Junk Food
Junk Food Agrowon
ॲग्रो गाईड

‘जंक फूड'चे आरोग्यावर होतोय परिणाम

Mahesh Gaikwad

अजित मैत्रे, दयानंद पाटील, डॉ. शैलेश कटके

भारतीय तरुण, शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणाचे (Obesity In Children) प्रमाण वाढत चालले आहे. एवढेच नव्हे, तर दोन वर्षे वयाच्या आतील मुलांची वजनेदेखील जास्त असण्याचे प्रमाण वाढत आहे. गरजेपेक्षा जास्त वजन असण्याचे परिणाम म्हणजे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार होण्याचे वय मागील दोन दशकांमध्ये वयाच्या २५ ते ३० वर्षे इतके खाली आले आहे. हे होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे बदलत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच घटणारे शरीर श्रम.

१) ‘जंक फूड' हे पदार्थ शरीराला उपयुक्त नाहीत, परंतु खावेसे वाटतात. ज्यात पोषक द्रव्ये नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात. जंक फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्यामानाने अतिशय कमी प्रमाणात असतात.

२) मुख्यत्वे कर्बोदके व फॅट्सचे प्रमाण बरेच जास्त असते. या अन्नावर खूप जास्त प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानकारक असे अनेक विषारी घटकसुद्धा तयार होतात. पदार्थ ताजे दिसावेत, जास्त काळ टिकावेत म्हणून त्यावर केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रक्रिया आणि वापरली जाणारी प्रिझर्वेटिव्हस यामुळे ते आरोग्यासाठी आणखीन हानिकारक ठरतात.

३) समोसा-कचोरी, वडापावसारखे अधिक तळलेले पदार्थ, मैद्यापासून तयार होणारे बेकरी उत्पादित पदार्थ, चाट तसेच पदार्थ, पिझ्झा-बर्गर, नूडल्स, मंचुरियन, सॉफ्ट ड्रिंक्स, आइस्क्रीम, हंबरबर्ग या पदार्थांचा समावेश ‘जंक फूड’मध्ये होतो.

४) ‘जंक फूड'चे प्रस्थ वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जीवनाची वाढलेली गती. पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे मुलांना तसेच बरेचदा स्वतःसाठी सुद्धा घरच्या घरी काही खाण्यासाठी बनविणे कठीण जाते. अशावेळी तयार अन्नपदार्थ बाजारातून आणून खाणे किंवा बाहेर खायला जाणे हा सहज सोपा पर्याय निवडला जातो.यातून हळूहळू सातत्याने ‘जंक फूड’ची सवय व्हायला लागते. पुढे ते आपल्या आहाराचा नियमित हिस्सा बनतात.

५) धावपळीच्या जीवनशैलीमुळे सर्व जण पोषक आहारापेक्षा ‘जंक फूड’ला जास्त प्राधान्य देतात. ‘जंक फूड’ हे चविष्ट तसेच झटपट तयार होतात. लगेच भूक भागून जाते म्हणूनच ‘जंक फूड’ला पोषक आहारापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. यामुळे आपल्या शरीरावर खूप सारे परिणाम होतात. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्याने खूप साऱ्या आजारांना सामोरे जाऊ शकते.

‘जंक फूड’चा परिणाम ः

१) चरबीचे वाढते प्रमाण ः

- ‘जंक फूड’मध्ये उष्मांक आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते.

- जेव्हा शरीरात उष्मांकांचे प्रमाण खूप जास्त वाढू लागते, तेव्हा आपल्या शरीराचे वजन हळू हळू वाढू लागते. ‘जंक फूड’मुळे आपली भूक भागते, पण शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक पुरेसे मिळत नाहीत, म्हणून यामुळे आपले शरीर वाढू लागते.

२) पचनशक्ती मंदावते ः

- ‘जंकफूड’चे सेवन करत असल्यास अपचनासारख्या समस्या दिसतात.

- ‘जंक फूड’ बनवताना वापरात येणारे तेल, मसाले पचन शक्ती बिघडवतात. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पुरेसे पोषक घटकांचे व्यवस्थित पचन होत नाही. पचनशक्ती आणि शरीर कमजोर होते.

३) मानसिक आरोग्यावर परिणाम ः

- ‘जंक फूड’ खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुमचे मानसिक आरोग्य आपोआप कमी होऊ लागते.

- भूक लागल्यावर पौष्टिक पदार्थांऐवजी ‘जंक फूड’ खाण्यास प्राधान्य देत असाल तर ताणतणावांचा सामना करावा लागू शकतो.

- जे लोक जेवढे जास्त प्रमाणात ‘जंक फूड’चे सेवन करतात, तेवढा जास्त मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागू शकतो.

- आपल्या मेंदूची कार्यक्षमता आपण आहारामध्ये ज्या पदार्थांचा समावेश करतो त्यावर अवलंबून असते. ‘जंक फूड’चे सेवन करत असल्यास तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये बदल होते. यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो.

४) रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण ः

- ‘जंक फूड' मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. हेच तुमच्या शरीरातील साखर वाढीचे कारण बनते. जेव्हा ‘जंक फूड’चे पचन होते, तेव्हा हे रक्तप्रवाहात साखरेच्या रूपाने पसरू लागते. यामुळेच शरीरात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो.

५) हाडे कमकुवत होण्याचा धोका ः

- ‘जंक फूड’ हे हाडांना देखील कमजोर बनवते. याचे कारण म्हणजे यामध्ये असणारे साखरेचे प्रमाण. या परिणामामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे स्तर वाढू लागतो.

- रक्तामध्ये जास्त प्रमाणात साखरेचे प्रमाण असेल तर हाडे कमकुवत बनतात.

६) वाढता लठ्ठपणा ः

- ‘जंक फूड’मुळे शरीरात उष्मांकांचे प्रमाण वाढत जाते. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुम्हाला खूप थकवा आणि आळस येतो.

७) हृदयविकाराच्या समस्या ः

- ‘जंक फूड’मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. यातून हृदयासंबंधीचे रोग वाढण्याची शक्यता उद्‌भवते. कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यामुळे शरीराचे वजन हळूहळू वाढू लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती सुद्धा वाढते.

आहारात असावेत घरगुती पोषणमूल्य पदार्थ

प्राथमिक शाळांनी मुलांच्या डब्यात ‘जंक फूड’ला बंदी घातली असली तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरांवरील विद्यार्थ्यांचे ‘जंक फूड’ हेच मुख्य अन्न झाल्याचे चित्र आहे.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालय, विद्यापीठांतील कॅन्टीनमध्ये ‘जंक फूड’ला मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये आता घरगुती पोषणमूल्याचे पदार्थ देण्यात यावेत, असे निर्देश नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. कॅन्टीनमध्ये कोणते खाद्य पदार्थ असावेत याची मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत. त्याचबरोबर आहार व त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे उपयुक्त ठरणार आहे.

संपर्क ः दयानंद पाटील, ९८८११५५२८७

(अजित मैत्रे, दयानंद पाटील हे औरंगाबाद येथे सहाय्यक आयुक्त (अन्न) आहेत. डॉ. शैलेश कटके हे एमआयटी महाविद्यालयात कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT