलच्या अमोल खोत यांचे पाच एकरातील ऊसशेतीचे नियोजन

कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर (ता. कागल) येथील अमोल खोत यांनी संपूर्ण ५ एकरांत ऊस लागवड केली आहे. ऊस शेतीमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच नावीन्य जपले आहे.

Team Agrowon

शेतकरी : अमोल कुमार खोत

गाव : करनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर

ऊस लागवड : ५ एकर

कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर (ता. कागल) येथील अमोल खोत यांनी संपूर्ण ५ एकरांत ऊस लागवड केली आहे. ऊस शेतीमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच नावीन्य जपले आहे.

त्यांच्याकडे विविध क्षेत्रांमध्ये लावण, खोडवा आणि निडव्याचे पीक (Sugarcane Crop) आहे. सध्या २ एकरांत आडसाली, २ एकरांत खोडवा, तर १ एकरात निडवा उसाचे पीक आहे.

दहा वर्षांपूर्वी अमोल यांनी घरच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. त्या वेळी एकरी ४० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळत असे. साडेतीन फूट सरीत ऊस लागवड (Sugarcane Cultivation) केली जायची. अमोलरावांनी शेतीमध्ये लक्ष घातल्यानंतर ऊस लागवड पद्धतीत बदल करण्याचे ठरविले.

साडेतीन फुटांपासून आता ते साडेसात फुटी पट्ट्यापर्यंत आले आहेत. त्यांच्याकडे मुरमाड व काळी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी आहेत.

त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार किती फूट सरी सोडायची याचा निर्णय घेतला जातो. आजपर्यंत त्यांनी उसाची रोप लागण कमी-जास्त करून शेतीत विविध प्रयोग केले आहेत.

सरीमध्ये ठेवले जास्त अंतर :

साडेसात फुटी सरीमध्ये दोन रोपांतील अंतर दीड फूट इतके ठेवले जाते. सुटसुटीत अंतरामुळे ऊस रोपांची वाढ चांगली होते. याचा सकारात्मक परिणाम उसाचे उत्पादन वाढण्यावर होतो, असा त्यांचा अनुभव आहे.

विशेष करून मुरमाड जमिनीत जास्त अंतर, तर काळ्या जमिनीत थोडे कमी अंतर राखले जाते. त्यामुळे पाणी देण्याच्या पद्धतीत सुलभपणा येत असल्याने उसाची वाढ चांगली होते, असे अमोलराव सांगतात.

बेणे निवड व सिंचन नियोजन :

एकूण ऊस उत्पादनासाठी आणि उसाच्या वाढीसाठी दर्जेदार बेणे निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. मागील अनेक वर्षांपासून को ८६०३२ हे वाण वापरतात.

सिंचनासाठी नदी, विहीर व कूपनलिकेतील पाण्याचा वापर केला जातो. शेतीमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचनावर भर दिला जातो.

मात्र आवश्यकतेनुसार पिकाची पाण्याची गरज आणि उष्ण हवामानाचा अंदाज घेऊन महिन्यातून एखादे पाणी पाटाने दिले जाते. इतर वेळी ठिबकने दररोज पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. पाटाने पाणी देण्याचा अतिरेक टाळला जातो.

जमीन सुपीकतेला प्राधान्य

उच्चांकी ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता ही महत्त्वाची बाब आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन श्री. खोत हे मातीच्या सुपीकतेला जास्त महत्त्व देतात. गेल्या १५ वर्षांपासून त्यांनी ऊस पिकामधील शिल्लक राहिलेला पाला कधीही जाळला नाही. त्यामुळे जमीन कसदार झाली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब १ ते १.१०, तर सामू ६.५ ते ७ इतका आहे.

खोडवा किंवा निडवा काढल्यानंतर सबसॉयलर मारून जमीन उन्हामध्ये तापवली जाते. रोटावेटर मारून लहान सऱ्या सोडून त्यात ताग लागवड केली जाते. ताग पीक लागवडीनंतर साधारण ५० दिवसांनी जमिनीत गाडले जाते. त्यानंतर ऊस लागवड केली जाते. लावणीचा ऊस तुटल्यानंतर पाण्याची कुट्टी करून प्रत्येक सरीत पाला दाबून घेतला जातो.

कुदळीच्या साह्याने खोडवी जमिनीबरोबर मारली जातात. पाल्यावर सिंगल सुपर फॉस्फेट ४ पोती व युरिया दोन पोती एकरी असे मिश्रण करून खत दिले जाते. बैलाच्या साह्याने बगला मारण्यात येतात. एका बाजूला एनपीके आणि दुसऱ्या बाजूला दुय्यम अन्नद्रव्ये दिली जातात.

निंबोळी पेंड आणि शेणखतातून मिश्रण दिले जाते. त्यानंतर पाट पाणी सोडले जाते. त्यामुळे माती व दिलेल्या खताचे मिश्रण होऊन पाला चांगला कुजतो, असा त्यांचा आहे.

साठ दिवसांना पॉवर टिलर रिव्हर्स रोटर मारली जाते. पाला न पेटवता सातत्याने जमिनीला पोषक घटक कसे मिळतील, याकडे लक्ष दिल्याने उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो. पीकफेरपालटीसाठी सोयाबीन पिकाची लागवड केली जाते.

निडव्यापर्यंत उत्पादन

अमोल खोत यांनी निडव्यापर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने निडव्यापर्यंत ऊस उत्पादन ते घेतात. खोडवा व निडव्याला लावणीच्या तुलनेत खर्च कमी येत असल्याने उत्पादन चांगले मिळते.

जमीन सुपीक असल्याने खोडवा आणि निडवा दोन्हीदेखील चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊन जातात. लावणीचे उत्पादन साधारण ९० ते ९५ टन, खोडव्याचे उत्पादन ७० ते ७५ टन, तर निडव्याचे उत्पादन ५० ते ५५ टन इतके आहे. जमिनीची सुपीकता हेच या उत्पादन वाढीचे मुख्य कारण ठरले असल्याचे अमोलराव सांगतात.

नियोजनातील बाबी

१) आडसाली लागवडीत ड्रीपमधून अमोनिअम सल्फेट, पोटॅश या विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात.

२) खोडवा पीक ५ महिने आणि ३ महिने वयाचे आहे. त्यामध्ये बुडक्यातील स्वच्छता, विरळणी वाळलेला पाला आणि पाचट काढणी इत्यादी कामे केली आहेत.

३) दीड महिन्यापूर्वी भरणीवेळी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या आहेत. याशिवाय कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारण्या घेत आहे. निडवा उसात रासायनिक खतांची आळवणी केली आहे.

४) ठिबक सिंचन पद्धती असली तरी आवश्यकतेनुसार पाटाने पाणी देणे सुरू आहे. सध्या तापमानात वाढ होत असल्याने पिकाची पाण्याची गरज वाढते. जमिनीच्या मगदुरानुसार पिकाची पाण्याची गरज पाहून सिंचनावर भर दिला जातो.

अमोल खोत, ८८०५५९६३६९, (शब्‍दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT