Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शरद पवारांनी निवृत्तीचं पाऊल का उचललं?

सुनील तांबे

सुनील तांबे

Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यावर सभागृहातील कार्यकर्त्यांना धक्का बसला. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मेहबूब शेख यांनी ताबडतोब नाराजी प्रकट केली आणि राजीनाम्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. अंकुश काकडे यांनीही उभं राहून हीच मागणी केली. त्यामुळे कार्यकर्ते सावरले आणि शरद पवारांचा जयजयकार करणार्‍या घोषणा सुरु झाल्या. 

पक्षाच्या एकाही नेत्याला विश्वासात न घेता शरद पवारांनी ही घोषणा केली होती. अजितदादा यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की हा निर्णय शरद पवार मागे घेणार नाहीत. ही घोषणा वास्तविक कालच ते करणार होते परंतु काल महाविकास आघाडीची सभा असल्याने त्यांनी हा निर्णय आज जाहीर केला. 

पवार साहेब हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा पक्ष चालेल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खार्गे आहेत परंतु तो पक्ष सोनिया आणि राहुल यांच्याकडे पाहूनच चालतो, अशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असेल.

कधीतरी ही वेळ येणारच होती, शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसारच नव्या अध्यक्षाची निवड होईल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच नवा अध्यक्ष पक्षाचा कारभार करेल, त्या अध्यक्षाच्या पाठिशी आपण सर्वांनी उभं राह्यलं पाहीजे. भावनिक होण्यात फारसा अर्थ नाही, असं अजितदादांनी स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना सुनावलं परंतु त्यांच्या भूमिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशीच मागणी कार्यकर्ते करत राह्यले. अजितदादा, प्रफुल्ल पटेल इत्यादी नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांशी आम्ही सर्व प्रमुख नेते चर्चा करून मार्ग काढू आता पवार साहेबांना भोजनाची, विश्रांतीची गरज आहे. आजच आम्ही त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असा निर्वाळा त्यांनी दिला तरिही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. 

शरद पवार, त्यांच्या पत्नी, अजितदादा आणि सुप्रिया  हे पवार कुटुंबिय अविचल आणि रिलॅक्स्ड दिसत होते. अजितदादांनी केलेला खुलासा पाहाता, आपल्या निर्णयाची कल्पना शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांना दिली होती असं दिसतं.१९ एप्रिल रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पुढील पंधरा दिवसात दोन मोठ्या राजकीय भूकंपाचा इशारा दिला होता. त्यातील एक राज्यात आणि दुसरा दिल्लीत. त्यामुळे पवारांच्या निवृत्तीची घोषणा आधीच ठरलेली होती.

शरद पवारांनी हे पाऊल का उचललं असावं...

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वपक्षीय नेते या प्रतिमेकडे त्यांची वाटचाल २०१४ साली सुरु झाली होती. २०१९ साली महाविकास आघाडीची मोट बांधून त्यांनी भाजपला फटका दिला. मात्र त्यानंतर पुन्हा ते याच भूमिकेत शिरले.

मुख्यमंत्री कोणीही असो, महत्वाच्या प्रश्नावर शरद पवारांशी सल्लामसलत करतो. बारसू येथील आंदोलकांनी शरद पवारांची काल भेट घेतली, त्यावेळी राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीही शरद पवारांना फोन करून सरकारची भूमिका विशद केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वपक्षीय नेते ही प्रतिमा व भूमिका त्यांना भावली असावी. 

२. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मूलतः मराठा-कुणबी समाजाचा परंतु ओबीसी, अल्पसंख्य, दलित यांनाही नेतृत्वामध्ये स्थान देणारा आहे असं पक्षचं पोझिशनिंग शरद पवारांनी केलं आहे. या पक्षातील नेत्यांचे अर्थ-राजकीय हितसंबंध केंद्र आणि राज्य सरकारशी घट्टपणे जोडलेले आहेत.

त्यामुळे हा पक्ष कोणत्याही सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका अपवादात्मक परिस्थितीत आणि तीही संबंधीत प्रश्नापुरतीच घेतो. कारण विकासाच्या राजकारणाशी हा पक्ष घट्टपणे निगडीत आहे. एका तालुक्यातून दररोज १० हजार लीटर दुधाचं संकलन होतं असेल तर दररोज त्या तालुक्यात किती पैसा येत असेल याची कल्पना करा.

या दुधावर प्रक्रिया करावी लागते. काही तास वीज पुरवठा बंद पडला तर या दूध संघांचं किती आर्थिक नुकसान होईल याचा विचार करा.

साहजिकच हा सामाजिक आधार असणारा राजकीय पक्ष रस्त्यावरच्या लढाईत फारसा उत्सुक नसतो. त्यामुळे विरोधी पक्षात असताना राजकीय चतुराईने आपली सत्तास्थानं-- दूध संघ, सहकारी साखर कारखाने व शेती कर्ज देणार्‍या प्राथमिक सहकारी संस्था, इत्यादी ताब्यात ठेवण्याला प्राधान्य असतं.

राजकीय समीकरणं मांडून राज्यातील सत्तेत सहभागी होण्याची संधीही आपल्या सामाजिक आधारामुळे हा पक्ष शोधत असतो. अशा परिस्थितीत, पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर शरद पवारांची वैयक्तीक प्रतिमा सेक्युलर, सत्यशोधकी राहाते आणि पक्षाचे नेते त्यांच्या सामाजिक आधारानुसार राजकीय भूमिका घ्यायला मोकळे होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT