Fruit Crop Farming : मोसंबी, संत्रा, केसर फळपिकांसह रोपवाटिकेतून मिळाली भक्कम साथ

Agriculture Update : लिंबगाव (रेल्वे स्थानक) (जि. नांदेड) येथील विपुल कदम यांनी मोसंबी, संत्रा, केसर आंबा यांच्या लागवडीसह रोपवाटिका व्यवस्थापनातून आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.
Vipul Kadam and Agriculture
Vipul Kadam and AgricultureAgrowon
Published on
Updated on

कृष्णा जोमेगावकर

Farmer Success Story : नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव (रेल्वे स्थानक) हे फळपिकांसाठी प्रसिद्ध गाव. संत्रा, मोसंबी, आंबा, पेरू, जांभूळ यांसारखी फळपिकांची लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा विशेष भर असतो. फळबाग लागवडीसह फळपिकांच्या रोपवाटिकाही देखील या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. याच गावातील पॉलिटेक्निक झालेले तरुण शेतकरी विपुल भास्करराव कदम यांनी १४ एकरांमध्ये मोसंबी, संत्रा, आंबा या फळपिकांसह रोपवाटिकेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.

फळबाग आणि रोपवाटिकेच्या शाश्‍वत सिंचनासाठी एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यासह कूपनलिका व विहिरीची सोय केली आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊन फळबाग लागवडीमध्ये योग्य नियोजनातून दरवर्षी आठ ते बारा लाख लाख, तर रोपवाटिकेतून आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे विपुल कदम सांगतात.

वडिलोपार्जित फळबाग लागवड

विपुल कदम यांचे पणजोबा शिवरामजी कदम यांच्यापासून शेतात फळबाग लागवड आहे. त्यानंतर त्यांचे वडील भास्करराव व चुलते संजय कदम यांनी संत्रा, मोसंबी लागवड करून फळपिकांची रोपवाटिका उभारली. यातून कुटुंब स्थिरावले. सध्या विपुल यांच्याकडे दहा एकर मोसंबी, तर एक एकरांत संत्रा बाग आहे.

दोन्ही बागा उत्पादनक्षम असून दर्जेदार फळांचे उत्पादन मिळत आहे. मागील आठवड्यात प्रतिटन ३५ हजार रुपये दराने मोसंबीची विक्री करण्यात आली आहे. या सोबतच अर्धा एकरातील केसर आंबा बागेतून मागील वर्षापासून उत्पादन सुरू झाले आहे. शेती कामांसाठी दोन सालगडी ठेवले आहेत. विपुल यांना वडील भास्करराव कदम यांचे शेतीमध्ये मोलाचे मार्गदर्शन मिळते. असे विपुल यांनी सांगितले.

Vipul Kadam and Agriculture
Fruit Crop Farming : तेंडोळीच्या वानखडे यांनी धरली फळबागांची कास

चार टप्प्यांत मोसंबी लागवड

दहा एकरांतील मोसंबी बागेत सुमारे १३४० झाडे आहेत. ही लागवड चार टप्प्यांत करण्यात आली आहे. वडील भास्करराव कदम यांनी १९८८ मध्ये १६ एकरांमध्ये लागवड केलेल्या मोसंबीपासून २००३ पर्यंत उत्पादन मिळत होते. पुढे २००० मध्ये दोन एकरांत १८ फूट बाय १८ फूट अंतरावर न्यूसेलर या मोसंबी वाणाची लागवड केली. त्यात एकरी १३८ झाडे बसली. या वाणाची २००६ मध्ये साडेचार एकरांत, तर २०१० मध्ये अडीच एकरांमध्ये लागवड केली. ही लागवड ९ फूट बाय १४ फूट अंतरावर आहे. ही लागवड मोसंबीच्या फुले वाणाची आहे. तसेच २०१० मध्ये एक एकरमध्ये संत्र्याची १२ फूट बाय १२ फूट अंतरावर नागपुरी (एनआरसी) या वाणाची लागवड केली.

संत्रा, मोसंबीत आंबिया बहरावर भर

मोसंबी व संत्रा बागेत दरवर्षी आंबिया बहर धरला जातो. त्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीपर्यंत बाग ताणावर सोडली जाते. ताण तोडताना पहिले पाटपाणी देऊन सेंद्रिय खतांसह रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. फुलोरा येण्यास सुरुवात झाल्यानंतर सूक्ष्म सिंचन करण्यावर भर दिला जातो. जमिनीच्या प्रकारानुसार सिंचन करण्यावर भर दिला जातो. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार फळांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो, असे विपुल सांगतात.

संतुलित खत व्यवस्थापनाचे नियोजन

दोन्ही फळबागांना दरवर्षी एकरी दोन ते तीन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत दिले जाते. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात १९:१९:१९, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांच्या प्रति झाड मात्रा देऊन पाटपाणी दिले जाते. त्यानंतर जून-जुलै महिन्यांत डीएपी, एमओपी, युरिया या प्रमाणे खतांचा दुसरा डोस दिला जातो, असे विपुल कदम सांगतात.

Vipul Kadam and Agriculture
Farmer Success Story : मेंढपाळ ते यशस्वी बागायतदाराची कहाणी

पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन

फळबाग आणि रोपवाटिकेला शाश्‍वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्याशिवाय कूपनलिका व विहिरीची सोयदेखील करण्यात आली आहे. जमिनीच्या प्रकारानुसार सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. फळबागांमध्ये सूक्ष्मसिंचन पद्धतीवर भर दिला जातो. साधारणपणे जानेवारी ते मे महिन्यापर्यंतच्या कालावधीत काटेकोरपणे सिंचन व्यवस्थापन केले जाते. जानेवारी महिन्यात ६० लिटर, फेब्रुवारी महिन्यात ७० लिटर, मार्च महिन्यात १०० लिटर, एप्रिल महिन्यात १२० लिटर आणि मे महिन्यात १२५ लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड याप्रमाणे दिले जाते. यासोबतच वखरणी करून बाग तणविरहित ठेवल्यामुळे बागेत किडींचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली आहे.

टप्प्याटप्प्याने उत्पादन सुरू

विपुल कदम यांनी २००० मध्ये लागवड केलेल्या दोन एकरांतील मोसंबीचे उत्पादन मागील पंधरा ते सोळा वर्षांपासून सुरू झाले. यानंतर लागवड केलेल्या संत्रा व मोसंबीच्या बागेपासून टप्प्याटप्प्याने उत्पादन सुरू झाले. मागील वर्षी २०२३ मध्ये त्यांच्या बागेपासून ४५ टन मोसंबी निघाली. यास व्यापाऱ्यांनी खरेदी २६ हजार प्रतिटन प्रमाणे खरेदी केले.

एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे

शाश्‍वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत १०० फूट रुंद, १०० फूट लांब व १४ फूट उंच अशा आकाराचे शेततळे खोदले आहे. अवर्षणाच्या काळात या शेततळ्यातील पाण्याचा उपयोग फळबागेला होतो. या शेततळ्यामध्ये पावसाच्या काळात विहीर, कूपनलिका तसेच कालव्याचे पाणी साठविले जाते.

रोपवाटिकेचा बळकट आधार

विपुल यांचे वडील भास्करराव कदम यांनी १९९४ मध्ये फळपिकांची रोपवाटिका सुरू केली. मुख्य रस्त्यावर दीड एकर क्षेत्रात रोपवाटिका विस्तारली आहे. येथे मोसंबी, संत्रा या फळपिकांच्या विविध जातींची रोपे तयार केली जातात. तसेच दहा गुंठे क्षेत्रामध्ये शेडनेट उभारून त्यात केसर आंब्याच्या रोपांची नर्सरी उभारली आहे. रोपवाटिकेतून विपुल कदम यांना वर्षाकाठी दहा लाख रुपयांचे उत्पादन होते.

विपुल कदम, ९५९५५५०८५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com