Integrated Farming : एकात्मिक शेतीतील प्रयोगांचा झाला सन्मान

Article by Eknath Pawar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फणसगाव विठ्ठलादेवी (ता. देवगड) येथील देवेंद्र नारकर उतारवयात म्हणजे ६१ व्या वर्षातही जराही न थकता शेतीत झोकून देऊन कार्यरत आहेत. आंबा, काजू, प्रक्रिया, विविध भाजीपाला पिकांची शेती. सेंद्रिय व्यवस्थापन, देशी गोपालन आदी विविध गोष्टींतून त्यांनी आपली शेती कायम प्रयोगशील ठेऊन तिचा चांगला विकास केला आहे. यंदाचा राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
Devendra And Bharati Navekar
Devendra And Bharati Navekar Agrowon

एकनाथ पवार

Integrated Agriculture : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील फणसगाव विठ्ठलादेवी हे तळेरे-विजयदुर्ग मार्गावरील किनारपट्टीपासून बरेच आत असलेले गाव आहे. गावातील देवेंद्र नारकर (तात्या) यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख तयार झाली आहे. शेतीत सर्वस्व ओतून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यातूनच एकात्मिक शेती त्यांनी विकसित केली आहे.

...अशी विकसित केली शेती

सर्व भावंडे शिक्षणानंतर नोकरीसाठी मुंबईला गेली. मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर नारकर यांनी वडिलांच्या हाताखाली शेतीची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबाची पडीक जमीन मोठ्या प्रमाणात होती. ती झाडाझुडपांनी वेढलेली होती. नारकर यांनी ही जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी मोठे कष्ट घेतले.

आंबा लागवड वाढ सुरू केली. एकाच पिकांवर अवलंबून न राहता काजूसारख्या कोकणातील महत्त्वाच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक वर्षी २०० ते ३०० झाडे लागवड करायचा निश्‍चय व त्यानुसार झपाट्याने कामही केले.

सेंद्रिय पद्धतीचा अवलंब

दोन वर्षांपूर्वीपर्यंत काही प्रमाणात रासायनिक व बहुतांशी सेंद्रिय असे व्यवस्थापन होते. आता पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. गोमूत्र आणि शेणखतासाठी १८ देशी गायी आहेत. जिवामृत निर्मिती व त्याचा भरपूर वापर ते करतात. कोकणातील आंबा बागायतदारांना सध्या फुलकिडीने हैराण केले आहे. अशावेळी नारकर यांनी जैविक घटकाची निर्मिती केली आहे.

वीस लिटर गोमूत्र, दोन किलो रुईचा पाला, २०० ग्रॅम तिरफळ घेऊन १५ दिवस हे मिश्रण ढवळत ठेवले. त्यानंतर वाफ देऊन ते वस्त्रगाळ करून घेतले. प्रति लिटर दोन मिली या प्रमाणात आठ ते दहा दिवसांच्या फरकांनी चार फवारण्या घेतल्या. या घटकांमुळे बागेत फुलकिडी आणि तुडतुड्यांचा अजिबात प्रादुर्भाव झाला नाही असा अनुभव नारकर यांनी सांगितला.

Devendra And Bharati Navekar
Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

पीकपद्धती व विविध पिकांचे प्रयोग

शेतीत ४० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

तीस एकर शेती आहे. खरिपात भात, नाचणी. फळबागांमध्ये आंब्याची जुनी १२०, तर नव्याने ३२५ झाडे. हापूस मुख्य वाण. काही नीलम व केसर.

काजूची साडेतीन हजार झाडे (वेंगुर्ला ४)

बांबूची १०० झाडे तीन वर्षांपूर्वी लावली असून सागवानाची तेवढीच झाडे पाच वर्षे वयाची आहेत.

नारळ, सुपारीही आहे. उन्हाळ्यात चवळी, मूग, उडीद, कुळीथ आदी पिके.

नारकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी विविध प्रयोग आपल्या शेतात यशस्वी केले. यात पालेभाज्या, दोडका, कोबी,, फ्लॉवर, मिरची. काकडी, भोपळा, कलिंगड आदींचा समावेश आहे.

आंबा विक्री व्यवस्था

आंबा बागांच्या करार पद्धतीला नारकर यांनी छेद दिला. बागेचे संपूर्ण व्यवस्थापन स्वतः अत्यंत काळजीपूर्वक करतो. कारण तीच माझी सर्वस्व आहेत असे नारकर सांगतात. काढणीवेळी बाग व्यापाऱ्याला लिलाव पद्धतीने दिली जाते. या वेळी बागेची परिस्थिती, फळांची गुणवत्ता पाहून प्रति पेटी दर निश्‍चित केला जातो. काढणी, पॅकिंग ही कामे व्यापाऱ्याकडे असतात.

Devendra And Bharati Navekar
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

काजूवर प्रक्रिया करून विक्री

दरवर्षी दहा टनांपर्यंत काजू उत्पादन.

काजूच्या दरांमध्ये सतत चढउतार होतात. त्यामुळे चांगला दर मिळवायचा तर प्रक्रिया केली पाहिजे असे वाटून २००५ मध्ये काजू प्रकिया युनिट खरेदी केले.

या काजूची विक्री स्थानिक आणि मुंबईतील व्यापाऱ्यांना होते. प्रति किलो आकारानुसार सहाशे ते आठशे रुपये दर मिळतो.

प्रकिया उद्योगाची क्षमता आता वाढविली असून त्यासाठी आधुनिक यंत्र स्वगुंतवणुकीतून घेतले आहे.

एकात्मिक शेतीचा विकास

फळबागांचा विकास तर केलाच. आंबा, काजूच्या माध्यमातून वर्षाला काही लाख रुपयांची उलाढाल नारकर करतात. पण केवळ पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी पूरक उद्योगांनाही चालना दिली.

देशी गोसंवर्धन करतातच. पण स्थानिक पातळीवर गावरान कोंबड्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन छोट्या प्रमाणात कुक्कुटपालन सुरू केले आहे. सध्या १०० पिले आहेत. मागील वर्षी अंडी उबवणी यंत्रणा घेतली आहे. ‘बायोगॅस’ निर्मिती करून घरात इंधनाचा वापर होतो. स्थानिक आठ महिला व दोन पुरुषांना शेतीत कायम रोजगार दिला आहे.

पुरस्काराने सन्मान

नारकर यांचे आजचे वय ६१ वर्षे आहे. मात्र त्यांचे दैनदिंन कामाचे स्वरूप थक्क करणारे आहे. सकाळी सहाला त्यांचे शेतीतील काम सुरू होते. दिवसभरातील एक मिनीटही ते वाया घालवत

नाहीत. अनेक वेळा रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत देखील ते कामांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. शेतीत दिलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२१ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर केला आहे.

देवेंद्र नारकर, ९६९९५९१०३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com