प्रताप चिपळूणकर
Soil Health : कोणतेही नवीन तंत्र आणताना दीर्घ मुदतीने त्याच्या परिणामांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शून्य मशागत तंत्राने जमिनीच्या आकारमानाप्रमाणे एकदाच रचना अशी करा, की एक पीक घेतल्यानंतर त्या पिकाचे जमिनी खालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत म्हणून वापरता येईल.
जमिनीत स्थिर आणि अस्थिर असे दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. जमिनीवरील कोवळ्या भागातून अस्थिर आणि जमिनीखालील भागापासून स्थिर सेंद्रिय कर्ब तयार होतो. आपण आजपर्यंत फक्त अस्थिर (शेणखत, कंपोस्ट) गटातील सेंद्रिय खत देत आलो आहोत. लवकर कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर तर कुजण्यास जड असणाऱ्या काष्ठमय पदार्थांपासून स्थिर गटातील सेंद्रिय खत तयार होते. सेंद्रिय खतात स्थिर आणि अस्थिर असे काही प्रकार असतात, हे आम्हाला माहीतच नाही.
शेतकऱ्यांची एक अशी समजूत झालेली आहे, की एकदा भरपूर सेंद्रिय खत जमिनीत की, २ ते ३ वर्षे परत मिसळण्याची गरज नाही. आपण जे अस्थिर गटातील सेंद्रिय खत वापरतो ते चार महिन्याच्या एकच हंगामी पिकाअखेर संपून जाते. यामुळे प्रत्येक नवीन पीक पेरणीआधी भरपूर सेंद्रिय खत मिसळले पाहिजे, जे सध्याच्या परिस्थितीत कधीच शक्य नाही. इथे तंत्र पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे. भू-सूक्ष्मजीवशास्र काय सांगते? याचा विचार करणे आवश्यक आहे.
शेणखत, कंपोस्ट वापरण्याच्या मर्यादा ः
१) गरजे इतके उपलब्ध नाही.
२) मागणी जास्त, पुरवठा कमी असल्याने महाग.
३) व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळाची गरज, ज्याची आज टंचाई आहे.
४) दोन, चार प्रकारच्या चाऱ्यातून निर्मिती. यामुळे कच्च्या घटकांत जैव वैविध्य फारसे नाही.
५) जागेलाच कुजविणे आणि दीर्घकाळ कुजविणे या दोनही भू-सूक्ष्मजीव शास्रीय तत्त्वाचा अवलंब नाही.
६) कुजण्यास जड असणारे पदार्थ वापरले जात नाहीत. यामुळे बुरशीची (कुजविणाऱ्या) जमिनीत वाढण्यास वाव नाही.
७) कुजण्याच्या क्रियेतील उपपदार्थ सेंद्रिय आम्ल, पॉलिसॅकराइडनामक डिंकासारखा पदार्थ, पिकाची वाढ वृद्धिंगत करणारी संजीवके यांना जमीन, पीक मुकते. सेंद्रिय आम्ल, सामू योग्य पातळीत राखला जातो. डिंकासारखा पदार्थामुळे जमिनीची कण रचना व निचरा शक्ती सुधारते.
८) सेंद्रिय पदार्थ कुजविण्याचे काम बाहेर झाल्याने कुजविणारी जिवाणूसृष्टी जी जमिनीला सुपीकता देते, ती वाढण्यास वाव नाही. यामुळे जैविक सुपीकता हा प्रकार नाही.
सेंद्रिय खतातील घटकांचा अभ्यास ः
पेंडी अतिशय महाग असतात. त्या भरखताला पर्याय होऊ शकत नाहीत. लेंडी खत शेळी, मेंढीपासून तयार होते. शेळी, मेंढी काय खाते याचा बारकाईने अभ्यास केला तर नुकतेच उगवायला लागलेले कोवळे पान हे खत काय प्रतीचे असेल हे सांगायला नको. ताग, धैंचा वगैरे द्विदल कडधान्य वर्गीय वनस्पतीचे हिरवळीचे खत तयार करावयास सांगतात. कडधान्यवर्गीय वनस्पतीच्या काडात नत्राचे प्रमाण जास्त असल्याने ते लवकर कुजते. तयार झालेले खत लवकर संपून जाते. ते पहिल्या कळीवर गाडायच्यावेळी त्यात ८० ते ८५ टक्के पाणी असते. एक टन ताग गाडल्यास १५० किलो शुष्क सेंद्रिय पदार्थ गाडला जातो.
तो पुढे कुजून त्याचे ४० ते ५० किलो खत होते. असे खत पुढे महिन्याभरात संपूनही जाते. प्रचंड महाग बी, टोकणणे, कापणे, गाडणे याचा अर्थशास्त्रीय अभ्यास करावा. गांडूळ खत निर्मितीसाठी देखील गुंतवणूक करावी लागते. कच्चा पदार्थ जितका बारीक केला जाईल, तितकी त्याची उपयुक्तता कमी होते. गाई, म्हशी रवंथातून वैरणीचे अति लहान तुकडे करतात. जर यापासून गांडूळ खत तयार केले, तर गांडुळाच्या पोटात ते आणखी बारीक दळले जाते. या संबंधी अभ्यास शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. कच्या शेणखताचाही वाहतूक खर्च वाढतो आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्रज्ञांनी आता एकदल गवत वर्गीय वनस्पतीचे खत करा असा संशोधनाचा नवीन निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे. एकदल वनस्पतीच्या काडात नत्राचे प्रमाण कमी
असल्याने त्याचे खत द्विदल कडधान्य वर्गीय खतापेक्षा जास्त चांगले. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोध वाचला गेला. परंतु त्यानंतर त्यावर कोठेच वाच्यता नाही. काही जण अनेक प्रकारच्या बी एकत्र करून त्याचे हिरवळीचे खत करावयास सांगतात.
या सर्व बिया मानवी आहारातील महत्त्वाचा घटक आहेत. यास नवधान्य असेही म्हणतात. येत्या काळात खूप लोकांनी खतासाठी बे बियाणे वापरण्यास सुरुवात केली, तर अन्नधान्य उपलब्धता याचाही विचार करावा लागेल. कोणतेही नवीन तंत्र आणताना दीर्घ मुदतीने त्याच्या परिणामांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. आता बाजारात सेंद्रिय खताची पोती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे सेंद्रिय खताची उपलब्धता हा विषय संपला आहे. परंतु त्यासाठी पैशाची उपलब्धता कशी करावयाची हा कळीचा मुद्दा आहे.
विना नांगरणी शेती तंत्राचा वापर ः
१) सेंद्रिय खत उपलब्धता हा शेतीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचा वापर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना गरजे इतका करता आला पाहिजे. पैशाचा मुद्दा अजिबात आड येता कामा नये. यासाठी अगदी फुकटात हे काम झाले, तरच सर्व सामान्य शेतकरी ते वापरू शकेल. शून्य मशागत तंत्राने शेतीतील सेंद्रिय कर्बाची कमतरता हा मुद्दा मुळातूनच संपून टाकला आहे.
२) कोकणामध्ये एकदाच मशागत करून गादी वाफे करावेत, त्यानंतर परत कधीच मशागत करावयाची नाही. इतरत्र जमिनीच्या आकारमानाप्रमाणे एकदाच रचना अशी करा, की एक पीक घेतल्यानंतर त्या पिकाचे जमिनी खालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत म्हणून वापरता येईल. चार बांधाच्या बाहेरून एक चिमूटभरही सेंद्रिय खत न टाकता जमिनीत मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढू शकते.
३) पिकातील उगवणीपूर्व आणि नंतर येणाऱ्या तणांचे नियंत्रण शिफारशीत तणनाशकाने करावे. यासाठी तणनाशकांचा अभ्यास, फवारणीसाठी यंत्रसामग्री खरेदी, योग्य वेळी काटेकोर फवारणी केल्यास पूर्वमशागत, सेंद्रिय खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन हे मोठ्या खर्चाचे विषय शेतीतून संपून जातात.
४) तणनाशकावर झालेल्या खर्चापेक्षा तणाकडून जास्त किमतीचे खत मिळाल्याने तण नियंत्रण हा मोठ्या खर्चाचा विषय फुकटात रूपांतरित होतो. एकदा जमिनीत भरपूर सेंद्रिय खत झाले, की रासायनिक खत आणि पाणी जास्त कार्यक्षमतेने वापरले जाते. सर्व खर्च कमी व उत्पादन मात्र जास्त असे झाले तरच शेतकरी जगेल.
५) कृष्णा नदी काठी जमिनी क्षारपड झाल्याने निचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ७ ते ८ वर्षे शून्य मशागत तंत्राचा वापर करणारा आमचा शेतकरी कळवितो, की जमिनीला पाणी दिल्यानंतर अगर मोठा पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या जमिनीतून चालत जाता येते. मशागतीच्या क्षेत्रात वापसा येण्यास बराच कालावधी लागतो. यंदा उशीरापर्यंत पाऊस न झाल्याने कृष्णा काठावर पाणी टंचाईमुळे बहुतेकांचे ऊस वाळून जात आहेत. परंतु शून्य मशागतीवरील आपला ऊस हिरवागार आहे. या माहितीतून आपण काही शिकणार का? सर्व पिकांत हे तंत्र राबविता येते. गरजेप्रमाणे थोडा थोडा फरक करावा लागतो. येथून पुढे मुख्य पिकाबरोबर तण व्यवस्थापनातून सेंद्रिय खत करण्यास शेतकऱ्याने शिकले पाहिजे. जमिनीचा काही भाग त्यासाठी राखून ठेवला पाहिजे. तरच सेंद्रिय खतटंचाई हा प्रश्न आपण सोडवू शकतो.
आकृती ः
जमिनीची जैविक मशागत
१) आच्छादन जमीन
- खनिज कण
- सेंद्रिय खण
पहिल्या टप्प्यात जमिनीच्या वरच्या थरात कुजण्याच्या क्रियेतून तयार झालेले सेंद्रिय कण मिसळतात.
२) दुसऱ्या टप्प्यात तयार झालेले सेंद्रिय कण त्या खालील थरात मिसळतात.
३) तिसऱ्या टप्प्यात त्या खालील थरात सेंद्रिय कण मिसळतात.
अशा प्रकारे पिकाची मुळे वाढणाऱ्या थरात खनिज व सेंद्रिय कणांचे मिश्रण तयार होते. मशागत म्हणजे आपण हेच करतो. ही जैविक मशागत कोणत्याही यंत्राने केलेल्या मशागती पेक्षा कित्येक पटीने चांगली असते. अशा जमिनीत पेरणी यंत्र मशागत केलेल्या जमिनीपेक्षा उत्तम चालते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.