Rural Story
Rural StoryAgrowon

Rural Story : जुन्या नात्यांचा गोडवा

Agriculture Rural Story : शेवंतानं स्वप्नात दिलेला सांगावा रंगूबाप्पांनी बरेच दिवस आपल्या काळजात दडवला होता; पण आपल्या शेवटच्या दिवसांत मात्र ते गुपित त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यांच्या वागण्यात बदल का झाला होता याचं उत्तर त्यातून मिळालं.
Published on

समीर गायकवाड

Samir Gaikwad Article : शेवंतानं स्वप्नात दिलेला सांगावा रंगूबाप्पांनी बरेच दिवस आपल्या काळजात दडवला होता; पण आपल्या शेवटच्या दिवसांत मात्र ते गुपित त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यांच्या वागण्यात बदल का झाला होता याचं उत्तर त्यातून मिळालं.

जुन्या जमान्यात गावकीने माणुसकीची नाती सोडली नव्हती, निसर्गाने ताल सोडला नव्हता. सगळं कसं नीटनेटकं अन् गोळीबंद काम असायचं. पूर्वेला काळसर तांबडं असताना गावकुसाच्या वेशीजवळील देवळातली लगबग ऐन रंगात आलेली असायची.

काही पोक्त टाळकरी, तर काही तरणी पोरं पखवाजाच्या आवाजावर दंग व्हायची. देवळातल्या सभामंडपात टाळ गर्जत असायचे. सर्वत्र मंगलमय वातावरणाचे चैतन्य जाणवे. रुक्मिणीच्या साक्षीने गाभाऱ्यात उभा असलेला विठ्ठल प्रसन्न चित्ताने हसत असे.

जसजशी तांबडफुटी होई तसतसे देवळातले भजन रंगत जाई. त्या आवाजात पाण्याच्या आडावर होणारी नवविवाहित महिलांची कुजुबुज, दूर कुठे तरी मोटेवर दिली जाणारी ललकार, झाडांची सळसळ, गायींचे हंबरणं, नुकतेच जागं झालेल्या पाखरांचा चिवचिवाट, साऱ्या गावगाड्याचा आवाज मिसळून जाई. घरोघरी अंगणात सडे पडत. चुलीमध्ये हलका आर पेटवला जाई.

एकीकडे मातीने सारवलेल्या भांड्यात चुलीवर पाणी चढवले जाई. फुकारीतून फुका मारणं जारी राही. तर दुसरीकडे बंबात लाकडं पेटवली जात. शेतशिवारं, बैलगोठेही हळुवार जागे होत. बांधाबांधावरली झाडं झोपेतून जागी होत. वस्तीवरचे घरधनी आपल्या शेतातल्या बापजाद्यांच्या समाधीवर विहिरीतलं दोन तांबे थंड पाणी चढवून त्यावर सोनफुले ठेवत. हात जोडून नतमस्तक होत. शेतशिवारातल्या वस्त्या आळस झटकून जाग्या होत.

दरम्यान, इकडं मंदिरात बरीच वर्दळ वाढलेली असे. बघता बघता काकडा संपून गेलेला असे. सगळे जण कापूर आरतीची वाट बघू लागत. सगळे सोपस्कार होताच गुरव यथासांग आरती सुरू करायचा. साऱ्यांचं पांडुरंग चरणी डोकं टेकवून होई. चिरमुरे फुटाण्याचे प्रसादवाटप होई.

देवळातून निघताना टाळकरी वीणेवाल्याच्या पाया पडत. हे सारं दुरून निरखत असलेले कंबरेत वाकलेले रंगूबाप्पा देवळातली सगळी माणसं बाहेर गेल्यावर थेट गाभाऱ्यात जाऊन थरथरत्या हाताने विठू-रुक्माईशी दबक्या आवाजात काही तरी हितगुज करून बाहेर येत. बाहेर येताना त्यांचे डोळे पाणवलेले असत. हा परिपाठ गेल्या कित्येक वर्षांपासून जसाच्या तसा चालत आलेला होता.

Rural Story
Rural Story : राम कृष्ण हरी....

इकडे गावात मात्र सकाळची लगबग उडालेली असे. शाळेकडं निघालेल्या पोरांचा कालवा आणि शिवाराकडं चाललेल्या गाडीवानांनी बैलांना मारलेल्या लडिवाळ हाका याकडं काणाडोळा करत रंगूबाप्पा येणाऱ्या-जाणाऱ्याचा कानोसा घेत तासन् तास देवळाच्या पायरीपाशी थांबत. अगदी सूर्य माथ्यावर येपर्यंत. त्यांचा तो विरंगुळा होता. दुपारचा प्रहर आळस संगट घेऊनच गावात यायचा.

गावातली रिकामटेकडी मंडळी पारावर गप्पांची मैफल जमवत. जेवण उरकल्यावर रंगूबाप्पा मंदिराबाहेरील लिंबाच्या झाडाखाली मरगळल्यागत बसून असत. दुपार भरात आली की गावजीवन सुस्त होई. पाखरांची चिवचिव देखील कमी होई. झाडाखाली बसलेल्या रंगूबाप्पांची नजर झाडावरून गिरक्या घेत रमतगमत येणाऱ्या पिवळ्या पानांकडं असे.

एकटक नजरेने ते पानगळीचे झुले बघत राहत. दुपार कलंडली, की दबक्या पावलानं हळूहळू सांज दाखल होई. सूर्यकिरणे तिरपी होताच गुरापाखरांच्या संगतीने घरधनी गावाच्या दिशेने निघालेले असत.

शेतातून दमून आलेल्या गजूने घराकडं जाताना रंगूबाप्पांना लांबूनच हाळी देताच ते सावध होत. त्यांचा चेहरा फुलून येई. गजूच्या बैलगाडीत ते आल्लाद बसत. उन्हात रापून लालबुंद झालेला तरणाबांड गजू हा रंगूबाप्पांचा नातू. देवळात बसलेल्या बाप्पाला घरी नेण्यासाठीच तो रोज तिथं यायचा. पानगळ सुरू झाली की थंडीच्या दिवसांत लवकर अंधारून येऊ लागल्यानं बाप्पांना केव्हा एकदा घरी नेईन असं त्याला होई. बाप्पा घरी आल्याबरोबर आधी हातपाय धुऊन घेत.

इकडंतिकडं थोडी टंगळमंगळ करून झाल्यावर घुम्यागत आढ्याकडं बघत मख्ख बसून राहत. मधूनच तलफ आली, की आल्याचा गरम वाफाळता चहा होई. उन्हाचे दिवस असले की थंडगार पन्हं व्हायचं. तोवर बाहेर अंधार वाढत जाई. चुलीवरच्या पातेल्यातलं कसदार चविष्ट जेवण ताटात यायचं. जेवण उरकल्यावर अंगणातल्या बाजेवर बाप्पा अंग टाकत. बाजेवर पाठ टेकली की काळ्याकुट्ट आकाशातल्या शुभ्र लुकलुकत्या चांदण्यांशी मनातल्या मनात बोलत. दिवसभर उदास चेहऱ्याने बसून असलेले रंगूबाप्पा चांदण्यांशी बोलता-बोलता हळूच झोपेच्या स्वाधीन होत.

Rural Story
Agriculture Rural Story : मळ्यातले घर आले कामी

झोपी गेल्यावर रोजच त्यांच्या स्वप्नात गावातलं देऊळ येई, गाभाऱ्यातले विठू-रुक्माईही येत. त्या रात्रीही तसंच झालं. मात्र त्या रात्रीच्या स्वप्नात एक आगळीक घडली. शेवंताही स्वप्नात आली. शेवंता म्हणजे बाप्पाची कारभारीण.

तिनं स्वप्नात येऊन त्यांच्याशी गुजगोष्टी केल्या. त्यांचं अन् तिचंही मन मोकळं झालं. तिच्या आवाजाच्या भासानं ते खडबडून जागे झाले. त्यानंतर पुन्हा झोप ती कसली लागलीच नाही. बाजेवरच लोळत राहिले आणि भल्या पहाटे उठून तडक रानात गेले. विहिरीतल्या गार पाण्यानं अंघोळ उरकून थेट देवळात आले. वीणेकरी येण्याआधी विठूपुढे हजर झाले. हे असं पहिल्यांदाच झालं होतं.

त्या दिवसानंतर मात्र त्यांचा चेहरा नेहमीच हसरा राहिला. ते लोकांच्या सुखदुःखात समरसून जाऊ लागले. त्या रात्री स्वप्नात शेवंतानं त्यांना असं काय सांगितलं होतं कोण जाणे; पण त्या दिवसानंतर ते बदलून गेले.

साऱ्या गावाला कोडं पडलं की रंगूबाप्पाच्या आयुष्यात एकाएकी असं काय झालं, की त्यांचं दुर्मुखलेलं चेहऱ्याचं रुपडं बदलून ते एकदम हसमुख झाले? खरं तर याचं उत्तर त्यांना पडलेल्या स्वप्नात होतं.

फार वर्षांपूर्वी बाप्पांची चार पोरं, सुना, मालकीण शेवंताबाई अन् सहा नातवंडं एका लग्नाच्या वऱ्हाडाच्या अपघातात मरण पावली होती. लहानगा गजू तेव्हा मावशीकडे गेलेला असल्यानं बचावला. हा धक्का त्यांनी मोठ्या कष्टानं, नेटानं पचवला होता.

आपल्या वडिलोपार्जित चिरेबंदी वाड्यात त्यांनी गजूला तळहाताच्या फोडागत वाढवला होता. मात्र त्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या चेहऱ्यावर मनमोकळं हसू कधीच दिसलं नव्हतं. त्यांच्या जगण्यात अगतिकता दिसे. त्यात चैतन्य नव्हतं, त्यात होता कालानुगतिक जीवनभाव.

ते केवळ जगायचं म्हणून जगत होते. जर गजू हयात नसता तर त्यांना वेड लागलं असतं किंवा त्यांनी जीवही दिला असता. बळेच आयुष्य कंठणाऱ्या बाप्पांच्या जीवनात रसरशीतपणा नावालादेखील नव्हता मात्र त्या रात्री शेवंतानं स्वप्नात येऊन त्यांना जणू संजीवनीच दिली.

शेवंतानं स्वप्नात दिलेला सांगावा रंगूबाप्पांनी बरेच दिवस आपल्या काळजात दडवला होता; पण आपल्या शेवटच्या दिवसांत मात्र ते गुपित त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यांच्या वागण्यात बदल का झाला होता याचं उत्तर त्यातून मिळालं. त्या रात्रीच्या स्वप्नात शेवंतानं सांगितलेलं, “देवळात उधळल्या जाणाऱ्या अबीर बुक्क्याच्या, गुलालाच्या प्रत्येक कणात मी आहे.

उदबत्तीच्या सुगंधात अन् चिरमुरे, बत्ताशाच्या गोडीत मी आहे. गोठ्यातल्या करड्या गायीच्या मायेत मी आहे. मी सर्वत्र आहे. माझ्याबरोबर पोरं, सुना, नातवंडं सुखरूप आहेत. पांडुरंग जोवर थांबवतो तोवर तुम्ही थांबा. जगरहाटीचं बघा. माझा शोध घेऊ नका. मी तुमच्या अंतःकरणातच आहे. उदास राहू नका. चित्त प्रसन्न ठेवा.

माझ्या पाठी देवानं तुम्हाला थांबवलंय त्यात देवाचा काहीतरी विचारपाचार असंल की नाही? माझी तुमची भेट होणार हायेच की? पर त्यासाठी जीव बारीक करून का जगतासा? गजूवर मायेचा हात असाच ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. जेव्हा तो सांगावा धाडंल तेव्हा तुम्हाला यायचंच आहे. तेव्हा तुम्हीही हसतमुखानंच माझ्याकडं आलं पाहिजे!’’

शेवंतानं सांगितल्यानुसार नंतरचं आयुष्य रंगूबाप्पा अखेरपर्यंत रसरसून जगले. जगण्याचा खराखुरा आनंद त्यांनी घेतला. इतरांच्या आयुष्यातही आनंदतरंग भरले.

अखेरच्या घटिका मोजत असताना रंगूबाप्पांनी आपल्या पाठीमागं गजूची नि त्याच्या पोराबाळांची काळजी घ्यायचं आर्जव आपल्या लाडक्या नातसूनेकडं केलं. त्या घटनेलाही बरीच वर्षे झालीत. रंगूबाप्पांच्या पडक्या वाड्यापुढून जाताना आजदेखील काही क्षण पावलं थबकतात, त्यांची आठवण येते. आजही गावात आल्यावर रंगूबाप्पांच्या आठवणींनी मन हळवं होतं.

त्या स्मरणगंधात गुंतून पडत नकळत पांडुरंगाच्या देवळासमोर कधी येऊन उभा राहतो ते उमजत नाही. देवळात त्यांचा भास होतो. तेव्हाची नाती खरी होती अन् नात्यांचे ते सांगावेही सच्चे होते, ज्यात बहुपेडी जीवनकळा ठासून भरल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com