Palghar News : तालुक्यात पारंपरिक शेती केली जाते. शेती करताना जनावरांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, बेसुमार वृक्षतोड, बदलते वातावरण आणि महत्त्वाचे म्हणजे जंगल परिसरात लागणारे वणवे यामुळे येथील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटिल बनला आहे. सध्या वणवा लागू नये, यासाठी वन क्षेत्रालगत जाळरेषा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
काही वर्षांपासून तालुक्यात डोंगरांना आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल दरम्यान तालुक्यातील डोंगररांगा काळवंडलेल्या अवस्थेत दिसून येतात. डोंगरकपारी व दऱ्या-खोऱ्यांत असणारे गवत जपले, तरच टंचाई काळात जनावरांना काही प्रमाणात चारा उपलब्ध होईल.
त्यामुळे प्रत्येक वर्षी होणारे हे वणव्याचे अग्नितांडव रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्रातही लोकांनी जाळरेषा काढल्या, तर आगींचे प्रमाण कमी होऊन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत होईल. डोंगरावर प्रतिवर्षी वणवे का लागतात. हे आता गुपित राहिलेले नाही. बऱ्याचदा अतिक्रमण आणि वन्य प्राण्यांची शिकार सोपी व्हावी, यासाठी वणवे लावले जातात.
मात्र, अनेकदा उत्तम प्रतीचे गवत मिळते. या समजुतीतून ग्रामीण भागात डोंगरावर वणवे लावले जातात. काही वेळा शेतातील पाला-पाचोळा पेटवत असताना ती आग जंगलात लागते. त्यातून वनसंपदेचा नाश होण्यासह प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात येते.
या आगीपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. जाळरेषा काढल्या जातात. उन्हाळा सुरू झाल्याने जव्हार वनपरिक्षेत्रांतर्गत वनक्षेत्रासह खासगी क्षेत्रात वणवा लागू नये, यासाठी वन क्षेत्रालगत जाळरेषा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जंगलाला आग लावणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा
यावर्षी गवत जाळले, तर पुढील वर्षी चांगले येते, हा नागरिकांचा गैरसमज आहे. गवत रानात शिल्लक राहिले, तर त्याचे खत होते. त्यांच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
पावसाळा सुरू होईपर्यंत प्राण्यांना चारा म्हणून उपयोगी पडते. गवत जाळल्यास जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. जमिनीत पुरेसे पाणी मुरत नाही. त्यामुळे गैरसमज करून लोकांनी जंगलाला आग लावू नये. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार वणवा लावणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे,असे मत वन अभ्यासक जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.