Women Psychology  Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Anand Nadkarni : विचार म्हणजे काय?

Thought Update : मागील लेखात आपण विचारांची वाढ, विचारांचे वर्तुळ रुंदावत नेणे याबद्दल समजून घेतले. हे सगळं शिकायचं आणि आत्मसात करायचं, तर विचार ओळखता आणि बदलता आले पाहिजेत.

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Women Psychology : मागील लेखात आपण विचारांची वाढ, विचारांचे वर्तुळ रुंदावत नेणे याबद्दल समजून घेतले. हे सगळं शिकायचं आणि आत्मसात करायचं, तर विचार ओळखता आणि बदलता आले पाहिजेत.

पण त्याआधी, विचार म्हणजे नक्की काय, हे जाणून घ्यायला पाहिजे. विचार म्हणजे आपल्या डोक्यात सतत सुरू असणारा संवाद.

विचार म्हणजे नक्की काय?

हा प्रश्‍न बघितला आणि आपण ‘विचार’ करायला सुरुवात केली, हो नं? विचार म्हणजे आपल्या डोक्यात सतत सुरू असणारा संवाद. स्वत:चा स्वत:शी चालू असलेला संवाद- स्वसंवाद. आपले विचार, आपलं हे स्वगत आपल्या मनात सतत सुरू असतं.

नाटक-सिनेमांत किंवा मालिकांमध्ये काही वेळा स्वगत संवाद मोठ्याने दाखवतात. कामाहून आलेला नवरा घरातल्या परिस्थितीचा अंदाज घेतो आणि म्हणतो, “अरे, चूल थंड आणि सौ.चे तापमान एकदम गरम दिसतंय! मला आज काही जेवायला मिळेल असं दिसत नाही!”

आपले हे विचार सतत स्वसंवाद या रूपात सुरू असतात, पण आपल्या ते ध्यानीही नसतात बरेचदा. कारण ‘अतिपरिचयात अवज्ञा!' कुठलीही गोष्ट खूप ओळखीची, सवयीची झाली की त्या गोष्टीचे भान, महत्त्व आपल्याला लक्षात येत नाही.

वर्षानुवर्षे चश्मा वापरणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचा चश्मा हा शरीराचा जणू एक भागच बनून जातो! तसेच काही कारण घडल्याशिवाय, ‘आपल्या डोळ्यावर चश्मा आहे,' अशी वेगळी जाणीव त्यांना होतच नाही. आपल्या विचारांचंही काहीसं तसंच होतं.

मनात विचार अखंड सुरू असतात. म्हणजेच हे स्वगत, स्व-संवाद अगदी सतत सुरू असतो. त्यामुळे आपल्या विचारांचे भान आपल्याला तितकेसे नसते. विचारांचे भान म्हणजे नक्की काय? ‘माझ्या मनात आता विचार येत आहेत, विविध विषयांवरचे विचार येत आहेत, काही क्षीण आहेत तर काही बलिष्ठ!’ असे लक्षात येणे.

कधीतरी अचानक हे भान आपल्याला येते. तेव्हा आपल्याला जाणवते- “अरे, हा काय विचार करत आहे मी!”, “काय सारखं सारखं तेच तेच घोळतंय डोक्यात!” माझ्या डोक्यात विचार येत आहेत हे जाणवणे म्हणजे विचारांचं भान येणे.

विचारांची जाण ही त्या पुढची पायरी. विचारांचं निरीक्षण आणि परीक्षण करणे म्हणजे विचारांची जाण. मनात येणाऱ्या विचारांत काय काय आहे? कोणते ट्रॅक सुरू आहेत? मदत करणारे विचार कुठले? त्रास वाढवणारे कुठले? या विचारातून कुठली भावना जाणवते आहे? राग येतो आहे की वाईट वाटतं आहे? याबद्दल जाणीव म्हणजे विचारांची जाण येणे.

हे भान आणि जाण आपल्या विचारांबद्दल येणे हे महत्त्वाचे आहे. त्यातूनच कुठले विचार ध्येयाकडे नेणारे, उपयुक्त आणि कुठले विचार दुर्लक्ष करण्याचे, हे कळायला मदत होईल. तर विचारांचे भान आणि जाण आणण्यासाठी काय करायचे? त्यासाठी कुठली तंत्रं वापरता येतील? ते आपण समजून घेऊया.

सगळ्यात आधी आपल्याला एक सजग निरीक्षक व्हावे लागेल. त्यासाठी शरीरातील बदलांची नोंद घेणे, पंचेंद्रियांद्वारे जाण निर्माण करणे, उच्चारलेल्या शब्दामागचा विचार आणि भावना समजून घेणे, सिनेमा / टीव्ही बघताना पात्रांचे विचार आणि भावना ओळखणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शरीरात होणारे बदल न्याहाळले, तर त्याच्या जोडीने काय काय विचार सुरू आहेत याची जाण येऊ शकते. उदाहरणार्थ, कॉलेजला असताना आवडती व्यक्ती दिसली की धडधड वाढत असे. त्या वेळी त्या व्यक्तीबद्दल प्रेमाचे विचार मनात होते. रात्री विचार करताना पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं. ‘अरे, उद्या बँकेत लोनसाठी मीटिंग आहे, लोन होईल का?’ हा विचार सतावू लागतो.

विचारांचा वेग, विषय यात बदल झाले की शरीर संकेत देत असतं. आपण ते टिपून स्वगताची जाण करून घेतली पाहिजे. शिकागोत धर्मसंसदेत भाषण करायला विवेकानंद उभे राहिले तेव्हा त्या नवख्या वातावरणात ते अतिशय घाबरून गेले. पण आपल्या विचारातून आलेली भीती त्यांना तत्काळ जाणवली आणि त्यानंतर त्रासदायक विचारांना थोडे मागे सारून, मदत करणाऱ्या विचारांची कास धरून केलेले त्यांचे ते भाषण ऐतिहासिक आणि अजरामर ठरले.

आपण पंचेंद्रियांद्वारे (स्पर्श, गंध, दृष्टी, कान, चव) भवतालच्या गोष्टींबद्दल संवेदना, ज्ञान मिळवत असतो. जागरूकपणे आपण हे अनुभव घेतले तर त्यातून आपल्या विचारांची जाण व्हायला मदत होते. दिवसातून दोन-तीन मिनिटं एखादी कृती / प्रसंग किंवा वस्तू लक्षपूर्वक न्याहाळा. त्या वेळी माझ्या मनात काय विचार सुरू आहेत? इतर व्यक्ती काय विचार करत असतील? यावर लक्ष द्या. विचारांची जाण यातून वाढेल आणि स्वत:ला व इतरांना समजून घेता येईल!

फक्त ऐकू नका; तर कान द्या. सगळं लक्ष एकतान करून ऐकलं तर संभाषणातले, गीतातले अर्थ, संगीत, त्यामागच्या भावना जाणवायला लागतात. समजून घ्यायला, कळायला, उत्तर द्यायला सोपं जातं. फक्त स्पर्श नको; ऊब ओळखा. आपल्या सवयीच्या पांघरूणाने किंवा आजीच्या जुन्या साडीच्या गोधडीच्या स्पर्शाने अनेक आठवणी जाग्या होतात.

त्या आनंददायक भावना जाणवतात. म्हणजेच सजगपणे स्पर्श अनुभवला तर त्यातूनही स्वगताची जाण येते. फक्त गंध घेऊ नका; त्या गंधाची वलये अनुभवा. भाकरीचा खरपूस वास, पहिल्या पावसाचा मातकट वास, दवाखान्यातला स्वच्छतेचा वास, फुलांचे वास अनेक विचार, भावना जागवतात. फक्त खाऊ नका; रुची घेऊन पदार्थ चाखा.

चवीने पदार्थ खाताना झालेला आनंद, जाणवलेलं प्रेम दुसऱ्याला नेमकं सांगितलं, त्याचा त्यामागचा विचार जाणून घेतला तर आपली विचार आणि भावनांची जाण वाढेल.

बोलत असताना, समोरच्याने शब्द कसे उच्चारले? त्यामागे भरपूर स्वगत असतं. त्यातून व्यक्त होत असलेला मथितार्थ, भावना नीट ऐकलं तर समजून घेता येतात. जसे की प्रेमाने मारलेली “अगं” हाक आणि चिडून “अगं” असं बोलावणं, यातला फरक आणि त्यामागे घडणारं मनातलं महाभारत आपल्याला अगदी नेमकं लक्षात येतं. सिनेमा बघताना, गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना ऐकू येणारा डायलॉग, गाण्याचे बोल लक्ष देऊन ऐका.

शब्द वेगळाच अर्थ सांगताहेत आणि खरं तर या व्यक्तीच्या मनात काही वेगळंच चालू असतं! आठवा बरं हसणारा आणि पुढच्याच क्षणी गोळी झाडणारा शोले मधला गब्बर सिंग!

थोडक्यात ज्ञानेंद्रिये, शरीरातील बदल, रसास्वाद आपण टिपकागदासारखे टिपून घेतले, नोंद घेतली तर स्वगताची जाण येणे या कौशल्याचा सराव आपल्याला होईल. विचारांची जाण वाढायला लागली, की त्यानंतर शिकायचं विचारांचं परीक्षण.

एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवर किंवा एकाच विषयावर पण परस्परविरोधी असे विचार सुरू आहेत का? कुठले ट्रॅक्स सुरू आहेत माझ्या विचारात? मदत करणारे विचार कुठले ज्यांना प्राधान्य द्यायला हवं? उद्दिष्ट काय आहे आणि त्यासाठी मदत होईल असे विचार कुठले?

उदाहरणार्थ, सकाळी शेताकडे निघाले असताना असे विचार येत आहेत – “विक्री होईल का शेतीमालाची? लोक म्हणाले आहेत पण तेवढा भाव मिळेल का? उद्या औषध मारायला हवं आहे. तर आज लोक बोलवायला सांगून ठेवायला हवं.

औषध पुरेसं आहे का बघायला हवं, नाहीतर दुकानातून मागवायला आज दुपारी. थोरल्याची कॉलेजची सुट्टी चालू आहे; पण बिलकुल लक्ष नाही घालायचं त्याला. बापाच्या मदतीला येईल तर नाव नाही. हिनेच खूप लाडावलाय त्याला!”

या सगळ्या विचारांपैकी, महत्त्वाचे, आजच्या दिवशी प्राधान्याने काम पूर्ण व्हायचं यासाठीचे विचार खरं तर दोनच! ते म्हणजे ‘उद्या औषध मारायला हवं तर आज लोक बोलवायला सांगून ठेवायला हवं, औषध पुरेसं आहे का बघायला हवं, नाहीतर दुकानातून मागवायला हवं.’ बाकी गोष्टींवर आताच लगेच विचार आणि उपाययोजना करायची गरज नाही. प्राधान्य द्यायला हवं असे विचार वेगळे काढणं म्हणजे विचारांचं परीक्षण!

‘मनाला विचार करायला शिकवणं म्हणजे शिक्षण’ असे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणतात. विचारांची जाण, भान आणि परीक्षण म्हणजे ह्याया शिक्षणाचा श्रीगणेशा!

(लेखक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ आणि आयपीएच संस्थेचे संस्थापक आहेत.) (संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी)

ई-मेल - kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=ainGucQmEmE

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

SCROLL FOR NEXT