Soil Health : समस्यायुक्त जमिनींचे गुणधर्म, सुधारणा व खत व्यवस्थापन

Soil Improvement : राज्यात समस्यायुक्त जमिनींखालील क्षेत्र वाढते आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिके न घेणे, पाण्याचा अमर्याद व खतांचा असंतुलित वापर, तणनाशकांचाही अमर्याद वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर आणि चुकीची पीक वा फळ लागवड पद्धती ही त्यामागील मुख्य कारणे आहेत.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

Fertilizer Management : राज्यात समस्यायुक्त जमिनींखालील क्षेत्र वाढते आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिके न घेणे, पाण्याचा अमर्याद व खतांचा असंतुलित वापर, तणनाशकांचाही अमर्याद वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर आणि चुकीची पीक वा फळ लागवड पद्धती ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. त्यामुळे धूपग्रस्त, क्षारयुक्त, क्षारयुक्त-चोपण, चोपण (पाणथळ), चुनखडीयुक्त आणि आम्ल असे जमिनींचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या शेती पद्धतींचा अवलंब होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. ऊस किंवा नगदी पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. फेरपालटीत हिरवळीचे खत तसेच कडधान्य पिकांचा समावेश हा सेंद्रिय कर्ब सुधारणेच्या दृष्टिकोनातून विचार महत्त्वाचा आहे. आपल्याकडील जमीन समस्यायुक्त आहे का आणि त्यात सुधारणा करून पीक व खत व्यवस्थापन कसे करावे हे आपण माहीत करून घेऊया. प्रथम माती व सिंचनाचे पाणी यांचे पृथक्करण करून अहवालानुसार जमीन आरोग्य पत्रिका तयार करून घ्यावी. त्याद्वारे मातीचे गुणधर्मांनुसार वर्गीकरण करावे.

मातीचे पायाभूत गुणधर्म

सामू

पहिला मूलभूत गुणधर्म सामू आहे. तो ६.५ ते ७.५ पर्यंत असावा. कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सामू ६.५ पेक्षा कमी असलेल्या जमिनीस आम्ल जमीन म्हणतात. विशेषतः कोकणातील जमिनीचा सामू आम्लयुक्त असतो. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जमिनींचा सामू किंचित विम्ल ते अतिशय विम्ल (सामू ७.५ ते ९.०) आहे. सामू ८.५ पेक्षा जास्त असल्यास त्यास चोपण जमीन म्हणतात.

क्षारता

जमिनीचा दुसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे क्षारता. ती प्रयोगशाळेत ‘इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीटर’ या उपकरणाद्वारे मोजली जाते. याद्वारे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण समजते. मातीमधील विद्युत वाहकता (क्षारता) १.५० डेसी. सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असेल, तर त्यास क्षारयुक्त जमीन म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. त्यामुळे मातीची क्षारता सर्वसाधारणपणे ०.१० ते ०.५० डेसी. सायमन प्रति मीटर या दरम्यानच असावी, त्यापेक्षा जास्त असल्यास निचऱ्याची व्यवस्था चर खोदून करावी. चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरून अतिरिक्त क्षारांचा निचरा करावा. चांगल्या प्रतीच्या पाण्याची क्षारता ०.५ डेसी. सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. ही क्षारता २.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असल्यास असे पाणी सिंचनास अयोग्य समजले जाते. पाण्याची क्षारता ३.१५ डेसी. सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असल्यास ते ठिबकसाठी अयोग्य समजले जाते.

Soil Health
Soil Health : भारतीय शेतीसमोर जमिनीचे आरोग्य टिकविण्याचे आव्हान

मुक्त चुनखडीचे प्रमाण

जमिनीचा तिसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे मुक्त चुनखडीचे प्रमाण. हे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास (कमी), ५ ते १० टक्के (मध्यम), १० ते १५ टक्के (जास्त) आणि १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकास हानिकारक ठरते. जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास त्यात लोहाची कमतरता येते. त्यामुळे ऊस, द्राक्ष पिकांवर केवडा दिसून येतो. चुनखडीयुक्त जमिनीची घनता वाढते. घडण वा संरचना कठीण बनते. सामू विम्लधर्मीय होतो व क्षारता १.० डेसी. सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.

मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण

जमिनीचा पायाभूत चौथा महत्त्वाचा रासायनिक गुणधर्म म्हणजे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. ते टक्केवारीत लिहिलेले असते. साधारणपणे सेंद्रिय कर्ब ०.४० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ते कमी प्रमाण समजतात. तर ०.४१ ते ०.६० टक्क्यादरम्यान मध्यम तर ०.६१ टक्क्यांपेक्षा जास्त हे चांगले प्रमाण समजले जाते. परंतु आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जमिनींमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे. सेंद्रिय कर्ब हा वरील तीनही पायाभूत गुणधर्म चांगले ठेवण्यास मदत करतो. जमिनीतील समस्या कमी होण्यास मदत करतो.

Soil Health
Soil Health : जमीन चोपण होऊ नये म्हणून काय करावे?

सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?

शेणखताचा होत असलेला अपुरा पुरवठा, वाढत चाललेला जमिनीचा विम्लपणा (सामू), क्षारांचे प्रमाण, सधन पीक पद्धती आणि अतिरिक्त पाण्याचा वापर ही सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे आहेत. तो वाढविण्यासाठी विविध पिकांना शिफारस केलेले सेंद्रिय खत उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, प्रॉम आदींचा वापर करणे आवश्यक आहे. फेरपालटीत कडधान्य पिकांचा अंतर्भाव करणे, क्षारपड जमिनीत दर दोन वर्षांतून एकदा हिरवळीची पिके गाडावीत. उदा. धैंचा किंवा ताग त्याचप्रमाणे शिफारस रासायनिक खतांसोबत अखाद्य पेंडी उदा. निंबोळी, करंज, एरंडी आदी पेंडींचा वापर करावा. सेंद्रिय कर्ब हे सर्व सूक्ष्मजीवांचे खाद्य असल्याने जमिनीतील जैवविविधतेत वाढ होईल. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल.

समस्यायुक्त जमिनींचे प्रकार

१) धूपग्रस्त जमिनी

समस्यायुक्त जमिनींमध्ये सर्वांत जास्त क्षेत्र धूपग्रस्त जमिनीखाली आहे. कोरडवाहू क्षेत्रात हे क्षेत्र जास्त आहे. जास्त उतार असल्याने पाण्याबरोबर माती, अन्नद्रव्ये, सूक्ष्मजीव वाहून जातात. परिणामी, जमिनी निकस व उथळ बनतात. त्यासाठी उन्हाळ्यात बांधबंदिस्ती, उतारास आडवी मशागत, सीसीटी, जैविक बांध तसेच मृद्‍ व जलसंधारणाचे विविध उपाय महत्त्वाचे आहेत. कारण यामुळे जलसाठ्यातील गाळ साठण्याचे प्रमाण कमी होऊन जलसाठा वाढेल. पाण्यातील जलपर्णी वनस्पतींची वाढ कमी होईल. या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. द्विदलवर्गीय व कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत. म्हणजे धुपीला अटकाव होईल. ओढा, नाला व नदीकाठी वनातील वृक्षांची तसेच निलगिरी, गिरिपुष्प, बांबू यांची लागवड करावी. त्यातून सेंद्रिय कर्ब संवर्धन जास्त होईल. कमीत कमी मशागतीची शेती व शेतावरच सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन करावे.

२) क्षारपड जमिनी

यांचे पुढील तीन प्रकारात वर्गीकरण करता येते.

अ) क्षारयुक्त, ब) क्षारयुक्त-चोपण आणि क) चोपण त्यानुसार एकात्मिक जमीन सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा.

क्षारयुक्त जमिनीचे गुणधर्म

मातीच्या कणांवर कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने आणि जमिनीतील मृदा द्रावणामध्ये (सॉइल सोल्यूशनमध्ये) विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने सामू ८.५ पेक्षा कमी असतो.

मृदा द्रावणात विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीची विद्युतवाहकता (क्षारता) १.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

मातीच्या कणांवर विनिमयात्मक कॅल्शिअमचे प्रमाण जास्त तर विनिमय सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी असते.

उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराइड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.

जास्त क्षारामुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.

पाटपाण्याच्या क्षेत्रामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.

पिकाच्या मुळांना जमिनीतून अन्न शोषण करता येत नाही. प्राणवायूचा पुरवठा होत नाही. पर्यायाने पाने पिवळी पडून वाढ खुंटते.

क्षारयुक्त जमिनींची सुधारणा

शेताभोवती खोल चर काढावेत. पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावा.

शेतात २० गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.

सेंद्रिय खतांचा हेक्टरी २० ते २५ टन वापर करावा.

जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये. त्यामुळे बाष्पीभवनाव्दारे जमिनीच्या पृष्ठभागावर क्षार येणार नाहीत.

हिरवळीची पिके उदा. धैंचा किंवा ताग ही ४५ ते ५० व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावीत. त्यामुळे जमिनीची निचराशक्ती वाढते. भौतिक गुणधर्म सुधारतात.

लागवड सरी वरब्यांच्या मध्यभागी करावी.

सेंद्रिय भूसुधारके, मळीकंपोस्ट, आसवणीतील सांडपाणी (स्पेंटवॉश) जमिनीत वापरू नयेत. कारण त्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असते. रासायनिक भूसुधारांकामध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू नये.

क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा.

क्षारयुक्त -चोपण जमिनीचे गुणधर्म

विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी किंवा जास्त असतो.

जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) १.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

मातीवर चिकटलेल्या (विनिमय) सोडियमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असते.

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्लोराइड वा सल्फेट अधिक सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.

जमिनीची जडणघडण बिघडते. पिके पिवळी पडून वाढ खुंटते.

पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.

पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.

क्षारयुक्त - चोपण जमिनींची सुधारणा

जमिनीला उतार द्यावा. शेताभोवती खोल चर काढावेत.

सच्छिद्र पाइप (मोल ड्रेनेज) भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा.

सिंचनास चांगले पाणी वापरावे.

सेंद्रिय खतांचा व जोर खतांचा (निंबोळी पेंड, करंज पेंड इ.) वापर शक्यतो जास्त करावा.

धैंचा पीक ४५ ते ५० व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा जमिनीत गाडावे.

माती परिक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्यकतेच्या ५० टक्के पहिल्या वर्षी द्यावी. उर्वरित मात्रा दोन वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या २० सेंमी थरात मिसळावी.

सेंद्रिय भूसुधारके, मळी कंपोस्ट व स्पेंटवॉश जमिनीत वापरू नयेत. कारण त्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असते.

क्षार सहनशील पिकांची निवड करावी. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा.

चोपण जमिनीचे गुणधर्म

मातीवर चिकटलेल्या (विनिमयात्मक) सोडिअमचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीचा सामू ८.५ पेक्षा जास्त असतो.

विद्राव्य क्षारांचे प्रमाण जमिनीत कमी असल्याने मुळे जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) १.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.

विनिमय सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बाय कार्बोनेट बरोबरचे प्रमाण वाढते.

जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.

जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.

जमिनीचा पृष्ठभाग राखट दिसतो. अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.

चोपणपणा वाढल्यास चुनखडीचे प्रमाण वाढते.

चोपण जमिनींची सुधारणा

भूमिगत चरांची सच्छिद्र पाइप निचरा व्यवस्था करावी.

रासायनिक भूसुधारकाचा वापर करताना माती परीक्षण करून जिप्सम वा सल्फरचा आवश्यकतेनुसार वापर करावा. जमिनीत मुक्त चुना १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास जिप्सम तर जास्त असल्यास गंधकाचा शेणखतातून आवश्यकतेनुसार वापर करावा.

सेंद्रिय खते व भूसुधारकांचा वापर उदा. शेणखत, कंपोस्ट खत व मळी कंपोस्ट खतांचा वापर नियमित करावा.

धैंचा पीक ४५ ते ५० व्या दिवशी दोन वर्षांतून एकदा जमिनीत गाडावा.

आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनिअम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश आदी.

पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा २५ टक्के वाढवून द्यावी.

माती परीक्षणानुसार सूक्ष्मअन्नद्रव्ये उदा. लोह (फेरस सल्फेट, २५ किलो प्रति हेक्टरी), जस्त (झिंक सल्फेट २० किलो प्रति हेक्टरी) जमिनीत सेंद्रिय खतात आठवडाभर मुरवून द्यावीत.

सबसॉइलरने खोल नांगरट करावी. परंतु रोटाव्हेटरचा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावा.

पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार पद्धतीने करावे. विद्राव्य खतांचा वापर ठिबकद्वारे पीक वाढीच्या अवस्थेनुसार करावा.

नैसर्गिक अधिक सेंद्रिय शेती करावी.

डॉ. अनिल दुरगुडे - ९४२०००७७३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com