रवींद्र पालकर, शुभम पाटील, डॉ. अभयकुमार बागडे
गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने होणारा रिमझिम पाऊस, मध्येच पावसाचे खंड पडणे आणि अन्य पोषक हवामानामुळे ऊस पिकावर लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. लोकरी माव्यामुळे उत्पादनात सुमारे २६ टक्क्यापर्यंत घट, तर साखर उताऱ्यात ०.५ ते २.० युनिटने घट होऊ शकते. त्यामुळे या किडीपासून पिकाचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे.
लोकरी माव्याचे शास्त्रीय नाव सेराटोव्हॅकुना लानिगेरा
ओळख
या किडीच्या पंख असलेली व पंख नसलेली अशा दोन्ही प्रकारात प्रौढ कीड आढळते. बिनपंखी लोकरी मावा जास्त नुकसानकारक असतो. मादी किडीच्या पोटातून बाहेर पडणारी प्रथम टप्प्यातील पिले पिवळसर किंवा थोडीशी हिरवट-पिवळसर रंगाची असतात. यांची लांबी सुमारे ०.७७ मि.मी. असून रुंदी ०.२७ ते ०.३८ मि.मी. दरम्यान असते.
ही पिले अतिशय चपळ असून, त्यांच्या पोटाच्या मागील भागात दोन कॉरनिकल्स आढळतात. ही कीड आपल्या बाल्यावस्थेत एकूण चार वेळा कात टाकते. त्यामुळे बाल्यावस्थेचे चार टप्पे होतात. त्यातील तिसऱ्या टप्प्यापासून त्यांच्या पाठीवर पांढऱ्या रंगाचे लोकरीसारखे सूक्ष्म तंतू विकसित होतात.
ते विशेषतः पोटाच्या मागच्या भागात अधिक प्रमाणात दिसून येतात. हे तंतू किडीच्या संरक्षणासाठी तयार होणारे एक प्रकारचे मऊ व सुरक्षित आवरण असते. बाल्यावस्थेतील कीड मुख्यतः पानाच्या खालच्या बाजूला, मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंना चिकटलेली दिसते; मात्र प्रादुर्भाव वाढल्यास ही कीड संपूर्ण पानावर पसरते.
चौथ्या टप्प्यानंतर कात टाकून प्रौढ अवस्था विकसित होते. प्रौढ कीड फिकट पिवळसर रंगाची असून, तिची लांबी साधारणतः २.०९ मि.मी. आणि रुंदी ०.४७ ते ०.७८ मि.मी. दरम्यान असते. प्रौढ किडीला दोन जोड्या पारदर्शक पंख असतात. त्यावर शिरा स्पष्टपणे दिसतात. ही कीड लहान अंतरासाठी उडू शकते. पंखी मावा काळ्या रंगाचा असतो. मादी काळसर असून, पिले फिक्कट हिरवट रंगाची असतात.
जीवनचक्र
या किडीचे प्रजनन थेट पिलांना जन्म देण्याच्या स्वरूपात होते. एक मादी दररोज साधारणतः १५ ते ३५ पिलांना जन्म देते. सुमारे २० दिवसांच्या कालावधीत एक मादी एकूण अंदाजे ३०० पिलांना जन्म देऊ शकते. नवजात पिलांमध्ये माद्यांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अधिक असते. पिलावस्था साधारणतः ६ ते २२ दिवसांची असते, तर प्रौढ अवस्थेचा कालावधी ३२ ते ५७ दिवसांपर्यंत असतो. संपूर्ण जीवनचक्र साधारणतः ३० दिवसांत पूर्ण होते.
पोषक वातावरण व प्रादुर्भावाचा कालावधी
या किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, १९ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेच्या वातावरणात आढळून येतो.
सामान्यतः प्रादुर्भावास जून महिन्यापासून सुरुवात होते. तथापि, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये अधिक पोषक हवामान निर्माण झाल्यास प्रादुर्भावात लक्षणीय वाढ होते.
हिवाळ्यामध्येही किडीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो, तर उन्हाळ्यामध्ये प्रतिकूल हवामानामुळे प्रादुर्भाव फारच नगण्य स्वरूपात राहतो.
मऊ व रुंद पान असणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या आणि जास्त साखर उतारा असणाऱ्या वाणांवर किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो.
पिकाच्या वयानुसारही प्रादुर्भावाच्या तीव्रतेत बदल जाणवतो.
किडीचा प्रसार
या किडीचा प्रसार मुख्यतः जोरदार वाऱ्याच्या प्रवाहामुळे होतो.
कीडग्रस्त पाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यास किडीचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.
गोड रसद्रव्य गोळा करण्यासाठी पिकांवर फिरणाऱ्या मुंग्याद्वारेही या किडीचा प्रसार होतो.
कीडग्रस्त बेण्यांच्या वापरामुळे किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतातून रोपे, अवजारे अथवा इतर सामग्री वाहतूक करताना किडीचा प्रसार नवीन क्षेत्रात होतो.
नुकसानीचे स्वरूप
या किडीची पिले व प्रौढ कीड अणकुचीदार सोंडेच्या साह्याने पानाच्या खालच्या भागातून रस शोषण करतात. रस शोषणाच्या प्रक्रियेनंतर ही कीड मधासारखा चिकट स्राव (हनीड्यू) उत्सर्जित करते. त्यावर कॅम्पोडियम नावाची काळसर बुरशी वाढते. यामुळे संपूर्ण पाने काळसर पडतात आणि अन्न तयार करण्याची (प्रकाशसंश्लेषणाची) प्रक्रिया मंदावते.
कीडग्रस्त पानांवर मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूंना आणि पानांवर पिवळसर ठिपके दिसून येतात. अशी पाने ठिसूळ होतात, कडा कोरड्या पडतात आणि पुढे जाऊन संपूर्ण पान वाळते.
या किडीमुळे उसाचा रस शोषला जातो, परिणामी ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते आणि उत्पादनात सुमारे २६ टक्क्यांपर्यंत घट येते. याशिवाय साखर उताऱ्यातही ०.५ ते २.० युनिटपर्यंत घट होऊ शकते.
एका एकाच पानावर सुमारे ८०० पर्यंत पिले व प्रौढ कीड आढळून येते.
सात महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या उसात तसेच खोडवा उसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक तीव्रतेने जाणवतो.
नियंत्रण
लोकरी मावा नियंत्रण
मावा ग्रस्त उसाच्या बेण्यांचा लागवडीसाठी वापर करू नये.
लागवडीसाठी निरोगी व रोगमुक्त बेण्याचा वापरणे अत्यावश्यक आहे.
पिकात हवा खेळती राहण्यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी.
शेत व बांध स्वच्छ व तणाविरहित ठेवावेत.
नैसर्गिक नियंत्रणासाठी
डिफा ऑफिडिव्होरा, लेडी बर्ड बीटल, मायक्रोमस, क्रायसोपा आणि सिरफीड माशी या परभक्षी कीटकांच्या अळ्या उसावरील लोकरी मावा मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करणे उपयुक्त ठरते.
लोकरी मावा जैविक नियंत्रणासाठी डिफा ऑफिडिव्होरा किंवा कोनोबाश्रा अॅफिडिव्होरा यांचे १००० अळ्या प्रति हेक्टर किंवा मायक्रोमस यांचे २५०० अळ्यांची अंडी, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत दर १५ दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत. यामुळे मावा नियंत्रणास नैसर्गिकरीत्या मदत होते.
-रवींद्र पालकर ८८८८४०६५२२
-शुभम पाटील ७०८३८३९५८९
(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
-डॉ. अभयकुमार बागडे ९४२३२९७०२७,
(विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.