Vina Khot
Vina Khot Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango: गावरान आंबा, लाल केळी, शंभर वर्षांची सुपारी जपणारी वीणा खोत आहे तरी कोण?

अमित गद्रे

"या माझ्या बागेत हापूस आंबा (Hapus Mango) तर आहेच, त्याच बरोबरीने तो दिसतोय ना गोडांबा, लिटी, हा साखरांबा अशा रायवळ आंब्याच्या २० जाती (Mango Verity) माझ्या वडिलांनी लावल्यात, त्या मी सांभाळतेय. हापूसपेक्षा (Hapus) या रायवळला मागणी आहे. रायवळ गावातच संपतोय. ही सुपारीची (Betel Nut) स्थानिक जात. माझ्या आजोबांपासून बागेत आहे. हीच आम्ही चार एकरावर नेली आहे. जागेवर मागणी आहे. चढा दर आम्ही घेतोय.

तो पलीकडे जाम दिसतोय का? चार प्रकार आहेत माझ्याकडे. बांधावर कोकम देखील गावठी... माझ्या बागेत रोज ५० पक्षी दिसतात. ब्लू मॉरमन फुलपाखरू देखील दिसेल पाहा..." कोकणात दाभोळ रस्त्यावरच्या देरदे गावात फणशी नदीच्या काठावरून नितळ पाणी पाहताना माझी ॲग्रिकॉस मैत्रीण वीणा खोत बोलत होती.

वीणाची देरदे गावात २५ एकर शेती आहे. तिथली जैवविविधता ती उलगडून सांगत होती. ही वीणा आमच्या दापोली कृषी महाविद्यालयाची युवा कृषी पदवीधर. साधारण पाच-सहा महिन्यांपूर्वी एका विषयाच्या माहितीसाठी तिचा एकदा फोन आला होता. बोलण्यावरून ती अभ्यासू वाटली होती. त्यावेळी ती म्हणाली होती की, दापोलीला आलात की आमची फळबाग पाहायला या.

काही दिवसांपूर्वी कामानिमित्ताने दापोलीत गेलो होतो. तीन तास वेळ शिल्लक होता. सहज फोन केला तर म्हणाली, ‘‘या. आंबा, काजू, फणस, सुपारीच्या बागा बघूयात.'' माझा दापोलीतील मित्राला- हेमंतला- बरोबर घेतलं. आणि दाभोळ रस्त्यावर असलेलं तिचं देरदे गाव गाठलं. मला वाटलं होतं की, अर्ध्या तासात ही फळबाग पाहून होईल. पण डोंगरउतारावरून वळणे घेत निसर्गरम्य बागेत पोहचलो तेव्हा ही कृषिकन्या म्हणजे एक वेगळं रसायन आहे, हे लक्षात आलं.

दापोलीच्या कृषी विद्यापीठातून २०१८ मध्ये कृषी पदवीधर झालेली वीणा निसर्गवेडी आहे. दोन बहिणींची लग्नं झालीत. आता घरी आई, वडिलांच्या सोबत वीणा स्वतः जबाबदारीने २५ एकर शेतीचा भार आनंदाने सांभाळतेय. आंबा, काजू, सुपारी, मिरी ही मिळकतीची पिके; पण गावरान आंबा, कोकम, जांभूळ, जाम, वेलची आणि लाल केळीच्या जातीचे संवर्धन, १०० वर्षांपासून जपलेल्या सुपारीच्या जातीबद्दल माहिती सांगताना तिच्यात एक स्पार्क दिसला. तिच्या बागेत नुसती फळपिके नाही तर किमान ४० प्रकारचे देशी वनवृक्ष, २० प्रकारच्या वनौषधी बघायला मिळतात. किमान ५० प्रकारचे पक्षी तिच्या बागेला रोज भेट देतात.

दोन तास तिच्या बागेचा फेरफटका मारला. फिरून होताच तिच्या आई, वडिलांनी आम्हाला जेवणाचा केलेला आग्रह न मोडता केळीच्या पानावर एकदम घरचं जेवण जेवलो. निघण्याची वेळ झाली. तेवढ्यात वीणा म्हणाली, ‘‘हे मोबाईलमधले फोटो बघा... पावसाळ्यात या माझ्या बागेत २५ प्रकारच्या मशरूमच्या जाती बघायला मिळतात.'' हे तर आणखीनच भारी होतं. विविध रंगी मशरूम पाहायला परत पावसाळ्यात तिच्या बागेला भेट द्यायचे पक्के करून आम्ही निघालो.

तिचे वडील म्हणाले, ‘‘ खूप आनंद झाला. आमचे घर या डोंगरात एकटे आहे. कोणी आलं की, बरं वाटतं. पुन्हा येत राहा...'' जाताना वीणाने दिलेला लिलीचे कंद, वेलची केळी, बनासरी पान वेल कटिंग, नागचाफ्याचे रोप, कोकम सरबत असा वानोळा आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही दापोलीस निघालो. खरंच वीणासारख्या कृषिकन्या आहेत म्हणून आपल्या शेतीचे भविष्य योग्य हातात आहे, याचा दिलासा मिळतो. अशा अनेक वीणा तयार होणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT