Dr. Anand Karve
Dr. Anand Karve Agrowon
ॲग्रो गाईड

Dr. Anand Karve : ज्ञान आणि संशोधनाच्या मार्गाने वाटचाल करणारी ‘आरती’

मनोज कापडे

उच्चविद्याविभूषित समाजसुधारकाच्या घराण्यातील एक अत्यंत हुशार महाराष्ट्रीयन तरुण जर्मनीत जाऊन वनस्पतिशास्त्रज्ञ (Botanist) बनतो. मात्र तेथे स्थायिक न होतात पुन्हा महाराष्ट्रात परततो. शेतीची पार्श्‍वभूमी नसतानाही कृषी व ग्रामीण भागाला उपयुक्त संशोधनात स्वतःला झोकून देतो. जागतिक कीर्तीची स्वयंसेवी संस्था स्थापन करतो. या संस्थेच्या माध्यमातून तंत्र आणि शोधांची मालिकाच सुरू राहते. जग त्याला कृषिशास्त्रज्ञ म्हणून ओळखते आणि ‘ग्रीन ऑस्कर’ समजल्या जाणाऱ्या ‘ॲश्डेन’ पुरस्काराने (Ashden Award) एकदा नव्हे तर दोनदा गौरव करते. मात्र पद, पैसा, प्रतिष्ठा यांचे अजिबात अप्रूप नसलेला हा अवलिया आज वयाच्या ८६ व्या वर्षीही आनंदाने प्रयोगशाळेत झपाटल्यासारखं संशोधन करतो आहे. डॉ. आनंद दिनकर कर्वे (Dr. Anand Divekar Karve) यांचा हा प्रवास स्तंभित करणारा आहे. या महान शास्त्रज्ञाशी झालेला हा मनमोकळा संवाद.

तुम्ही शेतकरी नाही आणि कृषी पदवीधरही नाहीत. मात्र मग संशोधक म्हणून कृषी क्षेत्राकडे कसे वळलात?

- आमच्या कर्वे घराण्यात उच्च शिक्षणाला पिढीजात महत्त्व आहे. आजोबा धोंडो केशव कर्वे हे समाजसुधारक व शिक्षणमहर्षी होते. वडील दिनकर धोंडो कर्वे हे जर्मनीत शिकले आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. माझी आई डॉ. इरावती कर्वे ही प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ व साहित्यिक होती. विद्येच्या या घरात मी वयाच्या विसाव्या वर्षीच पुणे विद्यापीठाचा विज्ञान पदवीधर बनलो. लगेचच उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेलो. तेथे १९६० मध्ये मी वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळवली. मात्र मी विदेशात थांबलो नाही. मायदेशी आल्यानंतर मी पहिली चार वर्षे भारताच्या पंजाब विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम केले. मात्र माझा पिंड संशोधनाचा होता.

विद्यापीठ सोडून मी शिवाजी विद्यापीठात रुजू झालो. तेथे १९६४-६६ मध्ये मी वनस्पतिशास्त्राचा विभाग प्रमुख होतो. त्यानंतर मी फलटण (जि. सातारा) येथील ‘निंबकर सीड्स’मध्ये संशोधन संचालक झालो. तेथून पुढे मी कृषी संशोधनात गाडून घेत कामे केली. अर्थात, देशात कामे करताना मी विदेशातही सेवा केली. म्यानमार येथे ‘युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ या संघटनेच्या वतीने भुईमूग तज्ज्ञ म्हणून मी काम केले. इराणाला गोड ज्वारीपासून साखर निर्मितीच्या प्रकल्पाचा सल्लागार म्हणून काम केले. तर करडई तेलबियावरील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणूनही ओळख मिळाली. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीवर चालणाऱ्या ‘कास्टफोर्ड’ या प्रकल्पात १९८८ मध्ये मी भरपूर काम केले. १९९३ मध्ये मी पुण्यातील इंद्रायणी बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. अशा पद्धतीने आयुष्याची सारी वाटचाल मी कृषी क्षेत्रातच केली आणि अजूनही चालूच आहे.

पण नोकरीच्या वाटचालीत कृषी क्षेत्रात कसे आलात?

- मी स्वतः १९८४ ते ८८ या कालावधीत मुंबईतील ‘हिंदुस्थान लिव्हर’च्या कृषी विभागाचा प्रमुख होतो. त्यांनी ‘पारस सीड्‍स’ या नावाने बियाणे उद्योग सुरू केला होता. त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय सौदर्यप्रसाधने निर्मितीचा आणि कायमस्वरूपाचा होता. त्यातुलनेत बियाणे व्यवसाय छोटा आणि हंगामी होता. मी कंपनीचा राजीनामा दिला. त्याच वेळी पुण्यातील डॉ. टिळक यांनी मला त्यांच्या ‘कास्टफोर्ड’ (सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट) या नव्या संस्थेत कामाला येण्याची गळ घातली. ते ‘कास्टफोर्ड’चे संचालक आणि मी उपसंचालक म्हणून काम सुरू केले. डॉ. टिळक हे ग्रामीण क्षेत्रासाठी संशोधन व तंत्रे आणण्यासाठी धडपडत होते.

त्या वेळी सरकारी संस्थांमधील संशोधनाचा वापर व्यावसायिक स्तरावर आणण्यासाठी ते सतत चाचपणी करीत असायचे. कोथरूडमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचा एक भाग म्हणून कास्टफोर्डचे कामकाज चालवले जात असे. डॉ. टिळक सतत भारतीय विज्ञान व औद्योगिक परिषदेत जात. तेथील शास्त्रज्ञांनी शोधलेले काही तंत्र किंवा शोध याची माहिती ते घेत. व त्याचा वापर ग्रामीण भागासाठी कसा करता येईल याचा विचार त्यांच्या डोक्यात असायचा. पुण्यात ते स्वयंसेवी संस्थांच्या परिषदा घेत व त्यात या शोधांची माहिती देत असत.

तुम्ही संकरित बियाणे उद्योगात कसे गेलात?

- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मी कार्यरत होतो. तेथे वनस्पतिशास्त्राचा प्रमुख म्हणून मला दोन वर्षे झालेली असतानाच १९६६ मध्ये फलटणचे निंबकर मला भेटायला आले. त्यांनी ‘निंबकर सीड्स’ नावाने संकरित बियाण्यांचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु त्या वेळी राज्याचा कृषी विभाग, कृषी संशोधक हे सारेच संकरित बियाण्यांच्या विरोधात होते. संकरित बियाणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांचा खेळ, असे कृषिशास्त्रज्ञ व सरकारी अधिकारी म्हणत असत. मात्र १९७२ मध्ये दुष्काळ पडला. त्या दुष्काळात केवळ संकरित ज्वारी तग धरून होती. ‘हायब्रीड’ची ही जादू तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या लक्षात आली होती.

त्यामुळेच ते संकरित बियाण्यांचे खंदे प्रचारक बनले. त्यामुळे कृषी खात्याचा विरोध गळून पडला. तर मला भेटायला आलेल्या निंबकरांचे म्हणणे होते, की तुमच्या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेत संशोधन प्रकल्प द्या. त्यासाठी मी त्यांनी शिष्यवृत्ती देतो. ते बियाणेविषयक समस्यांवर संशोधन करतील. त्यांना पीएच.डी. मिळेल व माझेही काम होईल. मी त्यांना घेऊन तत्कालीन कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडे गेलो. पण त्यांना ही कल्पनाच पटली नाही. “एखाद्या भांडवलदाराचे पैसे घेऊन विद्यापीठातील संशोधन चालविण्याचं आपलं धोरण नाही. आपल्याला समाजाच्या मालकीच्या (समाजवादी अंगाने) बाजूने कामे करायची आहे. त्यामुळे मला हा प्रस्ताव मान्य नाही,” असे सांगत कुलगुरूंनी हा विषय उडवून लावला. त्यानंतर निंबकरांनी मला विद्यापीठातील नोकरी सोडून त्यांची कंपनी जॉईन करण्याची ऑफर दिली.

(सविस्तर मुलाखत वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT