Animal Care Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : जनावरांतील घातक परजीवी : गोचीड

गोचीड निर्मूलनासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणे गरजेचे आहे जेणेकरून गोचीड तापपासून जनावरांचे संरक्षण होईल. गोचीड नियंत्रणासाठी स्वस्त व सुरक्षित औषधी वनस्पतीचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो.

टीम ॲग्रोवन

डॉ. पी. पी. घोरपडे , डॉ. आर. बी. अंबादे

सर्वच जनावरांमध्ये गोचीडांचा प्रादुर्भाव आढळून येतो. गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील परजीवी (Gochide Parasite) आहे. तो बाह्य परजीवी असून रक्तपिसासू (Blood Sucking Parasite) आहे. तो प्राण्यांच्या अंगावर राहतो. भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचीड जाती आढळून येतात, त्यापैकी बुफिलस, रायपीसेफलस मायक्रोप्लस, अमलीओमा, हिम्याफैशालीस कॉर्निस इत्यादी गोचीड जनावरांतील आजाराच्या दृष्टीने जास्त हानिकारक आहेत.

गोचिडांचा प्रादुर्भाव :

१) एक गोचीड सुमारे एक ते दोन मिलिलिटर रक्त पितो, त्याचा कालावधी सुमारे ७ ते १४ दिवस राहू शकतो. मोठ्या जनावराच्या शरीरावर अशा अनेक गोचीड असतात. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचिडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा तयार होतात, त्वचा उघडी झाल्यामुळे त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्यामुळे टीक पॅरालिसिस हा आजार होतो.

२) जनावरांचे रक्तपेशीचे आजार, जसे की बबेसिओसिस, आनाप्लासमोसिस, थायलेरियोसिस व इतर वर्गांतील आजार प्राण्यांना गोचिडामुळे होतात. गोचीडद्वारे या जंतूंचा फैलाव जनावरांमध्ये होतो.

३) गोठ्यात जनावरांच्या अंगावर असणारे गोचीड त्यांच्या शरीरातील तापाला कारणीभूत ठरतात. म्हणून गोचीड ताप हे एक लक्षण आहे.

४) गोचीडजन्य आजारामुळे जनावरे अशक्त होऊन दगावतात, त्यांचे दूध व मांस उत्पादन घटते. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात जनावरांच्या शरीरावर गोचीड खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. उष्ण व दमट हवामान व इतर आजारांचा प्रादुर्भाव इत्यादी गोष्टी आजार निर्मितीस मदत करतात.

५) विदेशी जनावरांची आजारास बळी पडण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते. सामान्यतः गाय, बैल यांच्या तुलनेत म्हशी प्रतिरोधक असतात. सततच्या स्थलांतरामुळे जनावराला थकवा जाणवतो. त्यामुळे सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.

६) संकरित वासरामध्ये याचे प्रमाण अधिक असते.

लक्षणे :

१) जनावरांमध्ये माश्‍या, गोचीड या प्रकारांतील बाह्यपरपजीवी समस्या मोठ्या प्रमाणात आढळते.

२) बाह्य परजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीरावर खाज येणे, केस गळणे, जनावर अस्वस्थ होणे, त्यांचे वजन कमी होणे, दूध उत्पादनात घट होणे इत्यादी.

३) जनावराच्या शरीराचे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस (१०२ ते १०६ अंश फॅरानाइट)पर्यंत वाढते.

४) नाक, डोळ्यांतून पाणी वाहते. हृदयाचे ठोके जलद गतीने होणे इत्यादी लक्षणे दिसतात. शरीरातील लसिका ग्रंथी आकारमानाने वाढतात, रक्त मिश्रित विष्ठा तयार होणे.

५) जनावरांचा खुराक खूप कमी होतो, जनावर रवंथ करणे सोडून देतात आणि नाडीचे ठोके जलद होतात. जनावर अशक्त होत जाते.

६) जनावरांना श्‍वसनाचा त्रास होतो आणि श्‍वसनाचा वेग जलद होतो आणि शेवटच्या काळात नाकावाटे फेस वाहतो.

गोचीडजन्य आजारामुळे शरीरातील जैवरासायनिक बदल :

१) अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे, की जनावराच्या सीरम बायोकेमिकल विश्‍लेषणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गोचीड ताप झालेल्या जनावरांमध्ये एकूण प्रथिने, अल्ब्युमिन आणि

अल्ब्युमिन - ग्लोब्युलिनचे प्रमाण कमी होते. परंतु ग्लोब्युलिनच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ होते.

२) निरोगी प्राण्यांच्या तुलनेत गोचीड ताप झालेल्या जनावरांत रक्तातील ए.एल.टी., ए.एस.टी., युरिया, बीयूएन, क्रिएटिनिनमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.

३) सीरम खनिज विश्‍लेषणात कॅल्शिअम, क्लोराइड्स, मॅग्नेशिअम आणि लोह किंवा हिमोग्लोबिनमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे.

गोचीड नियंत्रणासाठी वनस्पतींचा वापर :

आजारी जनावराची पशुवैदकाच्या मदतीने प्रतिजैविके वापरून त्वरित उपचार करावेत. बाह्य परजीवीच्या नियंत्रणासाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ही औषधे महाग आणि काही वेळेस विषारी असल्यामुळे त्यापासून जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन स्वस्त व सुरक्षित अशा औषधी वनस्पतीचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो.

सीताफळ:

- पाने, बी हे चांगले कीटकनाशक आहेत. पाने सावलीत वाढवून याची पावडर करावी. बियांची बारीक पावडर करावी.

- ही पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी. यामुळे बाह्य परजीवी गोचीड लवकर मरण पावतात.

बावची :

- वनस्पतीचे तेल कीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे. यामुळे हे कीटक मरतात.

कण्हेर :

- फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती आहे. हिची पाने अथवा मूळ परोपजीवींच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहेत. याचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा.

निलगिरी :

- निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. काही बाह्य परोपजीवी मरतात.

कडुलिंब :

- कडुलिंबाचे तेल हे बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावराच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परजीवीची भूक नष्ट होते. त्यामुळे ते मरतात.

करंज :

- करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत, या तेलाचा वापर जनावराच्या शरीरावर लावण्याकरिता करावा. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.

जनावरांच्या अंगावरील गोचीड नियंत्रणासाठी वारंवार रासायनिक औषधाचा वापर होत असल्याने बरेचसे गोचीड त्यास प्रतिसाद देत नाहीत. रासायनिक औषधांचा वापर हा प्रभावी मार्ग असला तरी सुरक्षितता न बाळगल्यामुळे या औषधामुळे जनावरे तसेच पशुपालकांना विषबाधा होण्याची शक्यता असते. रासायनिक औषधांचा वापर ही पद्धत खर्चिक देखील आहे. त्यामुळे कमी खर्चाची आणि सुरक्षित पद्धतीने गोठ्यातील गोचीड नियंत्रण पद्धत वापरणे आवश्यक आहे.

संपर्क ः डॉ. आर. बी. अंबादे, ८३५५९४२५४६ / ९१६७६८२१३४

(सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT