Village Development Agrowon
ॲग्रो विशेष

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Rural Development : एकेकाळी कमी पर्जन्यमान असलेल्या व पाण्याचे मर्यादित स्रोत असलेल्या घोरवड (जि. नाशिक) गावाने मृद्‍ व जलसंधारणाची कामे यशस्वी केली. पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार केला.

मुकुंद पिंगळे

Smart Village Development : नाशिक जिल्ह्यात सिन्नर- घोटी मार्गावर १७ किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत वसलेले घोरवड आहे. वडाची अधिक झाडे असल्याने या गावाला तसे नाव पडल्याचे सांगितले जाते. श्री जटायू मरणावस्थेत शेवटच्या घटिका मोजत असताना प्रभू श्री रामचंद्र यांनी जमिनीवर बाण मारून त्याला पाणी पाजण्यासाठी टाकेद येथे तीर्थ प्रकट केले होते. त्या सर्व तीर्थाचे राजा प्रयागराज तीर्थ घोरवड गावात विश्रांतीसाठी थांबले होते अशी आख्यायिका सांगण्यात येते. सन १९६५ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली.

सन १९८५ मध्ये गावात वीज आली. डोंगराच्या कुशीतले हे छोटे गाव पूर्वी प्रगतीपासून कोसो दूर होते. पारंपरिक पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. कांदा, बटाटा, भाजीपाला व थोड्या फार द्राक्ष लागवडी होत्या. मात्र आर्थिक प्रगती नव्हती. सन २०१० नंतर गावात बदलाचे वारे वाहू लागले. जलसंधारण व सिंचन स्रोतांचा विकास झाला. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ लागला. माहिती व तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकरी ज्ञानसंपन्न होत गेले. आर्थिक समृद्धीचा अध्याय रचला गेला.

गावातील शेती दृष्टिक्षेपात

शेतीखालील क्षेत्र - ६४८ हेक्टर.

वनक्षेत्र - १८७.७३ हे.

पिके- सोयाबीन, भुईमूग भात, विविध भाजीपाला.

बटाटा शेतीची जुनी परंपरा

हिमाचल प्रदेशमधील मनाली येथून ५० वर्षांपूर्वी बटाट्याचे बेणे गावात आल्याचे शेतकरी सांगतात. तेव्हापासून गाव बटाट्यासाठी ओळखले जाते. सुमारे दोनशे शेतकरी त्याची शेती करतात. आता पंजाबमधील जालंधर येथून बेणे येते. लागवडीसाठी एकरी १० क्विंटलपर्यंत त्याचा वापर होतो. एकरी १२५ ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी होते. मागील काही वर्षांत प्रति किलो १० ते १५ रुपये दर मिळायचा. यंदा तो १८ ते २० रुपयांचा उच्चांकी मिळाला आहे. बटाट्याची विक्री हॉटेल व्यवसायिकांसह वेफर्स उत्पादकांना मागणीनुसार होते.

भाजीपाल्याने उंचावले अर्थकारण

दहा वर्षांत भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढले आहे टोमॅटो, काकडी, कारले, कोबी, फ्लॉवर, भेंडी गवार, दोडका, भोपळा, वालपापडी, घेवडा अशी पिके असतात. पिकांचे वैविध्य व बाजारातील मागणीनुसार पुरवठा असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. नाशिक व मुंबई येथे पुरवठा होतो. टोमॅटोबाबत खास सांगायचे तर सिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात विक्री होते.

काही अल्पभूधारक शेतकरी भाजीपाला वाहतुकीचा व्यवसायही करतात. त्यातून ३० हून अधिक तरुणांना वाहतुकीच्या व्यवसायात तर १५० हून अधिक भूमिहीनांना १० महिने हक्काचा रोजगार तयार झाला आहे. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असल्याने व्यापारी गावात येऊन खरेदी करतात.

एकेकाळी प्रतिकूल स्थितीत असलेल्या आमच्या गावाने बदल घडवून शेती, ग्रामविकास व रोजगारनिर्मिती यशस्वी कार्य केले. कष्ट, व्यावसायिक दृष्टिकोन व जिद्द यातून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावले आहे.
रमेश हगवणे ७७५८८३३८०० माजी सरपंच व प्रयोगशील शेतकरी
सुमारे ४५ वर्षांपासून आमच्या कुटुंबाची द्राक्ष शेती आहे. निर्यातक्षम उत्पादन तयार करतो. ‘सह्याद्री’सारख्या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत कार्यरत आहोत. शेतकऱ्यांची सामूहिक ताकद व अभ्यासवृत्ती यातून प्रगती करणे आम्हा शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
दत्तात्रेय हगवणे ९९२२५९०२४२ द्राक्ष व भाजीपाला उत्पादक

घोरवडची ग्राम विकासातील वाटचाल (ठळक बाबी)

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला छत्री व परिसर सुशोभीकरण.

कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना उन्नत शेती योजने अंतर्गत वैयक्तिक योजनांचा लाभ.

युवा मित्र संस्थेसोबत करार करून शेळीपालनाच्या माध्यमातून महिला उपजीविका विकास कार्यक्रम.

क्रांती ग्राम संघ या महिलांच्या संघटनेतून १६० महिलांना व्यासपीठ.

१९० कुटुंबातील महिला या बचत गटाशी संलग्न.

शाळेत ‘ई लर्निंग’ सुविधेसाठी ‘प्रोजेक्टर’

आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्‍य-स्वच्छतेसाठी रसायन फवारणीसाठी ‘फॉगिंग मशिन खरेदी.

अंगणवाडीमध्ये कुपोषण निर्मूलन कार्यक्रम.

हजारो वृक्षांची रस्त्याच्या दुतर्फा व शाळेत लागवड व संगोपनासाठी संरक्षण जाळी.

शासकीय इमारत व शेतकऱ्यांकडून सौर ऊर्जेचा वापर

‘एचएएल-ओझर’ यांच्या ‘सीएसआर’ निधीतून जल शुद्धीकरण यंत्र उभारणी. त्यायोगे शुद्ध पाणी वाटप व कार्ड वाटप

सार्वजनिक वाचनालय

नियमित व लवकर कर भरणा करण्यासाठी उपक्रम. ग्रामस्थांचे पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये भाग घेऊन श्रमदान

तलाठी सजा मंजूर.

पाण्यामुळे समृद्धी

सिन्नर येथील युवामित्र संस्थेच्या मदतीने शासकीय, कृषी विभाग व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे झाली. समसार बंधारा व खिंड येथील माती बंधाऱ्यातील गाळ काढणे, प्रयागतीर्थ येथील नाल्याचे खोलीकरण, वन विभागाच्या माध्यमातून १२ दगडी बांध, पाझर तलाव बंधाऱ्यांची दुरुस्ती अशी ही कामे होती. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत जलशक्ती अभियानातून भूजल सर्वेक्षण विभागाकडून १० ‘रिचार्ज शाफ्ट’ घेण्यात आले. त्यातून भूजल पातळीत वाढ झाल्याचे निष्कर्ष केंद्रीय भूजल मंडळाच्या संशोधकांनी नोंदविले.त्यामुळे ‘घोरवड पॅटर्न’ जिल्हाभर राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी विहीरी खोदण्यासह शेततळी उभारली. सूक्ष्म सिंचन, पॉली मल्चिंग पेपर, सेंद्रिय आच्छादनाचा वापर सुरू केला.

प्रयोगशीलतेचे गाव

एक एकर ते ३० एकर जमीन धारणा असलेले शेतकरी गावात आहेत.गावातील शेतकरी प्रयोगशील असून परिसंवाद, चर्चासत्रे, कृषी प्रदर्शनांमधून त्यांचा सहभाग असतो. प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीसोबतही (मोहाडी, नाशिक) येथील शेतकरी जोडले आहेत. घरटी एक-दोन संकरित गायी असून गावातच दूध संकलन होते. काहींनी भाडेतत्त्वावर आधारित यांत्रिक मळणी, मशागत व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून बटाटा लागवड यंत्र उपलब्ध झाले आहे. लष्करी सेवेत गावातील १५ ते २० जवान आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT