Grape Orchard Management
Grape Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Orchard Management : पावसाळी वातावरणातील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ.अजयकुमार उपाध्याय

Grape Season : द्राक्ष विभागामध्ये सद्यःस्थितीचा विचार करता सर्वत्र थोडाफार व काही ठिकाणी भरपूर पाऊस झाल्याचे चित्र आहे. बहुतांश सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण आणि झालेल्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता या गोष्टी वेलीच्या शाकीय वाढीला पोषक आहेत.

या वेळी वातावरणातील तापमान (३५ अंशापर्यंत) कमी झाले व आर्द्रता जास्त (७० टक्क्यांपुढे) प्रमाणात वाढली. यामुळे द्राक्षबागेत वेगवेगळ्या स्थितीमध्ये असलेली द्राक्ष वेलींवर होणारे परिणाम व समस्या जाणून त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती घेऊ.

१) नवीन फुटी जास्त प्रमाणात निघणे

अ) खरडछाटणी लवकर झालेल्या द्राक्ष बागेत पाऊस सुरू होईपर्यंत काडी अर्ध्यांपर्यंत परिपक्व होणे गरजेचे असते. काडी अर्ध्यापर्यंत परिपक्व झालेल्या स्थितीत फुटीचा शेंडा जास्त प्रमाणात वाढत नाही. या वेळी बागेत पालाशची उपलब्धता सुरू असल्यामुळेही शेंडा वाढ नियंत्रणात असते. वाढत्या आर्द्रतेमुळे शेंडा थोडाफार वाढला तरी या वेळी शेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवता येते.

ब) उशिरा छाटणी झालेल्या बागेत मात्र परिस्थिती वेगळी असेल. येथे काडी कच्ची असून, आताही ती तळातून गुलाबी रंगाची असेल. अशा परिस्थितीत शेंडा वाढ जोमात होईल. कारण या वेलीवर शाकीय वाढीची अवस्था अजूनही पूर्णपणे संपलेली नाही.

फक्त या काड्यांवर बगलफुटीही जास्त जोमात निघत असतील. या वेलीचा आता सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी असू शकतो. बागेत व्यवस्थित सूक्ष्मघड निर्मिती होण्याच्या दृष्टीने काडीच्या प्रत्येक डोळ्यावर सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असेल. परंतु, या बागेत फुटी जास्त वाढल्यामुळे कॅनोपीमध्ये गर्दी होईल.

डोळ्यावर आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळणार नाही. अशा बागेत बगलफुटी काढणे, शेंडा पिंचिंग करणे, संजीवकांचा वापर (६ बीए आणि युरासिल) आणि स्फुरद व पालाशयुक्त खते यांचा वापर या उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. सध्या बागेत पावसाळी दिवस असल्यामुळे आर्द्रता कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गरज असलेल्या काळातच फक्त पाण्याची उपलब्धता करावी, अन्यथा बागेत या वेळी पाण्याची गरज नसेल.

क) ज्या बागेत खरडछाटणी उशिरा झाली आणि आता काडी तळातून दुधाळ रंगाची (म्हणजे अर्ध परिपक्व) झाली असल्यास शेंड्याकडील फूट जास्त प्रमाणात वाढताना दिसणार नाही. या वेळी बागेत संजीवकांची गरज नसेल. त्याऐवजी शेंडा पिंचिंग करून काडी तारेवर बांधावी. यामुळे हवा खेळती राहील व उपलब्ध सूर्यप्रकाशाचा फायदा घेता येईल.

या परिस्थितीतील बागेत पाण्यावर नियंत्रण ठेवणे व पालाशयुक्त खतांचा वापर जमिनीतून व फवारणीद्वारे करणे फायद्याचे राहील. वाढ आणि रोग नियंत्रणाचा विचार करता या बागेत बोर्डो मिश्रणाची अर्धा टक्के या प्रमाणे फवारणी करता येईल. काडीची परिपक्वता पाहून पुढील दहा दिवसाने पुन्हा ०.७५ ते १ टक्के या प्रमाणात बोर्डो मिश्रणाची फवारणी केल्यास वाढ व रोग नियंत्रणात राहील.

ड) काही बागेत सबकेन करिता शेंडा पिचिंग केल्यानंतर निघालेली फूट एकदम अशक्त होती आणि काडीही बारीक राहिली असल्याचे शेतकऱ्यांकडून समजले. या बारीक काडीवर सूक्ष्मघड निर्मिती होईल की नाही, तसेच काडीची जाडीसुद्धा कमी असल्यामुळे घडाचे वजन आवश्यक तितके मिळणार नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. सबकेननंतर शेंडा न वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे बागेत त्या वेळी पाणी एकतर कमी दिले असेल किंवा पाण्याचा ताण बसला असेल.

बागेत सध्या मात्र पाऊस, कमी तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. या वेळी शेंडा वाढ दिसून येईल. काडी जर तळातून गुलाबी ते दुधाळ रंगाची असल्यास शेंडा वाढ चांगल्या तऱ्हेने मिळेल.

उपलब्ध पानांच्या संख्येनुसार काडीची जाडी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे जाड काडीवर सहजरित्या चांगल्या वजनाचा घड मिळू शकेल. याकरिता शेंडा थांबलेल्या परिस्थितीत फुटींवर दोन ते तीन पाने खुडून घ्यावीत. म्हणजे नवीन

बगलफुटी सहज निघतील. त्यातून पानांची संख्या पूर्ण करून घेता येईल. काडी तळातून सबकेन पर्यंत परिपक्व झालेल्या परिस्थितीत मात्र काडीची जाडी वाढणे शक्य नसते. या वेळी शेंडा वाढ करून पुढील काडी वाढवून अन्नद्रव्याचा साठा वाढवून घेता येईल.

२) काडीवर गाठी येण्याची समस्या

बऱ्याचशा बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा तयार करण्याकरिता नत्रयुक्त खते, संजीवके (विशेषतः सायटोकायनीनयुक्त ६ बीए आणि युरासील), उपलब्ध टॉनिक यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. या वेळी एकतर तापमान जास्त असल्यामुळे वाढ होण्याकरिता आवश्यक तितके पाणीसुद्धा मिळत नाही. त्यामुळे वाढ खुंटलेली दिसते.

वाढ नियंत्रणात असलेल्या द्राक्षवेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण वाढून जिबरेलीनचे प्रमाण कमी होत असल्याचे आपण या पूर्वीही सांगितले आहे. म्हणजेच वेलीमध्ये आधीच सायटोकायनीन वाढलेले आहे, आणि त्यावर पुन्हा सायटोकायनीनयुक्त संजीवके व टॉनिक यांची फवारण्या झाल्यामुळे वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण आणखी जास्त वाढते.

पुढील शेंड्याकडील वाढ थांबल्यामुळे वेलीवर एक प्रकारचा दाब निर्माण होतो. त्यामुळेच काडीवर गाठी आलेल्या दिसतील. काडी काही ठिकाणी फुगलेली दिसते. फुगलेल्या भागात चिरे पडलेले दिसून येतील. काही स्थितीमध्ये त्या काडीवर मुळ्याही निघत असल्याचे दिसते.

अशा जास्त परिणाम झालेल्या बागेत काडी त्याच ठिकाणी वाकेल किंवा मोडेल. अशा काड्यामध्ये पोकळीही निर्माण होते. त्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा शेंड्याकडे होत नाही. काडी अशक्त राहून त्यामध्ये घड येणार नाही किंवा घडाचा विकास होणे शक्य नसते.

काडी परिपक्व होण्यापूर्वीच्या कालावधीत बऱ्याच बागेत जमिनीवर तणनाशक वापरले जाते. वेलीला वळण व्यवस्थित दिलेले असल्यास सर्व फुटी तारेवर असतील. अन्यथा खाली वाकलेल्या फुटींने तणनाशक शोषून घेतले तरी त्याचे परिणाम पुढील हंगामात छाटणीनंतर दिसून येतील.

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता उपाययोजना

- बागेत पाणी वाढवावे.

- शेंडा खुडणे बंद करून निघालेल्या बगलफुटी नवीन तीन ते चार पाने येईपर्यंत वाढू द्याव्यात.

- पालाश व संजीवकांचा वापर टाळावा. यामुळे शाकीय वाढ सुरू राहून नवीन गाठ तयार होणार नाहीत.

- जमिनीवर तणनाशकाची फवारणी करायचीच असेल, तर शक्यतो काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात केलेली फायदेशीर ठरेल.

संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT