Banana Production
Banana Production Agrowon
ॲग्रो विशेष

हवामान बदलामुळे केळी नाहीशी होणार का ?

Team Agrowon

गरिबांचं फळ म्हणून ओळखली जाणारी केळी येत्या काही वर्षांत नाहीशी होईल की काय, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे. याला कारण आहे हवामान बदलाचं (क्लायमेट चेंज Cliamate change) संकट. जगभरातच वाढत्या तापमानामुळे केळीवर संकट ओढवलं आहे. परंतु सगळ्यात मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. २०५० नंतर भारतातील केळी उत्पादनात घट व्हायला सुरुवात होईल, असा संशोधकांचा कयास आहे.

कृषी अभ्यासकांच्या मते हवामान बदलात टिकाव धरण्याची क्षमता केळी या पिकामध्ये नाही. सध्या जगभरातील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे केळीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 'नेचर क्लायमेट चेंज' मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार तापमानातील सततच्या वाढीमुळे काही भागात केळी काढणीस उशीर होण्याचा अंदाज आहे. तर काही देशांत काढणी उलटण्याची शक्यता आहे. २०५० नंतर अनेक देशांत केळीच्या उत्पादनात हेक्टरी ०.५९ ते ०.१९ टन घट होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

भारतात केळी हे अत्यंत लोकप्रिय फळ आहे. जगातील प्रमुख केळी उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. जगात केळीचे सगळ्यात जास्त उत्पादन आणि खप भारतातच होतो. देशातल्या सगळ्या प्रातांमध्ये मिळणारे हे फळ अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. तसेच केळीचा दरही कमी असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला हे फळ परवडते. देशातील केळीच्या व्यावसायिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्‍के आहे. परंतु केळीच्या जैवविविधतेच्या बाबतीत केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. या राज्यांत केळीच्या अनेक जाती पिकवल्या जातात.

केळीच्‍या 86 टक्‍केहून अधिक उपयोग खाण्‍याकरीता होतो. पिकलेली केळी उत्‍तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीसाठी वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्‍बा, टॉफी, जेली इत्‍यादी पदार्थ बनवले जातत. वाळलेल्‍या पानाचा उपयोग आच्‍छादनासाठी करतात. केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्‍हणून उपयोगात आणतात. केळीच्‍या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्‍ह म्‍हणून उपयोग केला जातो.

केळीमध्‍ये कर्बयुक्‍त पदार्थचा भरपूर साठा असतो. केळीत 18 ते 20 टक्‍के शर्करा, स्निग्‍ध पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह खनिजे, ब जीवनसत्‍व यांचा आंतर्भाव असतो. कच्‍या फळात टॅनीन व स्‍टार्च मोठ्या प्रमाणावर असते. केळी पिकापासून 79 कॅलरीपर्यंत उष्‍णता मिळू शकते. केळीचे फळ मधुमेह, संधीवात मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्‍यादींवर गुणकारी मानले जाते.

फुड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) माहितीनुसार, २०१० ते २०१७ च्या दरम्यान भारतात वर्षाकाठी २९ दशलक्ष टन केळी पिकवली गेली. देशात सरासरी हेक्टरी ६० टन केळीचे उत्पादन घेतले जाते. वाढत्या तापमानामुळे केळीच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूक केली नाही तर स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. देशात २०५० नंतर केळी उत्पादनात मोठी घट व्हायला सुरुवात होईल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले.

एक्सेटर विद्यापीठातील संशोधनानुसार भारत, ब्राझील व इतर सात देशांमधील केळी पिकाला हवामान बदलाचा जबर फटका बसू शकतो. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे अधिक नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. भारतासारख्या देशात तंत्रज्ञान आधारित उत्पादनवाढीचे उपक्रम हाती घेतले तरच हे नुकसान कमी करता येईल, असे या संशोधन अहवालात म्हटले आहे.

जगभरात सुमारे ४० कोटी लोकांच्या रोजच्या आहारात केळी असते. त्यामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्यास अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अमेरिका आणि नेदरलँडमधील अभ्यासकांच्या मते जगभरात केळीच्या रोपांना बुरशीचा संसर्ग होत आहे. हा संसर्ग वेळीच रोखला नाही तर उत्पादनात मोठी घट येणार, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT