Rural Story  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : पश्‍चाताप

Team Agrowon

Village Story : आधी गरिबीत होरपळणारी गोदू बहिणीच्या सुखाने नकळत तिचा दुस्वास करू लागली होती. तिचं एक मन मात्र तिला अपराधी असल्याचं सुनावत होतं. पण हाव कधी कधी विवेकास गिळून टाकते तसं गोदूचं झालं होतं. यामुळेच आता रखमाला समोर पाहताच ती थोडी निर्विकार वाटत होती.

नव्वदीत पोहोचलेली डोळ्याच्या पणत्या विझत चाललेली जख्ख म्हातारी गोदूबाई वेशीच्या डाव्या हाताला असलेल्या चावडीजवळच्या जालिंदर बाबरच्या घरात रातसारी मिणमिणत असते. रात्रीस ती बाजेवर पडली की चंद्राचा फिकट प्रकाश तिच्या कृश देहावर अलगद तरळे. सुरकुत्यांनी रेघाळलेल्या बोडख्या कपाळावर कधी काळी गोंदवलेलं तुळशीचं पान सोनं चमकावं तसं मधूनच झळाळे. गोदू ही गावातली एकमेव बाई होती जी वेशीलगतच्या मारुतीरायाच्या मंदिरात कोणत्याही प्रहरात दिसायची. तिचं हे वागणं रितीभातीपलीकडचं असलं तरी गावाच्या दृष्टीने त्यात विशेष नव्हतं. कारण गाव तिला भाकड गाय समजे. रस्त्यानं जाताना ती दिसली तर गडीमाणसं तिला पाहताच तोंड वेंगाडून जायची, तिच्या लक्षात येईल असं वागायची. तिला याचा फरक पडत नसे. खरं तर तिचं वागणं म्हणजे ‘जखमंला बिब्बा आणि पोराला आंबा’ असं होतं. मखमली हाताची आणि साखरपाकाच्या वाणीची गोदूबाई गावातल्या बायकांची मात्र जीव की प्राण होती.

एकेकाळी महिपत पाटलाच्या संसारात रममाण झालेली गोदूबाई विस्कटलेल्या हिरव्यापिवळ्या केकताडात उगवलेल्या जर्द तांबड्या कर्दळीगत वाटायची. गोदूबाईची मोठी बहीण रखमा ही तिच्यापेक्षा देखणी, तरतरीत होती. ती महिपतीची पहिली बायको. टचटचीत भरलेल्या हरभऱ्याच्या अंगचणीची रखमा दिसायला मोहक होती. पाहताच भुरळ पडावी असं रुपडं होतं तिचं. डोईवरचा पदर तिनं कधी खांद्यावर येऊ दिला नव्हता. पाटलाचा संसार मन लावून केला होता. त्या काळात लग्ने लवकर होत, पोराबाळांचं लेंढारही लवकर होई. रखमाच्या लग्नाला पाचेक वर्षे होऊन गेली तरी कूस उजवली नव्हती. महिपतीला याचं शल्य नव्हतं. त्याचं तिच्यावर प्रेम होतं. शिवाय तो फाटक्या तोंडाचा, मनमौजी होता. त्याचं टाळकं सरकलं की तो हाताबाहेर जायचा. त्यामुळं त्याच्याशी थेट वाकडं कुणीच घेत नसे. पण लोकांना दुसऱ्याच्या चौकश्‍या फार पडलेल्या असतात. त्यामुळे महिपती-रखमाच्या लग्नाला जसजसा काळ उलटत चालला तसतशी गावात त्यावर खमंग चर्चा होऊ लागली. लोक बरळू लागले की महिपतीमध्येच दोष असल्यामुळेच तो पुन्हा बोहल्यावर चढत नाही. सुरुवातीला दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांना गावगप्पांचं स्वरूप प्राप्त झालं. या चर्चा कानी येऊ लागताच आधी दुर्लक्ष करणारा महिपती नंतर नंतर अस्वस्थ होऊ लागला.

अंगणात तान्हुली पावलं खेळत नसली, तरी महिपतीच्या संसारात रखमा पुरती रमली होती. अत्यंत गरीब कुटुंबातून ती आलेली असल्यानं महिपतीच्या समृद्धीची तिला भूल पडली होती. दरम्यानच्या काळात पाऊसपाण्याने सातत्याने ओढ दिल्याने तिच्या माहेरची परिस्थिती अजूनच हलाखीची झाली. तिच्या घरी दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या, ज्यांची अजून लग्नं व्हायची होती. सुखात नांदत असताना माहेरचा विचार मनात येताच ती कासावीस होई. त्यामुळं ती कामात जास्तीत जास्त मन रमवे. स्वतःला गुंतवून ठेवी, सगळ्यांची देखभाल करे, शेतीत हातभार लावी, गुराढोरांची निगा राखे. तिच्या या स्वभावामुळे घरदार तिच्यावर जीव टाकायचं. संसारात अपत्याची कमतरता असूनही नवऱ्यावर आणि त्याच्या प्रेमावर तिचा विश्‍वास होता. कधीतरी आपल्या घरातही पाळणा हलेल मग समाधानाचे दिवस येतील असं तिला वाटे. गावातल्या चर्चा तिच्याही कानावर येऊ लागल्या तेव्हा सुरुवातीला ती डगमगली पण महिपती शांत असल्याचं पाहून तिला हायसं वाटलं. या दरम्यान तिचे वडील आजारी पडून अंथरुणाला खिळले. त्यांना भेटण्यासाठी महिपतीचं तिच्या माहेरी सारखं येणंजाणं होऊ लागलं, तशी ती आणखी हरखून गेली.

पोर होत नसलं की सर्रास दुसरी बाईल केली जायची नाहीतर दोन घरं चालवायची ही रीतच झाली होती. असे किस्से ऐकताच महिपतीच्या मस्तकातल्या भट्टीत विचारांच्या लाह्या तडातड फुटत. रखमाला न दुखावता मधला काही मार्ग काढता येतो का, या विचारचक्रात तो अडकून राहू लागला. त्यास भरीस भर म्हणून आजारी असलेल्या रखमाच्या वडिलांना वारंवार भेटण्याचं निमित्त होऊन त्याला एक भयंकर उपाय सुचला हे त्याच्या अल्पमतीचं दुर्दैव !

एका ओढाळ दुपारी महिपतीने शेतातल्या वस्तीत एक बाई आणून ठेवल्याचा गावभर बभ्रा झाला. माळावरल्या वडावरच्या पाखरांनी एका झेपंत पांदीतल्या पिंपळावर जाऊन बसावं इतक्या वेगाने ती बातमी गावभर पसरली. बातमीनं रखमाच्या तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. महिपतीच्या धाकानं त्याच्या नव्या बाईला बघायला रानात कुणीच गेलं नव्हतं. पण रखमानं काळजाचा पर्वत केला, वाऱ्या वावदानाचं दिवस असूनही ती फुफुटा तुडवत रानाकडं सुसाट निघाली. वस्तीजवळ येताच थोडीशी घाबरली तरीही चालत राहिली. श्‍वास वेगाने होऊ लागले, घोडं फुरफुरावं तसं नाकातून आवाज घुमू लागला. चालतानाच तिच्या मेंदूतल्या पिसवा अलगद डोळ्यात उतरल्या, लालभडक झालेल्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागलं. कचाकच ढांगा टाकीत तिनं वस्ती गाठली. वस्तीवर येताच सगळीकडची सामसूम आणि घराचं आतून बंद असलेल्या कवाडानं तिला डिवचलं. मनाशी कसला तरी विचार करत तिनं कवाड बडवायला सुरुवात केली. आतून येणारे धुमसण्याचे आवाज काहीसे थांबले आणि काही क्षणात आतनं कवाड उघडलं गेलं. दरवाजा उघडताच तिला जे दिसलं त्यानं तिची शुद्ध हरपली. आत तिची ल्हानी बहीण गोदू महिपतीच्या अंथरुणात पडली होती. अंगावरच्या कापडाची देखील तिला शुद्ध नव्हती. रखमाचं काळीज पार फाटून गेलं, आतडं पिळवटून निघालं.

आपला बाप आजारी असताना नवरा सारखा आपल्या माहेरी का जात होता, याचं खरं कारण तिला आता उलगडलं. आपल्या बहिणीनं आपल्याशी विश्‍वासघात केला अशी तिची भावना झाली. पण वास्तव तेवढंच नव्हतं. जेरीस आलेल्या तिच्या कुटुंबापुढं पर्यायही नव्हता. महिपतीनं रखमाच्या बापाला विश्‍वासात घेऊन गावात सुरू असलेल्या चर्चांची माहिती दिली होती, आपल्या मनात रखमाविषयी प्रेम असूनही केवळ गावकीपायी माती खायची वेळ येते की काय, अशी भीती त्यानं बोलून दाखवली तेव्हा सासरा गलबलून गेला, रखमाच्या काळजीने सोलून निघाला. आपल्या जावयानं लाडक्या लेकीच्या संसारात सवत आणून मिठाचा खडा टाकण्याऐवजी आपलीच दुसरी पोरगी तिथं दिली, तर तिचंही आयुष्य कडेला लागेल, शिवाय पाटलांचा वारस आपल्याच पोरीच्या गर्भातून निपजेल, असा विचार करून त्यांनी महिपतीला होकार दिला होता. रखमाला पूर्वकल्पना दिली तर गावात बभ्रा होईल आणि कुणीतरी यात मोडता घालेल या भीतीनं त्यांनी गोदूला भरल्या डोळ्यांनी महिपतीच्या हवाली केलेलं. आधी गरिबीत होरपळणारी गोदू बहिणीच्या सुखाने नकळत तिचा दुस्वास करू लागली होती. तिचं एक मन मात्र तिला अपराधी असल्याचं सुनावत होतं. पण हाव कधी कधी विवेकास गिळून टाकते तसं गोदूचं झालं होतं. यामुळेच आता रखमाला समोर पाहताच ती थोडी निर्विकार वाटत होती.

त्या दिवसानंतर एका महिन्यातच रखमाने पाण्याचा आड जवळ केला, आपल्या जिवाची तगमग संपवली. पुढं जाऊन महिपती आणि गोदूबाईला दहा वर्षांत चार अपत्यं झाली. कालांतराने ती मोठी झाली. उभयतांना वाटलं, की रखमाच्या पाठीमागे आपलं भलं झालं. रखमाच्या मृत्यूची खंत असणारा महिपती खुश नव्हता. कालांतराने त्यालाही रखमाचा विसर पडला. रखमाची तळतळ जाणून असलेल्या नियतीनं कठोर न्याय केला. वेगवेगळ्या घटनांत वेगवेगळ्या ठिकाणी गोदूची चारही मुलं पाण्यात बुडून मरण पावली. गावानं नवल केलं. या धक्क्यांनी अकाली म्हातारा झालेला महिपती मुसळधार पावसाळ्यात देवाघरी गेला.

त्याच्या पाठीमागं गोदू एकाकी पडली. तिला भडभडून रडावं वाटायचं. ती जिवाचा आटापिटा करायची, पण तिच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूसही यायचा नाही. मधल्या काळात सातत्याने पाणी आटत गेल्याने गावाने आड बुजवला. आपल्या वाट्याला आलेलं सगळं सोनंनाणं, दागदागिने, जमीन जुमला एकेक करून गोदूबाईनं सारं काही गावातल्या बायकांच्या हवाली केलं. नंतर गावाच्या धाकास भीक न घालता मनाला येईल तसं वागू लागल्यानं भावकीनं तिला घराबाहेर काढलं. मग ती जालिंदर बाबरच्या घरी राहिली. अलीकडं तिचं संतुलन अधिकच ढासळलंय. मुरूममाती धोंडे टाकून बुजवलेल्या आडाच्या ओबडधोबड पृष्ठभागावर मोकार उगवलेल्या गाजरगवताच्या बेचक्यात गोदूबाई बसून असते. लोक म्हणतात तिला रखमाची हाय लागली. गाजरगवतात बसून राहिल्यानं तिच्या अंगावर फोड येतात. फोडातल्या पाण्याला आडातल्या मचूळ पाण्याचा दर्प येतो. तिच्या भिंगुळल्या डोळ्यात पाणी येत नाही, पण तिच्या अंतःकरणातला पश्‍चात्तापाचा आड तिच्यातून असोशीनं वाहत असतो...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT