Village Development : विकास आराखडा महत्त्वाचा

Article by Dr. Sumant Pande : ग्रामपंचायतीने सर्वंकष विकासाचा आराखडा करून त्यासाठी योजनांचा उपयोग केल्यास तो समर्पक आणि सार्थकी ठरतो. राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी दिल्या असता यामध्ये कमालीची तफावत आढळते. ग्रामपंचायतींना देखील महत्वाकांक्षा असायलाच हवी अन्यथा अपेक्षित स्थान कसे साध्य करणार? पंचायतीचे विश्वस्त हेच महत्वाकांक्षा ठरविणारे असतात.
Village Development Plan
Village Development PlanAgrowon

डॉ. सुमंत पांडे

Rural Development :

तरुणांचा सहभाग

मागील काही वर्षांमध्ये अनेक उच्चशिक्षित युवक, युवती ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये आले आहेत. ही निश्चित चांगली बाब आहे. तथापि यांच्या येण्याची परिणिती गावाच्या दीर्घ नियोजनाकडे आणि सूक्ष्म नियोजनामध्ये होणे गरजेचे आहे. याचे कारण युवकांचा सहभागासोबत नवनवीन तंत्राचा उपयोग त्यात अंतर्भूत असतो. तंत्र निपुण मनुष्यबळ हेच गावाचे बलस्थान ठरणार आहे.

ग्रामपंचायती आपल्या लोकशाहीची सर्वात महत्त्वाची आणि प्राथमिक संस्था आहे. तिला आपल्या राज्यघटनेने विधिवत मान्यता देखील दिलेली आहे.आज तंत्राने विशेषतः संगणकाच्या साहाय्याने गावाच्या नियोजनासाठी अनेक बाबी सुलभ केलेल्या आहेत. ज्याचा वापर करून सरपंच/लोकप्रतिनिधी आपल्या गावाचे नियोजन व्यवस्थित करू शकतात.

सरपंच हा पंचायतीचा विश्वस्त

ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी गावाचे विश्वस्त या भूमिकेत काम करावे असे प्रतिपादन केलेले आहे. यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते; म्हणजे निवडणूक लढविण्याच्या आधी प्रत्येक उमेदवाराला मी निवडून आलो आणि ग्रामपंचायतीचा लोकप्रतिनिधी झालो तर माझी भूमिका आणि दिशा काय असेल? याबाबत त्याच्या विचारांमध्ये स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यांची पुढील किमान पाच दशकाच्या नियोजनाची स्पष्टता असायला हवी. किंबहुना पंचायतीच्या मतदारांनी प्रलोभनांना न भुलता विकासाची मानसिकता असलेल्या उमेदवारांना निवडून त्यांच्याकडे पंचायतीचा कारभार द्यावा.हे अशक्य नाही,कारण थेट सरपंचांच्या निवडीने काहीसे स्थैर्य पंचायतीच्या कारभारात आणले आहे.

प्रशिक्षण आणि ग्रामविकास

वेळोवेळी विशेषतः ज्यावेळेस नवीन ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आपला कार्यभार सांभाळतात, आपले पद धारण करतात, त्यावेळेस प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली असते. परंतु प्रशिक्षणामध्ये, प्रशिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये आणि प्रशिक्षण घेण्याच्या मानसिकतेमध्ये तफावत आढळून येते.

Village Development Plan
Village Development : पंचायतीचा आराखडा सक्षम करा...

गाव जल आत्मनिर्भर करा

गावाच्या विकासामध्ये पाणी आणि जैवविविधता हे अपरिहार्य घटक आहेत. विस्थापन आणि स्थलांतरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष हेच प्रमुख कारण आहे. पाणी नसेल तर विकासाच्या सर्व चर्चा वांझोट्या ठरतात. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील आज आपले गाव अथवा ग्रामपंचायत पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली आहे का? यासाठी अंतर्मुख होणे गरजेचे आहे.

तंत्रज्ञानाचा इतिहास

मागील तीन ते चार शतकांमध्ये विज्ञानाने केलेली प्रगती मानवाची आयुष्य सुखकर आणि संपन्न होण्यासाठीच केलेली होती . परंतु त्याचा पुरेपूर विधायक कामासाठी किती वापर होतो हे पाहणे गरजेचे आहे. आज त्या रसायनांमुळे आपले आयुष्य समृद्ध झाले की आपल्या आयुष्यातील समृद्धी गेली? त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा वापर सुरू होऊनही आता सहा ते सात दशके झालेली आहेत. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी आली का ? आपल्या आयुष्यातील समृद्धी गेली हाही अंतर्मुख करायला लावणारा विषय आहे.

स्थानिक स्तरावर नियोजन

ग्रामपंचायत हा आपल्या लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण आजही आपला देश हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत हे सत्यही आहे; तथापि आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेला सर्वस्वी बाजूला टाकून पुढे जाणे ही शक्य नाही हेही वास्तव आपल्याला समजून घेणे आणि स्वीकारणे गरजेचे आहे. 

विकासाची चौकट

सर्वसाधारणपणे विकासाची काही मानके आहेत. त्यामध्ये कृषी, जलसंपत्ती, आणि कृषी संलग्न विभाग, आरोग्य आणि पोषण, शिक्षण, मूलभूत सुविधा, सामाजिक विकास स्वच्छ आणि हरित गाव यांचा समावेश होतो. आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गाभा आणि बिगर गाभा या दोन्ही क्षेत्राबद्दल विचार करणे गरजेचे आहे. 

त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली

ग्रामविकासाची त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे हे ते तीन स्तर होत. ग्रामपंचायतीला स्वतःचे कार्यवहन व्यवस्थित करण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची रचना सहाय्यभूत ठरावी असे अपेक्षित आहे.

१९९३ च्या नंतर ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीने निवडणूक आयोग, वित्त आयोग, घटनेच्या अकरावी अनुसूची यामध्ये विकासाचे सर्व २९ विषय समाविष्ट आहेत.

दर पाच वर्षांनी निवडणूक, आपल्या गावाच्या गरजेनुसार वित्त आयोगाच्या माध्यमातून शिफारशी झाल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या स्वरूपातून मिळालेल्या रकमेचा निश्चित वाटा, ग्रामविकासासाठी पूरक असणाऱ्या बाबींसाठी प्रत्येक मंत्रालय आहे. या मंत्रालयाला समर्पक आणि उत्तरदायी असलेली प्रशासनाची एक उतरंड आपल्यासोबत दिलेली आहे. याचा चतुराईने वापर करावा असे अपेक्षित आहे.

गावाचा इतिहास आणि भूगोल

प्रत्येक गावाला इतिहास असतोच. प्रत्येक गावाचा इतिहास आणि भूगोल सर्वांना माहिती असायला हवा. इतिहासातील चांगल्या तसेच आव्हानात्मक बाबींचे लिखाण आणि त्याचे विवेचन करणे पुढील नियोजनामध्ये आवश्यक ठरते. इतिहासात पर्जन्यमान,वादळ ,दुष्काळ, पूर यांच्या नोंदी असाव्यात. इतिहास जसा आपण बदलू शकत नाही, तद्वतच भूगोल ही स्थिरच असायला हवा.

भूगोलात गावाचे क्षेत्रफळ, आपले नदी खोरे,भूगर्भ,जलस्रोत किती? तलाव,ओढे,नाले,झरे विहिरी,कुंद डोह,बारव इत्यादीची नोंद करावी. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे नदी संवाद आणि सुधार समितीच्या मार्फत दरवर्षी ऑक्टोबर आणि मार्च या काळात नोंदी अद्ययावत कराव्यात.

Village Development Plan
Village Development : सरपंचांनो, गावाच्या विकासाचे शिल्पकार व्हा !

पुढील दशकाचा आराखडा तयार करा...

ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी आपली ग्रामविकासातील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. गावाचा पुढील चार ते पाच दशकांच्या विकासाचा आराखडा आपण सर्वांनी एकत्र येऊन करावा. त्या आधारे आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा दळणवळणाची साधने नैसर्गिक साधन संपदा, ज्यामध्ये पाणी जैवविविधता वनसंपदा या गोष्टीकडे लक्ष देणे आणि नियोजन करणे गरजेचे आहे. 

अपेक्षित आणि वास्तव या दोन्हीची तुलना करत असताना या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे, हे पुन्हा अधोरेखित होते.तथापि लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका अजूनही पूर्णपणे समजून घेतली आहे असे मानणे थोडे धारिष्ट्याचे ठरेल असे वाटते. यास्तव लोकप्रतिनिधी आणि सरपंचांना अंतर्मुख व्हावे लागेल. आपण शांतपणे गावाच्या विकासाचा विचार करणार आहोत का? का केवळ राजकारणाचा एक भाग म्हणून केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये समस्यांचे त्यावेळेस निराकरण करणे, हीच आपली भूमिका असणार आहे? यावर खरे तर खूप गांभीर्याने सर्व लोकप्रतिनिधींनी विशेषतः सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

नदी संवाद आणि सुधार समितीची कार्ये

नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे.

जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे.

नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करणे. त्याबाबत प्रचार व प्रसार करणे.

ग्रामपंचायत क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांना अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे.

नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे.

नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत गावात प्रचार, प्रसार याबाबत नियोजन करणे.

नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशा, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी. मागील पाच वर्षांतील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी बाबतची माहिती संकलित करणे.

पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे.

आपल्या गावातून नदी/ओढा/नाला/ प्रवाह जात असेल तर त्यांचे सीमांकन आणि नोंदी करून ग्रामपंचायतीस कळवणे.

नदी, ओढा, नाला निर्मल राहण्यासाठी संनियंत्रण आणि देखरेख करणे.

नदी/ओढा/नाला / प्रवाह यावर अतिक्रमण होणार नाही याबाबत सतर्क असावे. अशा बाबी आढळून आल्यास तातडीने ग्रामपंचायतीस अवगत करावे.

गावातील सांडपाणी, मैला पाणी हे नदी, ओढा, नाला, प्रवाह, जलस्रोतांमध्ये जाऊ नये याबाबत संनियंत्रण.

गाव पाणलोटाच्या पाण्याचा ताळेबंद कृषी सहायक यांच्या मदतीने दरवर्षी करावा.

गावातील जलस्रोतांत गाळ साचला असेल, तर गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पंचायतीत सहकार्य करावे.

गावातील महिला स्वयंसाह्यता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ यांना नदीशी जोडण्यासाठी प्रयत्न करावा.

गावातील तरुण (युवक, युवती) त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकास नदी सुधार आणि जलसंधारणाच्या कामात जोडून घ्यावे.

शालेय जलसाक्षरतेबाबत शाळा आणि विद्यार्थी यांना अभियानात जोडून घेणे.

प्रत्येक महिन्याच्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत आपला अहवाल सादर करणे.

‘चला जणूया नदीला’ अंतर्गत सर्व प्रमुख मुद्यांवर काम करणे.

नदी, समाज आणि ग्रामपंचायत यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे.

गावपातळीवर नदीच्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय याबाबत विभिन्न घटकांपर्यंत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकसहभागातून ‘चला जाणूया नदीला’ अभियान समन्वयाकांमार्फत राबविणे.

जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी समिती स्थापनेबाबत कार्यवाही करून ग्रामपंचायती मार्फत पंचायत समितीस अनुपालन सादर करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com