Caravan Dog Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : शेती, जनावरांच्या राखणीसाठी शेतकरी कारवान कुत्राच का निवडतात?

प्रकृतिमान, शरीरयष्टी पाहता कारवान श्‍वान खूप चपळ, वेगवान असतात. या श्‍वानांची प्रामुख्याने राखणदारीसाठी निवड केली जाते.

Team Agrowon

डॉ. जी. आर. चन्ना, डॉ. एस. एम. देवळे, डॉ. व्ही. व्ही. कऱ्हाळे

महाराष्ट्रामध्ये साधारणतः कारवान (Caravan Dog) आणि पश्मी जातीचे श्‍वान (Dog) सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात. कारवान हा राखण आणि शिकारीसाठी खूप महत्त्वाचा श्‍वान आहे. प्रकृतिमान, शरीरयष्टी पाहता हे श्‍वान खूप चपळ, वेगवान व उत्साही असतात.

बहुतांश शेतकरी या श्‍वानांची घर, शेत आणि जनावरांच्या राखणदारीसाठी निवड करतात. या श्‍वानांना परदेशी जातींपेक्षा खाद्य व इतर सोयीसाठी लागणारा खर्च अत्यंत कमी असतो. बिकट परिस्थितीत देखील चांगल्या प्रकारे जगू शकतात.

राखणीसाठी उपयुक्त ः

१) श्‍वान प्रामुख्याने राखण तसेच शिकार करण्यासाठी पाळतात.विशेषतः मेंढपाळ समुदाय मेंढ्या, शेळ्यांच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी या श्‍वानाचे संगोपन करतात. बहुतेक जण रात्रीच्या वेळी या श्‍वानांना घर आणि शेतीच्या रक्षणासाठी मोकळे सोडतात.

२) श्‍वान मालकाच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतात. काही जण या श्‍वानांचे संगोपन करून पैदास देखील करतात. या जातीला संगोपनासाठी चांगली मागणी आहे.

३) महाराष्ट्रात बऱ्याच यात्रेच्या ठिकाणी श्‍वानांच्या धावण्याच्या शर्यतीत कारवान जातीचे श्‍वान निवडले जातात.

आहार आणि आरोग्य व्यवस्थापन ः

१) या जातीला कोणत्याही विशिष्ट आहाराची आवश्यकता नसते. स्वयंपाकगृहात बनवलेला रोजचा आहार त्यांना चालतो. आहार उच्च-गुणवत्तेचा असेल तर त्यांचे आरोग्य सुधारते.

२) आहारामुळे उद्‌भवणारी कोणतीही आरोग्य समस्या नाही. श्‍वानांना घरी बनवलेली भाकरी, पोळी, भातासोबत डाळ किंवा मांस मिसळून द्यावे. बाजारातील विकतचे श्‍वान खाद्य यांना देण्याची आवश्यकता नाही.

३) श्‍वानांना मोकळे ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांना व्यायाम मिळतो, ते सक्रिय राहतात. त्यासाठी कुंपण घातलेले अंगण अत्यंत उपयुक्त असते. आठवड्यातून दोनदा ब्रश करावे. नखे नियमितपणे कापावीत.

४) श्‍वानांना जास्त काळजीची आवश्यकता नसते, ते स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे चांगले काम करतात.

५) श्‍वान अत्यंत निरोगी असतात. कोणत्याही आनुवंशिक आजारास बळी पडत नाहीत.

६) कोणत्याही परिस्थितीत ही जात चांगल्या प्रकारे तग धरते. रेबीज आजाराच्या नियंत्रणासाठी वर्षातून एकदा लसीकरण आवश्यक आहे.

श्‍वानाचा स्वभाव आणि बुद्धिमत्ता ः

१) अत्यंत हुशार, चपळ शिकारी. मालकाशिवाय इतर कोणीही स्पर्श करणे किंवा हाताळणे त्यांना आवडत नाही.

२) मालकाच्या कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान. जर त्यांना इतर श्‍वानांसोबत वाढवले गेले तरी ते त्यांच्यासोबत मिसळतात.

३) स्वभावाने सौम्य, घरातील मुलांशी मैत्रीने वागतात. घरातील सर्वांशी आज्ञाधारक, प्रामाणिक असतात.

४) मालकांची श्‍वानासोबत वर्तणूक सौम्य असावी. त्यांचे श्‍वानांवर नियंत्रण असावे.

प्रशिक्षण आवश्यक ः

१) श्‍वानांना प्रशिक्षित करणे सोपे आहे, परंतु त्यासाठी प्रशिक्षकाचा स्वभाव शांत व सौम्य असावा. कारण या श्‍वानांना संवेदनशील म्हणून ओळखले जाते. विशेषतः कठीण प्रशिक्षण देत असताना, जर त्यांना कठोरपणे फटकारले गेले तर ते आक्रमक होऊ शकतात.

२) कठोर प्रशिक्षण पद्धती श्‍वानाला अविश्‍वासू बनवू शकते. ते त्यांच्या कुटुंबासाठी खूप आज्ञाधारक असतात, पण अनोळखी लोकांचे ऐकत नाहीत.

श्‍वानाचा इतिहास ः

१) कारवानचे वंशज हे साळुंकी जातीचे श्‍वान आहेत. ही जात इजिप्त, अरबस्तान, पॅलेस्टाइन, सीरिया, मेसोपोटेमिया, अनातोलिया आणि पर्शिया या भागातील आहेत.

२) इतिहासातील नोंदीनुसार पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल सम्राटाने अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात बोलावलेल्या लष्कराच्या ताफ्यासोबत (कारवाँ) या जातीचे श्‍वान भारतात आले. त्यामुळे यांना ‘कारवान’ असे नाव मिळाले.

३) सध्याची कारवान प्रजाती ही निवडक पैदास आणि आपल्या भागातील कडक, उष्ण हवामानानुसार विकसित झाली आहे. हे श्‍वान थंडी, उष्णता आणि पावसाळ्यातील आर्द्रता यांचा सामना करण्यास सक्षम आहेत.

४) अजूनही कारवान ही जात एक भारतीय श्‍वान जात म्हणून राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्युरो येथे नोंद झालेली नाही. कारवान जातीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे शारीरिक गुणधर्माचा अभ्यास करण्यात आला आहे.

कारवान जातीची वैशिष्ट्ये ः

१) नराचे सरासरी वजन १९ ते २० किलो, उंची ६९ ते ७० सेंमी आणि लांबी ५६ ते ५८ सेंमी.

२) मादीचे सरासरी वजन १७ ते १८ किलो, उंची ६७ ते ६८ सेंमी आणि लांबी ५४ ते ५६ सेंमी.

३) सर्व वयोगटातील मादी श्‍वानांपेक्षा नर श्‍वानांचे वजन, उंची, आणि लांबी जास्त असते.

४) भारतातील इतर श्‍वानांच्या जाती, जसे की मुधोळ हाउंड, राजपालायम आणि चिप्पिपराई यांच्यापेक्षा कारवान श्‍वानाचे वजन कमी, उंची अधिक आहे. कमी वजन, जास्त उंची आणि लांबी असल्यामुळे कारवान अतिशय चपळ, वेगवान असतात.

४) डोके लांब आणि अरुंद असून ते दोन्ही कानांमध्ये अधिक रुंद असून, नाकाकडे निमुळते असते. जबडे लांब आणि शक्तिशाली असतात. नाक मोठे असून ते काळे किंवा लालसर तपकिरी रंगाचे असते.

५) कान मध्यम आकाराचे असून, ते कवटीच्या जवळ लटकलेले असतात. डोळे मोठे आणि आकाराने अंडाकृती असून, गडद ते अंबर रंगाचे असतात. नजर तीक्ष्ण व डोळ्याचे भाव भेदक असतात. मान लांब आणि मजबूत असते.

६) पुढचे पाय लांब, सरळ आणि मजबूत असतात. पायाचा पंज्या तुलनेने मोठ्या आकाराचा असतो. पाठीचा भाग लांब, रुंद आणि कंबरेवर थोडेसे वळलेले असतात. कंबर निमुळती व खोल असते.

७) मजबूत फासळ्यांसह छाती भक्कम आणि खोल असते. पोट रुंद असून आत गुंफलेले असते.

८) मागील पाय अधिक जाड, चांगले मजबूत आणि पिळदार असतात. शेपटी मुळाशी मजबूत असून जास्त लांब नसते, नैसर्गिक वळण असते. ती कधीही पाठीवर वळलेली नसते.

९) अंगावरील केस लहान गुळगुळीत किंवा रेशमी असतात.

१०) दुधाळ पांढरा, बदामी, राखाडी, कसऱ्या रेघांचा, तपकिरी व काळा रंग.

संपर्क ः १) डॉ. जी. आर. चन्ना, ७७१०८३३३०९ (विभाग प्रमुख, पशू उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

२) डॉ. एस. एम. देवळे, ८३२९१५१७२६, डॉ. व्ही. व्ही. कऱ्हाळे, ८८०६३०२३११ (पशू उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT