Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन

प्रताप चिपळूणकर

Indian Agriculture : जमिनीमध्ये ९९.५ टक्के खनिजे (खडकापासून तयार झालेले) असतात तर ०.५ टक्यांपेक्षा कमी सेंद्रिय कण असतात. खनिज कणाच्या तुलनेत सेंद्रिय कणांची टक्केवारी वाढविल्यास जलधारण शक्ती वाढते. शेणखत, कंपोस्टच्या वापराने हे अवघड आहे.

यासाठी शून्य मशागत तंत्र वापरामागील पिकाचे अवशेष जागेला कुजतील आणि मिळणाऱ्या चांगल्या दर्जाच्या सेंद्रिय कर्बामुळे जलधारण शक्ती वाढेल. शून्य मशागतीमुळे जमीन दबून राहते. यामुळे धारण केलेले जल बाष्पीभवनाने उडून जात नाही. जमिनीला वापसा असेल तर जल उपलब्ध करून देण्याची शक्ती वाढते.

जमिनीची एक ठराविक निचराशक्ती असते आणि वापरून ती कमी होते आणि प्रयत्नपूर्वक वाढविता येते. शून्य मशागतीत कुजण्यास जड असणारे पदार्थ जागेत कुजत असता जो डिंकासारखा पदार्थ तयार होतो, त्यातून जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना तयार होते.

अशा कणरचनेमुळे निचराशक्ती वाढते. अतिरिक्त पाणी जलद निचरून जाऊन लवकर वापसा येणे ही बाब पीक उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्या अत्यंत जड जमिनींना उन्हाळ्यात पूर्वी ८ दिवसांपेक्षा जास्त ओलितास उशीर झाला, तर पीक सुकत होते, वरील तंत्र वापरू लागल्यानंतर आता १५ दिवस ओलितास लागले तरी पीक वाळत नाहीत.

पाणी व्यवस्थापनातील काही बाबी

सरी वरंबा पद्धतीतील व्यवस्थित नाके करणे महत्त्वाचे :

ऊस पिकासह काही इतर पिके सरी वरंबा पद्धतीने घेतली जातात. सऱ्या काढत असता सरीच्या दोनही बाजूला माती जाऊन कडेला चढ होतो. नाके करीत असता ही जादा माती उचलून आत टाकणे गरजेचे असते.

तसे न केल्यास नाकाला चढ रहातो आणि शेवटपर्यंत पाणी नेत असता कडेला ३ ते ४ मीटर पाणी तुंबते. तेथे पीक जादा पाण्यामुळे डावे येते. यासाठी नाके करीत असता फक्त टिकाव आणि खोरे न नेता त्याबरोबर एखादे घमेले न्यावे आणि चढाची माती उचलून आत टाकावी. गडी माणसाकडून नाके केली जातात. यावेळी मालकाने स्वतः उभे राहून लक्ष देणे गरजेचे आहे.

साखळीऐवजी लांब सरी पद्धतीने पाणी :

पाणी व्यवस्थापनातील बदलाने कमीत कमी पाण्यात फेर व दोन पाळीत गरजेप्रमाणे कमीत कमी अंतर हे तत्त्व साध्य झाले. साखळ्या किंवा फुली तयार करणे गरजेचे. पैसे, मजूर खर्चात बचत व उत्पादन वाढ मिळाली.

पाटाच्या विरुद्ध बाजूची तोंडे रिकामी करून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची सोय :

पूर्वी मजूर बळ गरजेइतके उपलब्ध असे. पाटावर दोन पाणके ठेवणे शक्य होते. एक जण दारे मोडण्यासाठी व दुसरा विरुद्ध बाजूला आलेल्या सऱ्या सांगणेसाठी. मनुष्यबळ टंचाईमुळे आता एकच पाणक्या ठेवावा लागतो.

सरी आलेली बघून बंद करीत असता कडेला जादा पाणी जाते. यासाठी पाटाचे विरुद्ध बाजूची सर्व तोंडे उघडी करून अतिरिक्त पाणी कडेला न तुंबता बाहेर निघून जाते. पाण्याचा वापर थोडा वाढतो. परंतु त्यामुळे होणारे नुकसान वाचते.

पाटाचे पाणी किती सऱ्यात एकावेळी सोडावे?

बाल्यावस्थेत मोठे पाणी लावून कमीत कमी पाणी पाण्यात सरी पाजावी. जोमदार वाढीच्या अवस्थेत व उन्हाळ्यात थोड्या जास्त सऱ्यांना पाणी लावून पाण्याची मात्रा वाढविणे फायद्याचे ठरते. जमिनीचा मगदूर, सेंद्रिय खत व्यवस्थापन आणि पिकाची गरज यानुसार शेतकऱ्याने वरील निर्णय करणे हे कौशल्याचे काम आहे. साखळ्या आणि फुली पद्धतीत हे अशक्य आहे.

पाट स्वच्छ राखणे :

असे संदर्भ मिळतात, की पाट जर अस्वच्छ असेल तर केवळ ५० टक्के पाणी शेतात पोहोचते. अतिरिक्त पाणी पाटाकडेला मुरल्याने कडेचा ऊस (पीक) मार खातो. पाणी, वीज, यंत्र झीज जास्त वापरल्याने होणारे नुकसान वेगळे पाटात बहुवार्षिक तणे वाढल्यामुळे हाताने स्वच्छ ठेवणे अवघड बनते.

तणनाशकामुळे पाट स्वच्छ ठेवण्याचे काम खूप सोपे झाले आहे. कालवा, चाऱ्या, उपचाऱ्या आणि सहकारी पाणी पुरवठ्याचे पाट नेहमीच तणाने भरलेले असतात. अशी पद्धत गावातील सहकारी पाणी संस्थेला शिकविल्याने त्यांचे पाट पुढे स्वच्छ राहू लागले. पाटबंधारे खात्यानेही या तंत्राचा अभ्यास करावा, शक्य तेथे वापर करावा.

अश्‍वशक्तीवर वीज पंपाचे बिल

या धोरणामुळे शेतकरी काटकसरीने पाणी वापराकडे दुर्लक्ष करू लागला. वीज व पाणी वापर दोन्हीही वाढत गेले, पिकाचे उत्पादनही घटू लागले. वीजबिल तयार करणे सोपे जावे, मीटर रिडींगचा खर्च वाचावा हा वीज मंडळाचा उद्देश चांगला होता. परंतु पाण्याचा व वीज वापराकडे शेतकऱ्यांचे होणारे दुर्लक्ष आणि जादा वीज वापरातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात आल्यानंतर हा निर्णय वीज मंडळाला बदलावा लागला.

शक्य तेथे तण व्यवस्थापनातून पाण्यात बचत :

लांब अंतरावरील पिकात मिश्रपीक निघाल्यानंतर मधील पट्टा उघडा पडतो. या पट्ट्यातील जमिनीच्या आर्द्रतेचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. फळबागेत दोन ओळीत आंतर मशागत करून जमीन स्वच्छ ठेवल्यास वरील प्रमाणेच नुकसान होते.

अशा वेळी पिकांचे नुकसान होणार नाही इतपत मधल्या पट्यात तणे जिवंत ठेवणे फायद्याचे ठरते. उघड्या जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचे तुलनेत तणांनी वापरलेल्या पाण्याचे प्रमाण खूप कमी असते. पाणी वापरात बचत करण्याचा हा एक मार्ग आहे.

सहकारी अगर पाटबंधाऱ्याचे पाणी वाटपाचे दर प्रती ४० आर साठी असतात :

पाणी दिल्यानंतर ते किती तासाने संपते यावर कोणतेही बंधन नाही. यामुळे कमी वापर व जादा वापरणाऱ्या शेतकऱ्याला सारखेच पैसे मोजावे लागतात. यामुळे काटकसरीने पाणी वापरण्याचे महत्त्व संपुष्टात येते.

सर्वांनाच पुढील पाण्याचा फेर खूप उशिरा येतो, त्यामुळे सर्वांचे नुकसान होते. यामध्ये पाणी,वीज,यंत्र झीज ग्राह्य धरली पाहिजे. सर्वांनाच पुढील पाण्याचा फेर किती दिवसाने येईल याची शाश्र्वती नसल्याने प्रत्येकजण शेतात जास्तीत जास्त पाणी भरून घेण्याचा प्रयत्न करतो. यावर काही उपाय आहे का?

एक पाणी पुरवठा संस्थेने आपल्या नऊ पाटाला सारखेच पाणी जाईल अशी व्यवस्था करून, ४० आर साठी चार तास पाणी देण्याचे बंधन घातले. (सदर संस्थेस पाणी मुबलक उपलब्ध होते.) यामुळे शेतकऱ्यांना स्वतः उभे राहून दिवसा अगर रात्री चार तासात पाणी काढणे मार्ग होते. शिल्लक रान राहिल्याने ते पुढील फेरातच पाजले जाईल, वेळ वाढवून दिली जाणार नाही या नियमाचे काटेकोर पालन केले जाई.

प्रत्येक पाटकऱ्याकडे संस्थेने घड्याळ दिले होते. पाणी सोडल्याची वेळ व बंद केल्याची वेळ याची नोंद ठेवणे त्यावर बंधनकारक होते. पाण्याच्या पाळ्या योग्य वेळेत मिळाल्याने त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन नेहमीच इतरांचे तुलनेत जास्त असे.

मी ही वस्तुस्थिती आमच्या गावातील संस्था संचालक मंडळापुढे मांडली. आम्ही सर्व जण गाडी करून सदर संस्थेला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि पीक परिस्थिती पाहिली. आमच्या येथे असे काही धोरण राबवू शकले नाही. कमीत कमी उन्हाळ्यात तरी असे धोरण राबवावे असे मला वाटते.

शून्य मशागत तंत्राच्या दिशेने...

ट्रॅक्टरचे पूर्व मशागतीचे भाडे वाचविण्यासाठी मी पॉवर टिलर घेतला. भातानंतर पॉवर टिलरने जमीन नांगरली आणि बैलाने सरी सोडली. माती दबली गेली नसल्याने ओलितात जमीन इतके पाणी घेऊ लागली, की आता १५ दिवसांऐवजी ३० दिवसांनी पाणी द्यावे लागू लागले.

पाणी व्यवस्थापनाचे सूत्र कमीत कमी पाण्यात फेर व्हावा, दोन पाळ्यात अंतरही कमी असावे. वरील मशागतीचे पैसे वाचविण्याच्या नादात पाणी व्यवस्थापन बिघडले व उत्पादन कमी झाले. मग पॉवर टिलरने नांगरणी आणि एकेरी मोठ्या ट्रॅक्टरच्या पल्टी फाळाने सरी केल्यानंतर प्रश्‍न सुटला. पुढे पॉवर टिलरने ४५ सेंमी. रान नांगरणी व ४५ सेंमी रान विना नांगरता ठेवले. नांगरलेल्या पट्ट्यातून बैलाच्या रिजरने सरी सोडली.

पूर्व मशागतीचे भाडे १०० टक्के वाचले आणि पाणी व्यवस्थापनही व्यवस्थित झाले. त्यानंतर पुढे १०० टक्के नांगरणी बंद करून जुन्या सरी वरंब्यावर भात व उसाची लावण सरीच्या तळात एक बळिराम नांगराचे तास गरजेइतके मारून केली. दोन वेळचा मशागतीचा खर्च वाचला.

पिकाचे अवशेष कुजून जमिनीला सेंद्रिय खतही फुकटात मिळाले. नांगरल्यामुळे सरीत सोडलेले पाणी बाजूला न मुरता वेगात कडेला जाते. कमीत कमी पाण्यात फेर व दोन पाळीत कमीत कमी गरजेप्रमाणे अंतर हे पाणी व्यवस्थापनाचे सूत्र पण १०० टक्के साध्य झाले.

उत्पादन खर्च कमीत कमी व कमाल उत्पादन. शेतीत आणखी काय हवे? ऊस पिकाची बाल्यावस्थेत पाण्याची गरज अतिशय कमी असते. ती शक्य झाल्याने उत्पादनात वाढ मिळाली. इतर अनेक पिकांसाठी हाच नियम आहे.

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT