Cow hug day withdraws: पशु कल्याण मंडळाचा 'काऊ हग डे' फसला; आता 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करायचा का?

'काऊ हग डे' साजरा करायचा म्हणजे काय तर १४ फेब्रुवारीला तुम्ही प्रेयसी प्रियकराला जशी मिठी माराल तशी गाईला मिठी मारा. जेणेकरून हिंदू संस्कृतीचं रक्षण होईल.
Cow Hug day
Cow Hug dayAgrowon

धार्मिक अजेंडा रेटण्याच्या नादात केंद्रीय पशु कल्याण मंडळ (Animal Welfare Board) चांगलंच तोंडघशी पडलंय. आपली संस्कृती आपला धर्म ही गुळगुळीत वाक्य जनतेच्या गळी उतरवण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलाय.

त्यातूनच कोरोनावर मात करायची गोमूत्र प्या, कॅन्सर बरा करायचा गाईच्या शेणाचा लेप अंगाला फासा अशा अवैज्ञानिक गोष्टी हिंदुत्ववादी गटाकडून (Hindutva Group) केल्या जातात.

आताचा मुद्दा आहे तो 'काऊ हग डे'च्या निमित्ताने केंद्रीय पशु कल्याण मंडळाच्या फजितीचा! (Cow hug day withdraws)

केंद्रीय पशु कल्याण मंडळाचे सचिव एस.के.दत्ता (S. K Dutta) यांनी ८ फेब्रुवारीला मोठ्या दिमाखात एक आवाहन जारी केलं. त्यात असं म्हंटल होतं की, १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे (valentine Day) साजरा करण्याऐवजी 'काऊ हग डे' (cow hug day) म्हणून साजरा करावा.

'काऊ हग डे' साजरा करायचा म्हणजे काय तर १४ फेब्रुवारीला तुम्ही प्रेयसी प्रियकराला जशी मिठी माराल तशी गाईला मिठी मारा. जेणेकरून हिंदू संस्कृतीचं रक्षण होईल.

गायीला मिठी मारल्याने 'भावनिक समृद्धी' येईल आणि 'वैयक्तिक आणि सामूहिक आनंद' वाढेल असा दावाही मंडळाने त्याच आवाहनात केलेला. पुढं "गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

गाय जीवन टिकवते आणि पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचं प्रतिनिधित्व करते. ती कामधेनू आणि गौमाता या नावानं ओळखली जाते. कारण ती मातेसारखी पोषण करणारी, सर्वांची दाता, मानवतेला संपत्ती प्रदान करणारी आहे.

Cow Hug Day
Cow Hug DaySakal

काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पाश्चात्य सभ्यतेच्या चकचकीतपणानं आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे, असंही ८ फेब्रुवारीच्या अधिकृत आवाहनात म्हटले होते.

एवढं आवाहन करून पशु कल्याण मंडळ थांबलं नाहीतर 'काऊ हग डे' दिवस साजरा करण्याची नियमावलीही मंडळाकडून जाहीर करण्यात आली होती.

आता इतकं रान हाणल्यावर त्याची चर्चाही झाली. सोशल मीडियावर त्यावर बरीच टीका झाली. भाजपच्या रथी महारथीनं या आवाहनाला तात्काळ समर्थन दिलं.

त्यामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह, उत्तरप्रदेश मंत्री धर्मपाल सिंह आदींनी तर जोरदार समर्थन केलं. तर सामनातून याच विषयावर अग्रलेख लिहून तिरकस भाष्य करण्यात आलं.

त्यामुळे विषय बघता बघता सर्वत्र चर्चेत आला. जसं यावर चर्चा सुरू झाली, तसं अवघ्या ४८ तासात पशु कल्याण मंडळानं आपलं आवाहन मागं घेत असल्याचं पत्रक १० फेब्रुवारीला जारी केलं.

आवाहन मागं घेतल्यानंतरही अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी तर 'काऊ हग डे'ची संकल्पना कुणाच्या डोक्यातून उगवली होती असा टोला हाणला. 

Cow Hug day
Chat GPT : 'चॅट जीपीटी' आहे तरी काय? शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का?

मुळात केंद्रीय पशु कल्याण मंडळाला गाईचं महत्त्व सांगण्यात काडीचा रस नव्हता, मुद्दा होता तो पाश्चात्य संस्कृतीची भीती निर्माण करून 'हिंदू खतरेमे हैं'ची ओरड करण्याचा.  व्हॅलेंटाईन डे जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

त्याच्याशी निगडित बऱ्याच कथा रोममध्ये आहेत. मुळात व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानं काही संस्कृती धुळीस मिसळत नाही. परंतु हिंदुत्ववादी केंद्र सरकारला मात्र इतर धर्मांचा द्वेष काही केल्या स्वस्थ बसू देत नाही.

त्यामुळेच अशा नापीक कल्पना रेटल्या जातात. अर्थात धार्मिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरण करून जनतेच्या मनात सतत द्वेष पेरायची सवय भाजपला लागलेली आहेच. त्याशिवाय त्यांना निवडणूकीय मताचा जोगवा मिळत नाही. म्हणूनच कायम 'हिंदू खतरेमे हैं' ओरड भाजपकडून केली जाते.

जाणीवपूर्वक व्हॅलेंटाईन डे दिवशीच 'काऊ हग डे" साजरा करण्याचं आवाहन करणंही याच अजेंड्याचा भागय.

पशु कल्याण मंडळाला गाईबद्दल इतकं प्रेम असत तर इतर दिवशीही तो साजरा करण्याचं आवाहन करता आलं असतं. पण पाश्चात्य संस्कृतीची भीती इतर दिवशी दाखवता आली नसती याची जाणीवही या आवाहनामागे होतीच.

शेवटी आपलं पितळ उघडं पडण्याच्या मार्गावरय अशी चुणूक लागताच पशु कल्याण मंडळानं आपलं आवाहन मागे घेतलं. अर्थात तेही बरंच झालं. अन्यथा मिठी मारायला जाऊन गाईच्या लाथा कुणी खायच्या असत्या. असो. 

आता ज्या गोमातेचा पशु कल्याण मंडळाला इतका पुळका आलाय, त्या गोमातेचे लंपीच्या काळात कसे हाल झाले, हे शेतकऱ्यांना चांगलंच माहित्ये. लसीकरणाच्या अभावी तडफडून गाई मरत असतानाही हिंदुत्ववादी केंद्र सरकार मात्र शब्दांचे बुडबुडे करण्यात दंग होतं.

लंपी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडत होती. त्याचा सर्वाधिक फटकाही पशुपालकांना बसला. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये देशभरात २९ लाख गाईंना लंपीची लागण झाली होती.

तर १ लाख ५५ हजार गाईंचा लंपीने मृत्यू झाल्याची माहिती राज्यसभेत केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने दिलीय. 

आता ज्या गाईला मिठी मारायचं   सांगितलं जातं. त्याच गाईकडे लंपीच्या काळात मात्र केंद्रीय यंत्रणा कानाडोळा करत होती.

थोडक्यात काय तर जनतेच्या मनात धार्मिक द्वेष निर्माण करण्याची संधी गाईच्या आडून साधू पाहणाऱ्या पशु कल्याण मंडळाची झालेली फजिती भविष्यात सरकारी यंत्रणेला असे अडाणी आवाहन करताना आठवत राहील, एवढीच आशाय.

आणि तरीही पशु कल्याण मंडळाला गाईवर इतकं प्रेम असेल तर देशातील चारा टंचाई, गाईचं लसीकरण, गाईच्या देशी वाणांचं जतन आणि संशोधन आदी महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं.

म्हणजे गोमाता 'वैयक्तिक आणि सामूहिक आनंद' देत राहील. आणि माणसं माणसांना 'व्हॅलेंटाईन डे'ला मोकळेपणानं मिठी मारू शकतील, नाही का!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com