Quinoa Health Food Agrowon
ॲग्रो विशेष

Quinoa Health Foods : जीवनसत्त्वांनीयुक्त क्विनोआ

Team Agrowon

प्रियंका काळे, दिलीप मोरे

Supergrain : क्विनोआला ‘सुपरफूड’ किंवा ‘सुपरग्रेन’ म्हणतात. हे जगातील सर्वांत लोकप्रिय आरोग्य खाद्यपदार्थांपैकी एक आहे. ही राजगिरा (अमॅरॅन्थेसी) कुटुंबातील एक फुलांची वनस्पती आहे. दक्षिण अमेरिकेतील अँडियन प्रदेशात आढळणारी मूळ वनस्पती आहे. भारतातही काही राज्यात याची लागवड केली जाते.  

हा धान्याचा  प्रकार आहे, जो दिसायला एखाद्या डाळीसारखा दिसतो.  हे धान्य इतर धान्यांच्या तुलनेत खूपच जास्त पौष्टिक आणि रुचकर आहे. यामध्ये सॅपोनिन नावाचे नैसर्गिक आवरण असते, ज्याला कडू चव असते. हे कडू अवशेष काढून टाकण्यासाठी, याचा वापर करण्यापूर्वी क्विनोआ ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवला जातो.

त्यानंतर वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे स्वच्छ धुऊन घ्यावे लागते. यातील पोषक तत्त्वे घातक आजारांपासून शरीराचे रक्षण करतात. क्विनोआचे सॅलड, पोहे, उपमा किंवा त्याची पोळीही आहारात घेऊ शकता. याच्या सेवनाने पूर्ण दिवसाच्या पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होते.
प्रथिने, तंतुमय घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असतात.

लोह, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशिअम, तांबे, जस्त, कॅल्शिअम, फोलेट, जीवनसत्त्व बी ६, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, थायमिन, बायोटिन आणि जीवनसत्त्व ई हे भरपूर प्रमाणात असतात.ग्लूटेन मुक्त आहे.  तांदूळ, पास्ता, कुसकुस, बल्गुर गहू आणि इतर धान्यांसाठी पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. यामध्ये नऊ अमिनो ॲसिड आहेत.
ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे २०० कॅलरीज असतात.

प्रकार

काळा क्विनोआ : अन्नात शिजवल्यानंतरही याचा रंग आहे तसाच राहतो.  हा प्रकार शिजविण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो आणि याची चव गोड असते.

पांढरा क्विनोआ :  हा प्रकार सामान्यतः सर्व अन्न धान्याच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. शिजविण्यासाठी कमी वेळ लागतो.

लाल क्विनोआ : कोल्ड सॅलडसारख्या पदार्थामध्ये हा प्रकार जास्त वापरला जातो. पांढऱ्या जातीच्या तुलनेत, लाल क्विनोआचा स्वयंपाकात वापर केल्यानंतर त्याचा मूळ आकार आणि रचना टिकून राहाते.

आरोग्यदायी फायदे

भारतामध्ये हे धान्य रूपात वापरले जाते. पण परदेशांमध्ये याच्या पानांचा वापर सॅलेडमध्येही केला जातो. यामध्ये बऱ्याच प्रकारची पोषक तत्त्वे असतात.

वाढत्या वजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी याचा वापर प्रभावी ठरू शकतो. याच्या सेवनाने या लठ्ठपणाच्या समस्येवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळू शकते. जलद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये संपूर्ण प्रथिने आहेत, जे चयापचय वाढवते. तसेच, यात असलेले उच्च तंतूमय घटक पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. यामुळे दररोज सकाळी याचा आहारात समावेश करावा.

प्रथिने आणि अमिनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्ध लोकांसाठी हे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. कॅल्शिअमचे प्रमाण दुग्धजन्य पदार्थांसारखेच असते. मॅग्नेशिअम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात. हे हाडांची घनता सुधारते आणि हाडे चांगली आणि निरोगी ठेवते.

ज्या लोकांना गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या आहेत, त्यांनी याचे सेवन करावे.
लोह मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत ते शरीरातील रक्ताची कमतरता वेगाने पूर्ण करते. ज्या लोकांना अॅनिमियाची समस्या आहे. त्यांनी याचे नियमित सेवन करावे. यामुळे अशक्तपणा कमी होतो.

ज्यांना कोलेस्टेरॉल खूप जास्त आहे. त्यांच्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करते. अशा प्रकारे ते हृदयाचे आरोग्य सुधारते.
दाहक-विरोधी गुणधर्म असतात. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये सॅपोनिन्स नावाची संयुगे असतात, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

इतर धान्यांच्या तुलनेत यामध्ये प्रथिनांच्या निर्मितीसाठी सर्व अमिनो अॅसिड असतात, जे रक्तामध्ये शर्करा (साखर) स्तर नियंत्रित करण्यात मदतनीस ठरतात. रक्तातील इन्सुलिनची पातळी संतुलित करते.

यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे अॅनिमिया रोखण्यास मदत मिळते.
यामध्ये जीवनसत्त्व बी सारखी पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे त्वचेतील डार्क मेलनिन कमी होऊन चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा वाढत नाहीत. जीवनसत्त्व ‘अ’चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.

क्विनोआमध्ये असलेल्या हायड्रोलाइज्ड प्रथिनेमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. केस जलद वाढण्यास मदत होते. केस मजबूत आणि चमकदार होतात. यामध्ये नऊ अमिनो अॅसिड असतात, जे केसांचे पोषण करतात. त्यांची वाढ लवकर होण्यास मदत करतात.

प्रियंका काळे,  ७२१८५८००१५
(अन्न व्यापार व्यवस्थापन विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

Bribery Case : महा-ई-सेवा केंद्रचालक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

SCROLL FOR NEXT