Jowar Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Farmer Story: पिवळी ज्वारी आणि शेतकरी राजा

Agricultuer Challenges: ज्वारी पिकवताना आलेल्या खर्चाचा आणि श्रमांचा हिशेब घेतला, तर शंभर रुपये किलो हा दरच न्याय्य वाटतो. ‘मालाची किंमत मीच ठरवणार’ अशी ठाम भूमिका घेत एक शेतकरी आपल्या स्वाभिमानासाठी उभा राहतो, ती इतरांसाठी धक्कादायक ठरते.

महारुद्र मंगनाळे

Jowar Farming: पिवळी ज्वारी पेरल्यापासून ते रास करेपर्यंतचा सगळ्या खर्चाचा मी हिशेब घातला. झालेलं उत्पादन बघितलं तर किमान शंभर रुपये किलो दराने ही ज्वारी विकली तरच मला दोन पैसे मिळणार होते. या ज्वारी उत्पादनासाठी झालेला खर्च आणि आमचे परिश्रम लक्षात घेता शंभर रुपये किलो हा दर योग्यच होता. मी ठरवलं, यापेक्षा कमी दरात ज्वारी विकायची नाही. मी उत्पादित केलेल्या मालाची किंमत मी ठरवेन, ही यामागची माझी भूमिका. तसं मी फेसबुक वरील एका नोंदीत जाहीर केलं. एक शेतकरी, आपल्या शेतमालाची किमत बाजारभावापेक्षा जास्त ठरवून, यापेक्षा कमी किमतीत विकणार नाही असं म्हणतोय, हे बहुतेकांसाठी धक्कादायक होतं.

शालेय आयुष्यात मी बरीच वर्षे पिवळी ज्वारी खाल्लीय. तो काळच असा होता, की शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला शेतीत जे धान्य पिकतं ते खावं लागायचं. मला हे आवडत नाही, चालत नाही असं म्हणायला वाव नव्हता. केवळ पिवळीच नाही तर मल्ली, झिंगरी, मऊ, माकण्या आणि शेवटी संकरित ज्वारीही (हायब्रीड) खाल्लीय. यातील पिवळ्या ज्वारीची चव मी कधीच विसरली नाही. पहिल्यांदा जेव्हा खाल्ली तेव्हा ‘रोटी कडू हाय... मला ही रोटी नको माय...’ असा त्रागा केल्याचंही आठवतं. पण त्या वर्षी झिंगरी ज्वारीला दाणेच भरले नव्हते. पिवळीची मात्र रास झाली. साहजिकच तिला पर्याय नव्हता. गरम भाकरी दुधात कालवली की ती अजिबात कडू लागायची नाही. मात्र शिळी भाकरी थोडी कडवट लागायची. आठवडाभरातच या भाकरीची सवय होऊन गेली. ती अजिबातच कडू लागेना. उलट ती चव आवडू लागली.

दहावीपर्यंत अधूनमधून पिवळीची भाकरी होती. नंतर संकरित ज्वारी आली. तिला आम्ही हाब्रेट म्हणायचो. या ज्वारीला चव नव्हती. नाइलाज म्हणून ही भाकरी खावी लागायची. लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद या जन्मगावी राहूनच अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी जा-ए करीत बी.ए. केलं. तोपर्यंत भाकरी हेच आवडीचं जेवण होतं. लातूरला पत्रकारितेत उतरल्यानंतर भाकरीपेक्षा चपातीचा वापर वाढला. पण भाकरीची आवड संपली नाही. माझ्यावर २०१० नंतर शेतीची जबाबदारी आली आणि २०१४ नंतर तर मी शेतीतच राहायला आलो. त्यानंतर हळूहळू चपाती मागे पडून भाकरीच आवडती बनली. आज मी चपाती अगदीच अपरिहार्य परिस्थितीत खातो.

माझ्या वडिलांच्या काळात आमच्या शेतीत कधीच जोंधळ्याची ज्वारी आली नव्हती. केवळ जनावरांना चारा म्हणून जोंधळा पेरला जाई. साधारण आठ वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून हलक्या जमिनीत जोंधळा पेरला. आश्‍चर्य म्हणजे पहिल्यांदाच एका एकरात सहा कट्टे ज्वारी झाली. माझ्यासाठी ही बाब मोठी कौतुकाची, आनंदाची होती. जोंधळ्याला जमीन भारी लागते, ती विशिष्ट भागातच येते, हा आमचा ग्रह दूर झाला. त्यानंतर दरवर्षी आम्ही जोंधळा पेरतो. उताराही चांगला येतो. एका राशीची, भेसळ नसलेली ज्वारी म्हणून क्विंटलला हजार-दीड हजाराचा जादा भाव थेट ग्राहकांकडून मिळतो. एक ग्राहक दरवर्षी दोन महिने आधी आमच्याकडं पैसे जमा करतो. हे विश्‍वासार्हतेमुळं घडतं. आम्हीही जोंधळ्याचीच भाकरी खातो. या काळात मी पिवळी ज्वारी विसरूनच गेलो होतो.

गेल्या वर्षी हसेगावला सेवालयाचे प्रमुख व माझे मित्र रवी बापटले यांच्याकडे गेलो असताना, तिथं रवी एकटेच पिवळ्या ज्वारीची भाकरी खात असल्याचं लक्षात आलं. त्यांना मधुमेहाची सुरुवात झालेली होती. आणि अचानक माझ्या डोक्यात शालेय आयुष्यातल्या पिवळ्या ज्वारीच्या आठवणी जिवंत झाल्या. चवही आठवली. तेव्हाच मी सांगितलं, की मी इथं जेवायला जेव्हा असेन तेव्हा मलाही पिवळ्याची भाकरी हवी. ती मला मिळू लागली. मी बऱ्याच वेळा फेसबुकवर या भाकरीचे फोटोही टाकले. मला जोंधळ्यापेक्षा पिवळीची भाकरी आवडू लागली होती. त्यातून ही ज्वारी आपल्या शेतात पेरायला हवी, असा विचार मनात पक्का होत गेला.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी एक एकर जोंधळा पेरला. त्याची पुढे रासही झाली. मळ्यातील सोयाबीन पेरलेले चिबाड रान उशिरा तयार झालं. विहिरीत, शेततळ्यात पुरेसं पाणी असल्याने, किमान जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारी पेरावी, असं शेतातील सहकारी नरेश शिंदेचं म्हणणं आलं. जोंधळ्यापेक्षा पिवळ्या ज्वारीचा कडबा जनावरं आवडीने खातात, हे माहीत असल्याने मी पिवळी ज्वारी पेरायला सांगितलं. बऱ्याच उशीरा ज्वारीची पेरणी झाली. चांगली उगवण झाली. सुरुवातीलाच डुकरांचा त्रास सुरू झाला म्हणून तार ओढून घेतली. कोळपणीही केली. ज्वारीची वाढ चांगली होती. मधेच सायाळ व अन्य प्राण्याने ज्वारी कातरली. जनावरांसाठी दुसरा पुरेसा चारा असल्याने ही ज्वारी कापायची गरज पडली नाही.

ती दिवसागणिक वाढत राहिली. दरम्यान ज्वारी निसवली. कणीस चांगलं पडलं. पाखरांचाही त्रास कमी होता. एप्रिल अखेर दोन वेळा वादळ आलं. उभी ज्वारी आडवी झाली. मे महिना उजाडला तरी ज्वारीची धाटं हिरवीच होती. मात्र कणसाची ज्वारी वाळली होती. पिवळी जर्द ज्वारी लक्ष वेधून घेत होती. पावसात ही ज्वारी भिजली तर तिचा रंग व चवही बदलते. त्यामुळं पावसाआधी या ज्वारीची रास करण्यासाठी माझी धडपड सुरू होती. मजूर हीच मुख्य अडचण होती. जादा मजूर बोलावून दोन-तीन दिवसांत हे काम संपवावं, हा विचार अमलात आणता आला नाही. चार महिला, नरेश, गजानन आणि मी असं सात जणांनी कापणीचं काम सुरू केलं.

माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. भरपूर त्रास झाला. पण जिद्दीने शेवटपर्यंत यात सहभागी झालो. कणसं खुडून ताडपत्रीखाली झाकले आणि त्याच दिवशी जोरदार पाऊस पडला. यात आठ दिवस गेले. एक दिवस जरी उशीर झाला असता तरी या ज्वारीची प्रत कमी झाली असती. दोन दिवसांनी मशीनने रास केली. ज्वारीचं एक नंबर उत्पादन आलं. यात मला शारीरिक आणि मानसिक त्रास बऱ्यापैकी झाला. तरीही अनेक वर्षांनंतर आमच्या शेतात दर्जेदार पिवळी ज्वारी उत्पादित झाली, याचा आनंद अधिक होता. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, मला माझ्या आवडीच्या पिवळ्या ज्वारीची भाकरी दररोज खायला मिळणार होती.

ज्वारीची किंमत मीच ठरवणार

ज्वारी पेरल्यापासून ते रास करेपर्यंतचा सगळ्या खर्चाचा मी हिशेब घातला. झालेलं उत्पादन बघितलं तर किमान शंभर रुपये किलो दराने ही ज्वारी विकली तरच मला दोन पैसे मिळणार होते. या ज्वारी उत्पादनासाठी झालेला खर्च आणि आमचे परिश्रम लक्षात घेता शंभर रुपये किलो हा दर योग्यच होता. मी ठरवलं, यापेक्षा कमी दरात ज्वारी विकायची नाही. मी उत्पादित केलेल्या मालाची किंमत मी ठरवेन, ही यामागची माझी भूमिका. तसं मी फेसबुकवरील एका नोंदीत जाहीर केलं.

ती फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. दहा लाख लोकांनी ती बघितली. त्यावर २२०० प्रतिक्रिया आल्या. तसेच त्यापेक्षा अधिक लोकांनी या नोंदीला लाइक केलं. भरपूर लोकांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. एक शेतकरी, आपल्या शेतीमालाची किमत बाजारभावापेक्षा जास्त ठरवून, यापेक्षा कमी किमतीत विकणार नाही असं म्हणतोय, हे बहुतेकांसाठी धक्कादायक होतं. ज्वारीची किमत अवाजवी आहे, असे म्हणणारे, टीकाटिप्पणी करणारेही काही जण होते. अशांना मी ब्लॉक केलं.

मी लेखक, पुस्तक प्रकाशक व वितरक आहे. उत्पादन खर्च आणि वितरकांना, ग्राहकांना द्यावी लागणारी सूट लक्षात घेऊन पुस्तकांच्या किमती मी ठरवतो. त्याबद्दल कोणीच कधी टीकाटिप्पणी करीत नाही. कारण प्रकाशक पुस्तकाची किंमत ठरवतो, हे सगळ्या संबंधित घटकांना मान्य आहे. कुठल्याही दुकानात, सुपर मार्केट वा मॉलमध्ये खरेदीला गेलेली व्यक्ती तिथं लिहिलेल्या किमतीने ती वस्तू खरेदी करते. तिचा भाव बदलण्याचा प्रयत्न वा अपेक्षा करीत नाही. मग शेतीमाल समोर आला की त्याचा भाव पाडण्याची इच्छा ग्राहकांना का होते?

साधी दहा रुपयांची मेथीची पेंडीही पाच रुपयांना द्या, अशी घासाघीस केली जाते. हे भाव करणारे ग्राहक सुखवस्तू, मध्यमवर्गीय असतात. पाच रुपयांमुळे यांच्या बजेटमध्ये काहीच फरक पडणार नसतो. मात्र शेतकऱ्यांसाठी याचं मोल असतं. पण याबाबत ग्राहक कोडगे आहेत. शेतीमाल स्वस्तातच मिळायला हवा, हा दृष्टिकोन ही मानसिकता बनायला कारणीभूत आहे. शिवाय शेतकरी आपल्या दरावर स्थिर राहत नाहीत, हा त्यांचा अनुभवही आहे. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी खंबीर भूमिका घेण्याची गरज आहे.

पिवळी ज्वारी म्हणजे अस्सल देशी वाण. ही कोरडवाहू, हलक्या जमिनीत येते. मात्र या ज्वारीचं उत्पादन घेणं त्रासदायक आहे. यात अनेक जोखीम आहेत. उत्पादन खर्च भरून निघेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तिचा पेरा कमी झाला आहे. आता ती बाजारात सहजपणे मिळत नाही. या ज्वारीत आरोग्यासाठी उपयुक्त गुण आहेत. मधुमेह, वाढते वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे. तरीही ही ज्वारी खाणारे किती आहेत? बहुतांश शहरी लोकांनी ही ज्वारी बघितलेलीच नाही. मी या निमित्ताने या लोकांना पिवळी ज्वारी माहीत करून देण्याचं काम केलं आहे. दररोज मूठभर कडूझार गोळ्या खाऊन दिवस साजरा करणाऱ्यांनी किंचित कडसर ज्वारीचं स्वागत करायला हवं. ते त्यांच्या हिताचं आहे.

जाणीवपूर्वक केलेला प्रयोग

ज्वारी विक्री हा मी जाणीवपूर्वक केलेला प्रयोग आहे. मी ठरवलेल्या किमतीला माझा शेतमाल विकू शकतो, हे मी या निमित्ताने दाखवून देतोय. हा प्रयोग मर्यादित असल्याने, तो यशस्वीही झालाय. मी केवळ शेतीवर जगणारा, रडणारा शेतकरी नाही. माझ्या दराने ही ज्वारी विकली नाही तरी मला काहीच फरक पडणार नाही. माझा माल गुणवत्तेचा व आरोग्यदायी असल्याने माझ्या अटी, शर्तीच्या आधीन राहूनच मी विक्री करतोय. ग्राहक माझा माल घेऊन माझ्यावर उपकार करीत नाही. उलट औषधी गुण असलेल्या एका दर्जेदार ज्वारीची ओळख मी त्याला करून देतोय. हे नीट समजून घेण्याची गरज आहे.

मी अद्याप बागेतील सेंद्रिय फळांची विक्री केलेली नाही. पण उद्या विक्री सुरू केली, तरी माझ्या कष्टांचं, फळांच्या गुणवत्तेचं योग्य मोल करू न शकणारे ग्राहक मला नको आहेत. माझ्या बागेत पिकणारे आंबे असोत, की सीताफळ, पेरू, केळी असो; त्याचा दर मीच ठरवणार. ज्याला परवडेल ते घेतील. माझं घ्या, म्हणून मी कोणाकडं जाणार नाही. योग्य ग्राहक मिळाला नाही तर ही फळं प्राणी,पाखरं, मुंग्या खातील. झाडावर फळं परिपक्व होऊन मातीत पडून कुजतील. त्याचं खत होईल. त्याच खतावर ही झाडं पुन्हा बहरतील...

हे निसर्गचक्र मी जाणतो. याचा आदर करणारा मी सक्षम, स्वाभिमानी शेतकरी आहे. मी माझ्या कष्टाने पिकवलेली फळं तुम्ही मागाल त्या किमतीत देणार नाही. माझ्या मालाची किमत ठरविण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. अर्थात, सगळ्याच पिकांना हे लागू पडणार नाही, याची मला जाणीव आहे. सोयाबीनच्या बाबतीत मला अशी भूमिका घेता येणार नाही. त्यातील अडचणी, अडथळे मला माहीत आहेत. म्हणूनच मी हे सगळं मर्यादित स्वरूपात, माझ्या आवाक्यात आहे, तेवढंच करतोय. हा व्याप मी वाढविणार नाही.

माझ्याच फेसबुक भिंतीवर येऊन, मी ५०-६० रुपये किलोने पिवळी ज्वारी देतो, असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना माझी ही भूमिका कळलेली नाही. त्यांना कळणंही कठीण आहे. मला त्यांची कीव येते. याचकाच्या मानसिकतेतून जोपर्यंत हे बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत ते फक्त सांगण्यापुरते ‘शेतकरी राजा’ असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT