Amravati News : बांगलादेशकडून संत्रा आयात शुल्कात सातत्याने वाढ केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्यातीसाठी एकाच देशावर अवलंबून न राहता इतर पर्यायांची चाचपणी करून संत्रा बागायतदारांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता सोमवारी (ता.२९) वाणिज्य मंत्रालयस्तरावर बैठक घेणार असल्याची ग्वाही वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यापारी व बागायतदारांना दिली.
इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनचे अध्यक्ष सोनू खान, ताज फ्रूट कंपनीचे ताज खान, श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार, संचालक प्रमोद पाटील, आमदार देवेंद्र भुयार, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. संसद भवन येथील वाणिज्य मंत्रालयात ही भेट झाली. या वेळी राज्यात सुमारे दीड लाख हेक्टर तर एकट्या अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्टर संत्रा आहे.
आंबिया आणि मृग मिळून दहा लाख टन उत्पादकता आहे. आंबिया हंगामात साडेपाच ते सहा लाख टन संत्रा फळांचे उत्पादन होते. यातील दीड लाख टन संत्रा फळांची निर्यात बांगलादेशला होते. त्यामुळे उर्वरित फळांना देशांतर्गंत बाजारपेठेत चांगला दर मिळतो. गेल्या तीन वर्षांत बांगलादेशने सातत्याने भारतीय संत्र्याच्या आयातीवर शुल्क वाढ केली आहे. गेल्या वर्षी ८८ टका (बांगलादेशी चलन) असलेले आयात शुल्क आता १०१ टका करण्यात आले आहे. त्यानुसार प्रती किलो ७१ रुपये आयात शुल्कापोटी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे निर्यात प्रभावित होण्याची भीती असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
हे सुचविले उपाय
व्यापारी व बागायतदारांशी संवाद साधल्यानंतर पीयूष गोयल यांनी नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशनचे विरेंद्र सिंग यांना फेडरेशनमार्फत हंगामात संत्रा खरेदी शक्य आहे का, याबाबत विचारणा करून सविस्तर अहवाल मांडण्यास सांगितले. बांगलादेश दूतावासातील निर्यात कक्ष प्रमुखांशी संपर्क साधण्यात आला.
आंबिया बहरातील संत्रा सप्टेंबरमध्ये निघण्यास सुरुवात होणार आहे. या वेळी बंपर उत्पादकतेचा अंदाज आहे. त्यामुळे निर्यात न झाल्यास दर कोसळून ते १६ ते २० रुपये किलोवर येतील अशी भीती आहे. यामुळे बागायतदारांचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी निर्यात संदर्भाने सकारात्मक चर्चा झाली. सोमवारी (ता.२८) बैठकीअंती दिलासादायक परिणाम समोर येतील, अशी अपेक्षा आहे.रमेश चिजकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.