Agriculture Technology : तंत्र आत्मसात करून हरभरा पिकात हातखंडा

Chana Farming : रूखनखेडा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील अजय हिंमत पाटील यांनी अनेक वर्षांपासून काबुली हरभऱ्याची शेती टिकवली आहे. कृषी पदवीधर असल्याने त्यातील शास्त्रीय ज्ञान, अनुभव व अभ्यासाची जोड देत या पिकात त्यांनी दर्जेदार उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. केळीत बेवड म्हणूनही त्याचा उपयोग होत आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : जळगाव जिल्हा हरभरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्टरच्या आसपास हरभऱ्याचा दरवर्षी पेरा असतो. त्यात काबुली वाणाचे क्षेत्र ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत असावे. तापी, गिरणा व अनेर नदीकाठच्या गावांमधून प्रामुख्याने हरभरा घेण्यात येतो. कापूस, केळीप्रमाणे हरभऱ्याची थेट शेतातून खरेदी व्यापारी करतात. चांगले अर्थकारण देणारे रब्बीतील पीक या दृष्टीने रुखनखेडा (ता.चोपडा) येथील अजय पाटील त्याकडे पाहतात. अनेक वर्षे सातत्याने ते या पिकात टिकून आहेत. कृषी पदवीधर असलेल्या अजय यांनी या पिकातील नवे ज्ञान घेत, त्यातील तंत्र समजावून घेत व प्रयोग करीत लागवड व्यवस्थापन कौशल्य मिळवले आहे. त्यांची १८ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. गूळ नदीचा लाभ होतो. मृग व कांदेबाग या दोन हंगामात केळी लागवड, खरिपासह रब्बीत कलिंगड व खरिपात कांदा अशी त्यांची पीक पद्धती आहे. जमीन सुपीकतेवर अधिकचा भर असतो. एक देशी गाय आहे. शेण- गोमूत्राचा शेतीत उपयोग केला जातो. वडील हिंमत व बंधू विजय यांची मोलाची साथ लाभते.

हरभरा पिकातील तंत्र

जिल्ह्यात चोपडा तालुक्यात काबुली हरभरा अधिक असतो. त्यातही तापी नदीकाठी त्याचे क्षेत्र अधिक आहे. कांदेबाग लागवडीच्या केळीची काढणी पुढील ऑक्‍टोबरमध्ये संपल्यानंतर दरवर्षी पाच ते १० एकरांत अजय काबुली हरभऱ्याची ठिबकवर लागवड करतात. यंदा आठ एकर क्षेत्र ठेवले असून, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लागवड पूर्ण होईल. अनेकदा कलिंगड घेऊन किंवा काही वेळेस कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्या जागेतही हरभरा घेण्यात येतो. मजुरांकरवी टोकण केली जाते. पाच बाय पाच फूट या अंतरात ठिबकच्या नळ्या असतात. एका नळीनजीक दोन ओळीत पेरणी असते. दोन ओळींमधील अंतर ४५ सेंटीमीटर असते. काही वेळेस मनुष्य चलित यंत्राद्वारेही पेरणी होते. पूर्वी बैलजोडीकरवी नांगरनळीच्या मदतीने दोन ओळी स्वरूपात पेरणी व्हायची.

Indian Agriculture
Chana Farming : मजूरटंचाईसह पाण्याची समस्या झेलत हरभरा केला यशस्वी

यंदा टोकण पद्धतीने अधिकाधिक क्षेत्रात पेरणी केली जाईल. एकरी १५ ते २० किलो बियाणे लागते. बैलजोडीकरवी पेरणीसाठी ३० किलो बियाणे लागते. बीजप्रक्रिया आवर्जून केली जाते. पेरणीनंतर एक वेळेस, त्यानंतर फुटवे स्थितीत व पुढे घाटे पक्व होण्याच्या वेळेस पाणी दिले जाते. पेरणीच्या वेळेस एक गोणी संयुक्त खत, फुटवा तसेच फुले व दाणे पक्व होण्याच्या स्थितीत विद्राव्य खतांचा वापर ठिबकमधून होतो. हवामान पाहून कीडनाशकांची सुमारे दोन ते तीन वेळा फवारणी होते. वातावरण निरभ्र राहिल्यास फवारणीचा खर्च कमी होतो. एक वेळेस बैलांकरवी आंतरमशागत तर एक वेळेस मजुरांकरवी तणनियंत्रण केले जाते. सुमारे ११० ते १२० दिवसांत काबुलीचे उत्पादन हाती येते.

हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर मे किंवा जूनमध्ये मृग बहरातील केळीची लागवड होते. बेवड म्हणून हरभरा फायदेशीर ठरत असल्याने केळीची चांगली वाढ व दर्जेदार उत्पादन साध्य करणेही शक्य असल्याचे निरीक्षण अजय यांनी नोंदविले आहे.

Indian Agriculture
Chana Farming : हरभरा बीजोत्पादनात देशमुखांचे नाव खात्रीचे

काबुलीचे खानदेशात मोठे मार्केट

जळगावातील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा येथील बाजारात काबुली हरभऱ्यास मोठा उठाव असतो. शिरपुरात प्रामुख्याने जागेवर विक्री शेतकरी करतात. मध्य प्रदेशातील इंदूर तसेच गुजरातमधील सुरतलाही शिरपूर येथून जाणे सुकर आहे. त्यामुळे येथील व्यापारी शिरपूरमधील अडतदारांकडून काबुली हरभऱ्याची खरेदी करतात. येथून उत्तर भारतासह गुजरात, राजस्थान आदी भागात हरभऱ्याची पाठवणूक होते. एप्रिल ते जून या कालावधीत मोठी आवक शिरपूर, चोपडा, शहादा येथील बाजारांत होते. एप्रिलमध्ये खानदेशात प्रतिदिन सरासरी ९०० ते १००० क्विंटल आवक होते. लिलावही त्वरित होतात. हॉटेल्स, लग्नसमारंभ तसेच बेसन पीठ आदी विविध कारणांसाठी हरभरा वा बेसन पिठाला महानगरांमधून मोठी मागणी असते. हरभऱ्याचे दर मार्चच्या सुरुवातीला अधिक असतात. त्यानंतर दरांत नरमाई येते. एप्रिलमध्ये पुन्हा त्यात सुधारणा होते.

फायदेशीर अर्थकारण

व्यवस्थापनात असलेली हातोटी व त्यास हवामानाची मिळालेली साथ यातून एकरी आठ ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन अजय साध्य करतात. कापणी व हरभरा संकलित करण्यासाठी एकरी दोन हजार रुपये आणि मळणीसाठी प्रतिक्विंटल २०० रुपये खर्च येतो. कीडनाशके, खते यांवरील खर्च तुलनेने कमी होतो. सर्व बाबी मिळून एकरी सुमारे २२ ते २५ हजार रुपये उत्पादन खर्च येतो.

काबुली हरभऱ्याची वैशिष्ट्ये

काबुली हरभऱ्याचा रंग हलका पांढरट तर आकार अन्य हरभरा वाणांच्या तुलनेत मोठा असतो. मोठ्या काबुलीस खानदेशात मेक्सिको किंवा डॉलर म्हणूनही ओळखले जाते. यात दर अधिक मिळतात. काबुलीमध्ये लहान आकारही उपलब्ध असतो. या पिकातील श्रम, खर्च तुलनेने कमी आहे. वाढ, उंची व फळ-फांद्यांची संख्याही मोठी असते. त्याचे काड टणक असते. त्याचा उपयोग पशुधनास सकस चारा म्हणून केला जातो

अजय पाटील ९५२९८१५८०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com