Agriculture Research : जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी प्रथिने आणि बी९ जीवनसत्त्वाची निर्मिती सूक्ष्मजिवांकडून करण्यात यश मिळवले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सूक्ष्मजीव केवळ हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडवर वाढतात. म्हणजेच त्यांना अन्य कोणताही आहार न देताही मानवी आहारातील प्रथिने आणि जीवनसत्त्वाची पूर्तता ते करू शकतील. हे संशोधन सेल प्रेस जर्नल ट्रेण्ड्स इन बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जर्मनीतील ट्युबिन्गेन विद्यापीठातील लार्जस अॅन्गेनेंट यांनी सांगितले, की एखाद्या मद्य निर्मितीमध्ये यीस्ट या सूक्ष्मजिवांच्या वाढीसाठी सामान्यतः शर्करा वापरली जाते. त्याऐवजी काही वायू आणि अॅसिटेट दिले तरी बी९ जीवनसत्त्व तयार होत असल्याचे प्रथमच दिसून आले.
जगाची लोकसंख्या १० अब्जाच्या घरात पोचली असून, भविष्यात या वाढत्या संख्येचा ताण अन्न उपलब्धतेवर येणार आहे. त्यात वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये उत्पादनात वाढ मिळवणेही अवघड होत जाणार आहे. त्यामुळे जैवतंत्रज्ञानाच्या द्विस्तरीय बायोरिअॅक्टरमध्ये प्रथिनांच्या उत्पादन घेण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आपल्यासाठी खुला होणार आहे. त्यातून भविष्यात शेती अधिक कार्यक्षम होण्यासही मदत होईल.
...अशी आहे द्विस्तरीय प्रणाली
या संशोधनासाठी खास दोन स्तरीय बायोरिअॅक्टर प्रणाली विकसित केली आहे. त्यातून प्रथिने आणि जीवनसत्त्व बी ९ यांचे प्रमाण अधिक असलेल्या यीस्टची निर्मिती केली जाते. बी ९ हे जीवनसत्त्व मानवी शरीरातील पेशींची वाढ आणि मेटाबोलिझम सारख्या विविध कार्यामध्ये महत्त्वाचे असते. पहिल्या स्तरामध्ये थर्मोअॅनाअरोबॅक्टर किवूई (Thermoanaerobacter kivui ) हे हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर अॅसिटेटमध्ये करतात.
दुसऱ्या स्तरामध्ये सॅकहॅरोमायसेस सेरेविसिई (Saccharomyces cerevisiae) या बेकरीमध्ये यीस्ट म्हणून वापरल्या जाणाऱ्या जिवाणूंची वाढ केली जाते. हे जिवाणू अॅसिटेट आणि ऑक्सिजनच्या साह्याने प्रथिने आणि बी ९ जीवनसत्त्व तयार करतात. पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्यासाठी सौर किंवा पवन ऊर्जेद्वारे मिळालेली हरित ऊर्जा वापरल्यास ही सर्व प्रक्रिया पर्यावरणपूरक आणि शून्य ऊर्जा वापरातून होऊ शकते. या पर्यावरणपूरक अधिक पोषक अन्न निर्मितीच्या प्रक्रियेसाठी शास्त्रज्ञ लार्जस अॅन्गेनेंट यांना २०२२ मध्ये जर्मनीतील मानाचा ‘लेईब्नीज’ पुरस्कार देण्यात आला आहे.
दैनंदिन गरजेइतकी प्रथिने, बी९ मिळतील
शर्करेचा आहारासाठी वापर करणाऱ्या यीस्ट इतकेच बी९ हे नवीन अॅसिटेट खाणारे यीस्ट तयार करतात. आहारामध्ये केवळ ६ ग्रॅम वाळवलेल्या यीस्टचा वापर केल्यास माणसांच्या दैनंदिन गरजेइतके बी९ मिळू शकते, असे युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिच येथील मायकेलस रायच्लिक यांनी सांगितले.
त्यांनी प्रयोगशाळेमध्ये जीवनसत्त्व बी९ ची पातळी मोजली आहे. यीस्टमधील ही पातळी गोमांस, वराहाचे मांस, मासे आणि डाळींपेक्षाही अधिक आहे. केवळ सहा चमचे (८५ ग्रॅम) यिस्टमधून दैनंदिन गरजेच्या सुमारे ६१ टक्के प्रथिने उपलब्ध होतात, तर गोमांस, वराह मांस, मासे आणि डाळी यांतून अनुक्रमे ३४ टक्के, २५ टक्के, ३८ टक्के, आणि ३८ टक्के इतकीच प्रथिने मिळतात.
पारंपरिक प्रथिनांच्या स्रोताच्या तुलनेमध्ये यीस्टवर प्रक्रिया केल्यानंतरही दैनंदिन गरजेच्या ४१ टक्के प्रथिनांची गरज पूर्ण होते. या सुधारित यीस्ट तंत्रज्ञानामुळे अधिक जमीन न वापरताही विकसनशील देशातील लोकांच्या प्रथिने आणि पोषक घटकांची पूर्तता करणे शक्य होणार आहे.
सध्या या यीस्टच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादन करण्यासंदर्भात संशोधन सुरू असून, त्याचे मानवी आहारामध्ये घेऊन चाचण्याही करण्यात येतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिळणारे उत्पादन ही शाकाहारी, पूर्णपणे व्हेगन आणि कोणत्याही जनुकीय सुधारणांशिवाय तयार केलेले असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळेल, अशी आशा आहे.
रोबोट बनताहेत दैनंदिन जीवनाचा भाग
एकेकाळी हॉलिवूडमधील शास्त्रीय काल्पनिकांमध्ये (सायन्स फिक्शन) वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट दिसत असले, तरी ते आपल्या विश्वाचा भाग नाहीत, असेच प्रेक्षकांना वाटत असे. पण आता वेगवेगळ्या आकारांचे रोबोट लहान-मोठी कामे करताना जगभरात दिसू लागले आहेत. तुम्ही विचार करा - तुम्ही एखादा अन्नपदार्थ मागवला आहे.
थोड्या वेळाने बेल वाजल्यावर दरवाजा उघडताच तुमच्यासमोर अन्नपदार्थासह उभे असलेले यंत्र दिसताच तुमची स्थिती काय असेल? असाच प्रसंग सध्या सतत घडताना दिसत आहे, तो पूर्व चीनमधील झेझियांग प्रांतातील यिवू येथील एका हॉटेलमध्ये. हॉटेलच्या किचनमधून तुम्ही मागविलेला अन्नपदार्थ घेऊन लिफ्टने तुमच्या खोलीच्या दरवाज्यापर्यंत आणण्याचे म्हणजेच डिलिव्हरी बॉयचे काम चक्क रोबोट करू लागले आहेत.
(छायाचित्र स्रोत : अडेक बेरी, वृत्तसंस्था)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.