Rural Empowerment : स्थळ कळसूबाई पर्वतरांगेतील दुर्गम कुलंग गड. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील घाटघर गावात सहावीत शिकणारा एकनाथ या गडावर उत्सुकतेने आलेला. तो थकलेला आणि भूकही लागलेली. अठरा विश्वे दरिद्र्य असलेल्या एकनाथच्या घरात पुरेशी भाकरीही नव्हती. त्यामुळे सोबत अन्नदेखील नाही. याचवेळी एक पर्यटक येतो. तो एकनाथला पाव आणि थोडे फ्रूटजॅम देतो. भुकेल्या पोटाला पाव मिळताच एकनाथ आनंदित होतो. काही तरी पुन्हा अन्न मिळेल, या आशेने एकनाथ सतत गडावर जाऊ लागतो. .१३ एकर शेती असूनही भात सोडून काहीच पिकत नसल्याने एकनाथचे वडील नारायण खडके शेतमजुरी, सुतारी करीत होते. पोटासाठी ते पत्नीला घेऊन माहुलीच्या जंगलातून ४० किलोमीटर पायपीट करीत बांबूमोळी आणत. बांबूच्या टोपल्या बाजारात विकून ते एकनाथला मोठे करीत होते. एकनाथ जिद्दीने शाळा शिकत होता. त्याला गडाचा इतका लळा लागला की कधी कधी तो बैलाचा कासरा सोडून त्या दोरीने गड चढून जात असे. खडके परिवाराला नियतीने साथ देण्याऐवजी आणखी नागवले..कारण घाटघर जलविद्युत प्रकल्पात एकनाथची ५ एकर जमीन गेली. त्यामुळे खडके परिवाराची गरिबी वाढत होती. जगण्यासाठी आईवडिलांचा संघर्ष पाहून एकनाथने दहावीनंतर शिक्षण सोडले. तो १२० रुपये हजेरीने एका कंपनीत कामगार बनला. घरात ५० शेळ्या होत्या. एकनाथची आई सारे घरकाम करीत गुरांचा सांभाळ करता करता थकून जात असे. त्यामुळे एकनाथच्या लग्नासाठी वडिलांनी मुलीचा शोध चालू केला. गावचेच शेतकरी कृष्णा उल्हास बांगड यांच्या घराजवळ हा शोध थांबला. त्यांची मुलगी चंद्रभागा सून करण्याचे नारायण खडके यांनी ठरवले. चंद्रभागेचे नाव बदलून पार्वती ठेवले गेले आणि पार्वती एकनाथची जीवनसाथी बनली..Inspiring Farmer Story: वाघदऱ्याच्या गुहेतील वाघ अन् वाघीण.पार्वतीने बसवली घडीएकनाथ इकडे आता पर्यटकांना दुर्गम भागात वाटा दाखविण्याचे काम करीत चांगला रोज कमवू लागला. पार्वती येताच तिनेही एकनाथच्या जीवनाची घडी बसवली. सारे घरकाम करीत जनावरांचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले. तिने एकनाथला साथ दिली. ‘‘तुम्ही इकडेतिकडे नोकरी शोधण्यापेक्षा आता दऱ्याडोंगरात येणाऱ्या पर्यटकांकडेच लक्ष द्या. तुम्ही चांगले वाटाड्या म्हणून काम केल्यास लोक पैसे देतील. आपला संसार सुखाने चालेल. तुम्ही घराची काळजी करू नका. ती जबाबदारी मी सांभाळते,’’ असा सल्ला तिने एकनाथला दिला..त्यामुळे एकनाथला बारा हत्तींचे बळ आले. तो सतत पर्यटकांना शोधू लागला. त्यांच्यासोबत अनेक दिवस जंगलात, डोंगरांवर राहू लागला. त्याने गिर्यारोहणाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. ३० हजार रुपयांची तांत्रिक सामग्री खरेदी केली. यामुळे पर्यटक खूष झाले व एकनाथला सोबत नेण्यासाठी पसंती देऊ लागले..एकनाथ व पार्वतीचे कष्ट जुळून आल्याने आता खडके परिवारात महिन्याला ३०-४० हजार रुपये जमू लागले. यातून दोघांनी मुलाबाळांचा चांगला सांभाळ केला. मुलगा रवींद्र चौदावीपर्यंत शिकला, तर मुलगी शीतल बारावीपर्यंत शिकली. मुलांनीही आईवडिलांचे कष्ट पाहून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. शीतलने आईला घरकामात साथ देत पर्यटकांना जवळच्या ठिकाणी वाटाड्याचे काम सुरू केले..Inspirational Rural Story: एक स्वप्न... गणेश आणि सपनाचं!.मुलगादेखील वाटाड्या बनलाएक दिवस एकनाथ त्याच्या मुलाला म्हणाला, ‘‘बेरोजगारी वाढत चालली आहे. नोकरीच्या मागे लागून घर, गाव सोडून शहरात जावे लागेल. तेथेही संघर्ष थांबणार नाही. त्यापेक्षा तू माझ्यासारखा डोंगरातला वाटाड्या हो. पर्यटकांना जीव लाव आणि ते तुला चांगले पैसे देतील.’’ रवींद्रने बापाचा सल्ला ऐकला आणि तोदेखील बापासारखाच ‘गाइड’ बनला. सगळे घर वाटाड्याचे बनल्याने आता एकनाथ आणि पार्वतीला सुखाचा मार्ग सापडला आहे. त्यांनी रवींद्रचे थाटात लग्न लावले. गावात मनाजोगते नवे घर बांधले आहे..एकनाथ म्हणतो, ‘‘डोंगरात एका पर्यटकाने दिलेल्या पावाच्या तुकड्याने माझे जीवन बदलले. आता याच पर्यटकांना पोटभर, चविष्ट भाजीभाकरी खाऊ घालण्याचं माझं स्वप्नं आहे. त्यासाठी कधीतरी एक छोटे हॉटेल बांधण्याचे माझे स्वप्न आहे. डोंगरातील लोकांना २४ वर्षे वाटा दाखविणारे माझे पाय एकदिवस थकतील; तेव्हा त्याची जागा माझ्या मुलाचे पाय घेतील. ‘‘बेस्ट वाटाड्या ऑफ द इयर २०२४’ हा पुरस्कार मिळाला तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा ठरला..आयुष्यात मी पैसा नाही; पण मी लाख मोलाचे सह्याद्री मित्र कमावले आहेत. त्यामुळे माझं आयुष्य सार्थकी लागले आहे.’’ एकनाथच्या या मनोगताने मी थक्क झालो. या आधुनिक भारतात डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, बिल्डरचा मुलगा बिल्डर, राजकीय नेत्याचा मुलगा लिडर बनतो आहे. पण दुर्गम घाटघरमधील चित्र वेगळे आहे. तेथे सुखी संसाराची वाट शोधलेल्या एकनाथ-पार्वतीच्या संसारात वाटाड्याचा मुलगा ‘गाइड’ होताना दिसतो आहे.- एकनाथ खडके, ९५२७९१७९३९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.