Gaganvihari Padhye Agrowon
ॲग्रो विशेष

Gaganvihari Padhye : पुस्तक आणि बातम्या वाचून शेती कोण करतं?

Team Agrowon

गगनविहारी पाध्ये

Agriculture Article : ज्ञान घेऊन केली यशस्वी शेती ‘पुस्तके आणि बातम्या वाचून कोण शेती करतं का?’ असे टोमणे अनेकांकडून ऐकायला मिळाले. मी शिकलेल्या नवीन गोष्टींची, व्यवस्थापनातील बाबींची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर नाके मुरडली जायची. हे पुस्‍तकी ज्ञान शेतात उपयोगाचे नाही असाच त्यांचा दृष्टिकोन असायचा. अखेर इतरांना या ज्ञानामध्ये फारशी रुची नाही, हे जाणून मी माझे प्रयोग स्वतः करण्याला प्राधान्य दिले.

ॲग्रोवनमुळे माती परीक्षणाचे महत्त्व कळाले. पहिल्यांदा सरीचे अंतर वाढविण्याचा प्रयोग केला. पारंपरिक तीन फुटांच्या सरीचे अंतर वाढवून ते चार फुटांवर आणले. दोन रोपांतील अंतर वाढवले. रोपांची संख्‍या कमी ठेवली. प्रत्येक ऊस २ किलोने पिकवला तरी एकरी ९० टनांचे लक्ष्य गाठणे शक्य आहे हे ध्यानात ठेवले. वाटेकरी शेती करत होते. त्या वेळी कसेतरी ५० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. त्यातून आमच्या वाट्याला निम्मे उत्पादन यायचे. मात्र मी ऊस लावण पद्धती बदलली आणि उत्पादनात वाढ होत गेली. याच वेळी बोदावर सोयाबीनचेही उत्पादन घेतले.

सांडपाणी वापरले शेतीत

यशकथेमधून एका शेतकऱ्याने जनावरांच्‍या गोठ्यातील सांडपाणी शेतीसाठी वापर केल्याचे वाचनात आले. खरे तर जनावरे असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कल्पना उत्तम होती. मात्र माझ्‍याकडे जनावरे नव्‍हती. सारासार विचार करून मी त्‍यांच्या गोठ्यातील सांडपाणी घेण्याचा निर्णय घेतला. खरं तर दुसऱ्याचे सांडपाण्याने स्वतःची शेती करणे हा चर्चेचा विषय झाला. पण मी या कल्‍पनेपासून मागे हटलो नाही.

जनावरांचे मलमूत्र हे शेतीसाठी वरदान असते हे मला वाचून कळाले होते. यशकथा वाचल्यानंतर मी शेजारच्या शेतकऱ्यांकडे गेलो. त्‍यांनाही माझ्या या अनपेक्षित कल्पनेचे आश्‍चर्य वाटले. त्यांनी सहमती दर्शविल्यानंतर पाइपलाइनद्वारे सांडपाणी आणण्याची तयारी केली. ते साठविण्यासाठी छोटे शेततळे खोदले. गोठ्यातील सांडपाणी जमीन सुपीक करण्‍यास कारणीभूत ठरले. शेणाचे पाणी शेतात फिरत असल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला. पिकांची वाढ समाधानकारक झाली. यातून माझा शेतीमध्ये होणारा अवास्‍तव खर्च कमी झाला आहे. अनेकांना याची किंमत कळत नाही. पण माझ्यासाठी खरं सोनं हे शेणखताचं पाणीच आहे. हा प्रयोग माझ्यासाठी कायमस्वरूपी संजीवनी ठरला.

गांडूळ खत निर्मितीस सुरुवात

दहा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एका यशोगाथेतून गांडूळ खत निर्मितीविषयी माहिती मिळाली. त्या शेतकऱ्यास तीन महिन्यांनंतर चांगल्या प्रतीचे गांडूळ खत मिळाले. त्या वर्षी त्या शेतकऱ्यास गांडूळ खत विक्रीतून सव्वा लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. यातून प्रेरणा घेत मी गांडूळ खतनिर्मितीसाठी बेड तयार केले. गांडूळ खतनिर्मितीसाठी १५ बेड सुरू केले. सध्या वर्षाला सुमारे दहा टन गांडूळ खत विक्री करत आहे. बेडबरोबर पाच गुंठे क्षेत्रात जमिनीवरच शेण टाकण्यासाठी जागा केली आहे. बेडपेक्षा जमिनीवरच्या शेणखतातून मिळणारे गांडुळाचे उत्पन्न जलद व चांगल्‍या प्रतीचे असल्याचा माझा अनुभव आहे. शेण विकत घेऊन गांडूळ खत केले तरी परवडते. त्यासाठी शेजारील पशुपालकांकडून शेण घेतले.

५० हजार रुपयांचे शेण विकत घेऊन खत तयार करून त्याची १५ रुपये किलो दराने विक्री केली. खताचा उरलेला चाळदेखील शेतात वापरतो. गांडूळ खतांतून ५० हजार रुपयांचे उत्पादन मिळते. ॲग्रोवनच्‍या माध्यमातून केलेला हा प्रयोग मला नवा व्यवसाय सुरू करायला उद्युक्त करणारा ठरला. शेती करताना ती व्यावसायिक पद्घतीनेच केली पाहिजे, असा मंत्र ॲग्रोवनने दिला.

दैनंदिन वाचनाने वाढला स्नेह

दैनंदिन शेतीकामांसह मी वाचनालाही वेळ देतो. सातत्याने कृषी साहित्याच्या माध्यमातून ज्ञान घेण्याचा माझा अव्याहत प्रयत्न असतो. शेती करण्यास सुरुवात केल्यापासून लिखित स्वरूपात मिळालेले शेतीविषयक ज्ञान मला शेतीच्या सुधारणेसाठी महत्त्वाचे ठरले. यातून राज्यभरातील अनेक शेतकरी, तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्याशी स्नेह वाढत गेला. ॲग्रोवनसारख्या वृत्तपत्राने शेती केवळ राबूनच न करता वाचूनही करता येते हे शिकवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT