Climate Change Impact In Agriculture : शेतीचा करा नव्याने विचार

पेरणीला कर्ज आणि सुगी संपल्यावरही कर्ज शेतकऱ्यांच्या सातबारावर दिसत असेल, तर हे निसर्गाचे फटके सरकारी यंत्रणा आणि समाजही का विसरतो?
Climate Change
Climate ChangeAgrowon

Climate Change : अस्मानी-सुलतानी आपत्तीने राज्यातील शेतकरी हैराण आहेत. आपल्या राज्यात सतत दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीट (Hailstorm) सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर रब्बी-उन्हाळी हंगामातील पिके पदरात पडतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षाही अक्षरशः मातीत मिसळली आहे. वादळी वारा आणि पावसात विजा पडून मनुष्यहानी, पशुहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.

हवामान केंद्राच्या माहितीनुसार पडणारा पाऊस कधी मध्यम स्वरूपाचा, तर कधी तीव्र स्वरूपाचा पडतच आहे. भर उन्हाळ्यात पावसाचा कहर आणि गारव्याचा अनैसर्गिक चमत्कार अनुभवताना हवामान बदलाचे संकेतही मिळत आहेत.

गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका, कांदा, द्राक्षे, काजू, नारळ, पपई, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी, टरबूज-खरबूज, काकडी, टोमॅटो, हळद, मिरची, आले, लसूण, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, ऊस आदी पिकांचे, फळपिकांचे आणि फुलशेतीचेही होत असलेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत आहे.

Climate Change
Climate Change : हवामान बदलतेय संशोधनाची दिशा बदला

लहरी वातावरणामुळे राज्यात हजारो हेक्टरवरील रब्बी-उन्हाळी पिके आणि फळपिके जमीनदोस्त झाली आहेत. सततच्या नुकसानीमुळे शेती व शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. नवनव्या समस्यांची वाढ आपत्तीतून होत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेती ही अभिमानाची गोष्ट असली, तरी त्यांचे सर्वस्व शेतीवर अवलंबून असले, तरी शेतीमाती आणि रानशिवाराचे बदलते आणि बिघडते पर्यावरण जीवघेणे ठरतेय. या भू -पर्यावरणीय आणि अस्मानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याचा शेतीमाल बाजार यंत्रणेतील घटक कवडीमोल दराने लुटत आहेत.

शेतकऱ्यांची वाताहत, पडझड निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित देखील आहे. अवकाळीचा सामना करतानाही संघर्ष आणि राज्यव्यवस्था व दलालांच्या मध्यस्थीलाही शेतकऱ्यांचे मरण टांगलेले आहे.

शेतकऱ्यावर व गावगाड्यावर होणारे एकूणच परिणाम कितीही लिपाछिप केली तरी बुजत नाहीत. माती फळाला यायली पण अस्मानी-सुलतानी संकटामुळे लयाला चालली. फळपिकांवर कापडांचे आच्छादन किंवा सूर्यफुलासारख्या पिकावर साड्यांचे आच्छादन गारपिटीपासून नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी केले.

पण आभाळच फाटल्यावर शेतकऱ्यांनी काय करावे? अशा परिस्थितीत नुकसान कमी करणारे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सर्वांगांनी झेपणारे हवे. बदलत्या हवामानाशी जुळवून जाणतेपणाने शेतकऱ्यांना शेती कसावी लागणार आहे. त्याच्यासारखे नुकसान सोसणारे या पृथ्वीतलावर कोण आहेत? अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे आगामी मॉन्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हा अंदाज खरा ठरला तर आता नको तेव्हा पाऊस आणि नंतर पावसाळ्यात जुलै व ऑगस्टमध्ये पिके पाणी मागत असताना शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे लावून बसावे लागेल. पाऊस कमी झाला तर पिण्याच्या पाण्याची टंचाईही नाकारता येणार नाही.

Climate Change
Climate Change : ढगाळ, पावसाळी वातावरणाचे द्राक्ष बागेवर होणारे परिणाम

खरीप हंगामाचे नियोजन आणि बारमाही पिकांचे नियोजन हा अंदाज घेऊनच शेती करावी लागणार आहे. शेती करताना शेतकरी कायम अस्वस्थ असतो; त्याचे एक कारण पीक हाती येईपर्यंत उत्पादनाची खात्री देता येत नाही. कितीही रक्त आटवा आणि पैसा जिरवा अवकाळी पाऊस, गारपीट रात्रीतून होत्याचे नव्हते करते.

पावसाचा धिंगाणा शेतकऱ्यांना आयुष्यातून उठविणारा ठरतोय. अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत स्वतःच्या जगण्याचे आणि जित्राब जगवण्याचे वांधेच वांधे निर्माण होतात. पेरणीला कर्ज आणि सुगी संपल्यावरही कर्ज शेतकऱ्यांच्या सातबारावर दिसत असेल तर हे निसर्गाचे फटके सरकारी यंत्रणा आणि समाजही का विसरतो? एकंदरीतच शेती आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा नव्याने विचार करण्याची ही वेळ आहे.

परंतु सत्तेच्या खेळात लुप्त राज्यकर्ते आणि विरोधकांना अस्मानी-सुलतानी संकटात फसलेल्या शेतकऱ्यांबद्दल विचार करायला वेळ आहे का, हा खरा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com