Sharad Pawar | Nana Patole | Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Elections 2024 : ‘मविआ’च्या खांद्यावर काँग्रेसचे ओझे!

Maha Vikas Aghadi News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार काय, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. हरियाणातील काँग्रेसच्या पराभवाची कारणे जसजशी पुढे येत आहेत, तसतसा महाविकास आघाडीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष हा ओझे ठरणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

Team Agrowon

सुनील चावके

Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार काय, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. हरियाणातील काँग्रेसच्या पराभवाची कारणे जसजशी पुढे येत आहेत, तसतसा महाविकास आघाडीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष हा ओझे ठरणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील चमकदार कामगिरी सोडली तर महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शरद पवार यांच्या करिष्म्याने तारले आणि राज्यातील सत्तांतरामध्ये समान वाटाही मिळवून दिला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरे-पवार यांची खंबीर भाजपविरोधी भूमिका आणि जनाधाराच्या रेट्यामुळे महाराष्ट्रात १३ जागा जिंकणारा काँग्रेस सर्वांत मोठा लाभार्थी ठरला. पण महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसचे हे मानसिक समाधान हरियाणातील धक्कादायक आणि लाजिरवाण्या पराभवाने हिरावून घेतले.

जागावाटपावर परिणाम हरियाणाच्या निकालाने काँग्रेसची अशी काही अवस्था केली, की महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मनात आपल्या मित्रपक्षाच्या जिंकण्याच्या क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होण्यापूर्वीच बाजू लंगडी झालेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा लढण्याची महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी लागणार आहे.

हरियाणामध्ये सोनिया-राहुल-प्रियांका यांनी ९० पैकी ८० टक्के जागांचा नजराणा एकट्या भूपिंदरसिंह हुडांना दिला होता.

महाराष्ट्रात तसे वर्चस्व नाना पटोले किंवा इतर कुठल्याही काँग्रेस नेत्याला गाजवता येणार नाही. मुख्यमंत्रिपदावरून आपली उद्धव ठाकरे यांच्याशी सुप्त स्पर्धा असल्याचे पटोले भासवत असले, तरी जिल्ह्या- जिल्ह्यांतील प्रभावी काँग्रेस नेत्यांचेच त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता नाही.

ठाकरे-पवार यांना वचकून असल्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांचा अपवाद वगळता दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठीही महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे हरियाणातील काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरलेले के. सी. वेणुगोपाल, अजय माकन, दीपक बाबरिया यांच्यासारख्या ‘नावाजलेल्या’ नेत्यांची वर्दळ महाराष्ट्राच्या निवडणुकीत कमीच असेल. महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळ हरियाणाच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त आहे.

शिवाय प्रमुख ‘मविआ’च्या खांद्यावर काँग्रेसचे ओझे ! प्रतिस्पर्धी पक्षांची संख्याही तिप्पट आहे. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत नाही. मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ४२ आणि ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला जागावाटपात झुकते माप देणे म्हणजे अत्यंत चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीवर संकट ओढवून घेणे ठरेल, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आहे.

काँग्रेस जिंकणार याची खात्री पटली की वरिष्ठ नेत्यांमधील हेवेदावे, तिकिटांसाठी सौदेबाजी, बंडखोरी, पाडापाडी, जेमतेम बहुमत मिळेल अशी परिस्थिती निर्माण करणे, प्रतिस्पर्धी पक्षांशी छुपी हातमिळवणी करणे, अशा राजकारणाला ऊत येतो. मग कलचाचणीत ‘मिळणारा’ विजय ‘मतदानोत्तर कलचाचणी’तही टिकत नाही. भाजपसारख्या प्रतिस्पर्धी पक्षाशी थेट लढत असेल, तर जनाधार पाठिशी असूनही काँग्रेसचा हमखास धुव्वा उडतो.

‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रां’मधून कमावलेल्या राजकीय विश्‍वासार्हतेचे रूपांतर काँग्रेसच्या मोठ्या यशात करण्यात राहुल गांधींचे नेतृत्व कमी पडले ते याच कारणांमुळे. काँग्रेस पक्षात दिल्लीत तसेच राज्याराज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या सहकाऱ्यांचा दूरवर पसरलेला ‘लौकिक’ राहुल, सोनिया, प्रियांका किंवा मल्लिकार्जुन खरगे यांना ठाऊक नाही, अशातला भाग नाही.

काँग्रेसला निवडणुकांमध्ये तोंडघशी पाडणाऱ्या या नेत्यांना खड्यासारखे दूर करण्यासाठी लागणारे सामर्थ्य गांधी कुटुंबीयांना दाखवता आलेले नाही. पायावर कुऱ्हाड कुठलेही राजकीय कर्तृत्व नसलेल्या नेत्यांकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदांसारखी महत्त्वाची पदे सोपवून निवडणुकांच्या राजकारणात पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची काँग्रेस पक्षश्रेष्टींना खोडच लागलेली आहे.

राहुल गांधी यांचा सर्वाधिक विश्‍वास असलेले वेणुगोपाल अशा नेत्यांचे नेतृत्व करीत आहेत. निवडणुकांमध्ये पूर्वसंचितावर मिळणाऱ्या जनाधाराच्या आधारे सत्तेत येण्याचे किमान राजकीय कौशल्यही काँग्रेसपाशी उरलेले नाही. हे रे सर्व अवगुण हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांतील काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे नव्याने अधोरेखित झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत जेमतेम ९९ जागा जिंकून डोक्यात हवा गेलेल्या काँग्रेसला हरियाणाच्या निकालांनी महाराष्ट्रात जमिनीवर आणले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपविरुद्ध सर्वांत चांगली कामगिरी महाराष्ट्रात बजावली होती. पण त्यावर हरियाणाने पाणी फिरवले. या पार्श्ववभूमीवर महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे ओझे घेऊन ठाकरे-पवार यांच्या महाविकास आघाडीला यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा काँग्रेस लढविणार नाही, हे महाविकास आघाडीचे सुदैवच. काँग्रेसचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन जागावाटपात झेपतील तेवढ्याच जागा दिल्या तरच पूर्णपणे बदललेल्या राजकीय वातावरणात महाविकास आघाडीला महायुतीविरुद्ध विजयाची आशा बाळगता येईल. महाविकास आघाडीचे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी काँग्रेसची अवाजवी महत्त्वाकांक्षेला कात्री लावून जागांचे वाटप करण्याची नवी डोकेदुखी ठाकरे-पवार यांच्यापुढे निर्माण झाली आहे.

विधानसभेच्या ६२ जागा असलेल्या विदर्भात मुख्यतः भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत असेल. मराठवाड्यातील ४६ जागांसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चांगलीच स्पर्धा असेल. मुंबई-कोकणात काँग्रेसला सहजपणे गमावण्यासाठी जागा सोडणे ठाकरेंना परवडणार नाही.

पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसच्या अवाजवी मागण्यांना रोखण्याचे आव्हान शरद पवार यांच्यापुढे असेल. काँग्रेसच्या अतिमहत्त्वाकांक्षेला केवळ जागावाटपातच नव्हे तर प्रचारातही आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

राहुल आणि प्रियांका यांना महाराष्ट्रातील प्रचाराचा फारसा अनुभव नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल-सोनिया-प्रियांका महाराष्ट्राकडे फिरकले नव्हते. पण लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशामुळे राहुल-प्रियांका प्रचारात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या प्रचारात एकवाक्यता ठेवण्याचेही काम ठाकरे- पवार यांनाच करावे लागणार आहे. हरियानाच्या निकालाने महाविकास आघाडीचे गणित बिघडवले यात शंकाच नाही.

सुनील चावके

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्लीतील ब्यूरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT