पुणे ः राज्यात खते, बियाणे, कीडनाशके निर्मितीचे आणि विक्रीचे परवाने (Pesticide, Seeds, Fertilizers production licence) वितरण तसेच कारवाई करण्यासाठी अत्यंत मोक्याचे समजले जाणारे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपद (Quality Cntrol Administrator) अद्यापही रिक्त आहे. या मलईदार पदावर नियुक्ती होण्यासाठी भाव फुटल्याची चर्चा कृषी विभागात सुरू आहे.
पोलिस खात्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदाला असलेले महत्त्व कृषी खात्यात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदाला आहे. या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती राज्यातील हजारो कोटींच्या निविष्ठा उद्योगावर एकहाती हुकूमत गाजवू शकते.
विशेषतः निविष्ठा उद्योगांना परवाने देणे, परवाने रद्द करणे, धाडी टाकणे, कारवाई करणे किंवा केलेली कारवाई मागे घेणे यात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचा प्रमुख सहभाग असतो.यात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचा प्रमुख सहभाग असतो.
‘कृषी खात्याच्या गुणनियंत्रण विभागात संचालकाला अंतिम अधिकार असले तरी सर्व पत्रव्यवहार व धोरणात्मक निर्णयात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याची शिफारस महत्त्वाची असते. एकप्रकारे तोच संचालक म्हणून राज्यभर सत्ता गाजवतो.
त्यामुळे या पदावर नियुक्ती होण्यासाठी आमदार,खासदारांपासून मंत्र्यांपर्यंतच्या शिफारशी मिळवण्याची धडपड अधिकाऱ्यांची असते. आतादेखील या पदाचा घोडेबाजार चांगलाच रंगला आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी आतापर्यंत विकास पाटील, दिलीप झेंडे, सुभाष काटकर, विजयकुमार घावटे, दादासाहेब सप्रे, उदय देशमुख, किसन मुळे, सुदाम अडसूळ यांनी कामे केलेली आहेत. ‘‘या पदावर काम केलेल्या एकाही अधिकाऱ्याला ऑनलाइन किंवा पारदर्शक कामाचा आग्रह धरला नाही.
आपल्या कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यात तसेच चांगल्या कामातून जरब बसवता आली नाही. उलट, अधिकाराचा वापर करून निविष्ठा उद्योगाला झुकवण्यात किंवा पदभाराचा कालावधी चालढकल करीत पूर्ण करण्यात धन्यता मानली आहे,’’ असे स्पष्ट मत एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने व्यक्त केले.
शिंदे, कोलते, काटकर यांची नावे चर्चेत
‘‘मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदावरील सुनील बोरकर यांची पदोन्नती झालेली आहे. मात्र, या पदाची सूत्रे त्यांनी अद्यापही सोडलेली नाहीत. तसेच, या पदावर नियुक्ती होण्यासाठी जितेंद्र शिंदे, सुभाष काटकर व सीताराम कोलते या अधिकाऱ्यांची नावे राज्यभर चर्चेत आहेत. त्यातही पुन्हा खरी चुरस शिंदे व कोलते यांच्यात आहे. तसेच, कृषिमंत्र्यांच्या शिफारशीनंतर अंतिम निवड थेट मुख्यमंत्र्यांकडून होणार आहे,’’ अशी माहिती आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.