Rural Story : झडीचे दिवस

Village Story : शाळा सुरू होऊन महिना दीड महिना होऊन गेलेला. दोन दिवस सुट्टी आली आणि पुढचा शनिवार- रविवार लागून मिळाला. लगेच गावाकडची वाट धरली. चकवा देणाऱ्या पावसाशी न दमता खेळत पेरण्या आटपलेल्या.
Rural Story
Rural StoryAgrowon
Published on
Updated on

जयंत खाडे

Village Rain : शाळा सुरू होऊन महिना दीड महिना होऊन गेलेला. दोन दिवस सुट्टी आली आणि पुढचा शनिवार- रविवार लागून मिळाला. लगेच गावाकडची वाट धरली. चकवा देणाऱ्या पावसाशी न दमता खेळत पेरण्या आटपलेल्या. अंकुरण्याची जिद्द बियांना होती की काय कोण जाणे, बऱ्यापैकी सगळ्या शिवारात इराडलं होतं. पाऊस लागून राहिला होता.

शिवारात भांगलण, कोळपण करून वर आलेले पीक वाऱ्यावर डोलायला लागलेलं. आषाढाचा महिना आणि नक्षत्र बदललं होतं. त्याचा परिणाम म्हणून गार गार वारे काळ्याभोर ढगासह वाहायला लागलेले. तसा आमच्या गावाकडचा पाऊस म्हणजे, मामा म्हणतो तसा, थुका थुकल्यागत. पण आज मात्र वातावरण बदललेलं, झडीचे दिवस आल्यासारखं.

घरात जाईपर्यंत बऱ्यापैकी पावसाची सततधार सुरू झाली. सोप्यात पावसाचं थेंब पडून ओलावा पसरायला सुरुवात झालेली. दारात बांधलेली शेरडं पावसामुळे दावं ओढून ओढून सोप्यात बसलेली आणि त्यांच्या लेंड्यामूताचा वास सोप्यात पसरलेला. दिवसभर सारखा पाऊस चालू राहिला, एकसलग रेवं पडत राहिलं. रात्री उपलाण्याच्या घरात आखाडीचं आवतन होतं म्हणून मी जेवायला गेलो. वशाट जेवणाच्या आठवणीनं बराच वेळ तोंडाला पाणी सुटलेलं. एक दिवटी देवळीत ठेवली होती. त्याच्या अपुऱ्या उजेडातच सगळी पंगत बसली. माझ्या शेजारी एका बाजूला दाजी आणि एका बाजूला मामा बसला. समोर मळ्यातला आण्णा चिखल तुडविलेल्या पायाने भुई रॅड करत आला आणि पंगतीत बसला. ताटं वाढली आणि मी जेवायला सुरुवात केली. पहिल्या दोन घासांतच माझ्या कानातून गरम वाफा यायला लागल्या. खूप तिखटाने दोन घासांतच तोंड पुरतं पोळून गेलं. सगळी पंगत वरपून जेवत होती आणि मी दोन्ही बाजूंना घावंल त्या तांब्यातील पाणी प्यायला लागलो. कसं तरी कोरडी भाकरी खाऊन तिथून उठलो आणि घराकडे आलो. पोत्यातल्या चार कच्च्या शेंगा फोडून खाल्ल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं. खोलीत येऊन पडलो, बाहेर सलगपणे पाऊस पडत होता.

Rural Story
Rural Story : जुन्या नात्यांचा गोडवा

सकाळी उठलो तर रात्रभर पडणाऱ्या पावसानं दारात चांगलाच चिखल झालेला. त्यातच भिजलेलं जळण चुलीत घातल्याने घरात सगळा धूर. सगळीकडे कुंद वातावरण. अगोदरच मधल्या घरात उजेड कमी येतो; त्यात काळ्या ढगांनी व्यापलेल्या आभाळाने आणखी काळोखी पसरलेली. खालतीकडेच्या नाल्यातून पाणी वाहायला लागलं. उकिरड्यावर उन्हाळ्यात चोखून फेकलेल्या आंब्याच्या कोयांमधून रोपं फुटलेली. दहा वाजता जरा उघडल्यासारखं झालं. मग काका, वाड्यातल्या अप्पांचं जेवण घेऊन माळाला निघालो.

तळ्यात जरा पाणी साठायला सुरुवात झाली होती. दगडावर थापलेल्या गोवऱ्या काढून घ्यायला वाड्यातल्या बायका जमलेल्या. पोखरवाटंच्या डोंगरातून पाण्याचा पाट वाहायला लागला होता. रात्रभर चांगलाच जिरवणीचा पाऊस झालेला. माळाला जाईपर्यंत दोन वेळा मोठ्या चळका आल्या. रानात खालती हायब्रीड पेरलेल्या वावरात गुडघाभर पाणी साचलेलं होतं. काका, अप्पा तालीमधनं पाणी काढून खालच्या नालीत सोडत होती. शिवामामाची पडकी विहीर समडम भरलेली. त्यांचं जेवण तिथंच दिलं. फडक्यातल्या भाकरी भिजलेल्या. मी तरी काय करणार? दोघं म्हणाले, ‘असूदे खातो कुस्कुरून.’

Rural Story
Rural Story : राम कृष्ण हरी....

मी तालीवरून जायचं सोडून पुढं पांदीतून वर छपराकडं आलो. गोठ्यात, छपरात एक थेंब गळत नव्हतं. मामानं मेहनतीनं सगळं छप्पर शेकरलं होतं. सगळी जित्रापं गोठ्यात बांधलेली. दावणीत बक्कळ वैरण टाकलेली. बाकी एका बाजूला ओली, वाळली वैरणं निगुतीने दास्तानी लावलेली. सगळा गोठा स्वच्छ ठेवलेला. खुरुड्यातून सोडलेल्या कोंबड्या वैरणीत, भुसकाटात जागा करून बसलेल्या. सदा उधळणारी रेडी एका जागेला गप्प रवंथ करत बसलेली. पाय मोडक्या गायीच्या डोळ्यांत पाणी भरलेलं. कदाचित, हा तिचा शेवटचा पावसाळा असावा. मी तिच्या अंगावरून हात फिरवला. तिच्या दुखऱ्या पायाला तात्यांनी पाला फडक्यात घालून बांधला होता. सगळी जित्रापं स्वच्छ धुतलेली, कोणाच्या अंगावर शेणाच्या रेघोट्या का गोमाश्‍या नव्हत्या. थोरली माणसं रानात का राहतात ते मला कळलं.

पाऊस जरा उघडल्यासारखा झाल्यावर बाहेर जाऊन वरच्या तालीकडे गेलो. ताल भरून पाणी वाहत होतं. मी छपरात येऊन थोडा वेळ बसलो. एक पोतं अंथरून जरा पडावं म्हटलं, पण झोप येईना. तेवढ्यात कुत्रं जोरात भुंकायला लागलं, मांजर पण टम शेपटी फुगवून छपरात आलं. मी बाहेर आलो. कुत्रं विहिरीकडं भुंकत होतं म्हणून पुढं आलो, तर बेटाच्या पल्याड एकच चिंब भिजलेलं माकड दिसलं. मला पाहून ते आवाज काढत अंगावर आल्यासारखं करायला लागलं. मी जरा घाबरलो मग काठी घेऊन आल्यावर ते दगडांच्या ढिगाऱ्यावर चढलं. निरखून पाहिले तर ती लोंबत्या स्तनांची माकडीण होती. एकटीच माकडीण कशी फिरते हे कळेना. कुत्रं तिच्या मागं लागलेलं तर ती त्याला पुढे येऊ देईना. अस्वस्थ माकडीण वरच्या तालीकडे जाऊन परत येत होती. मी बाजूनं तालीवर गेलो तर तिथं एक लहान माकडाचं पिलू निपचित पडलेलं. नुकताच त्याचा प्राण गेला असावा. माकडीण अस्वस्थपणे सारखी येरझाऱ्या घालत होती. मला काय करायचं ते समजेना. कुत्री पिलाला फाडणार हे दिसायला लागलं. तोपर्यंत रस्त्यानं आपुगड्याचा रवी वसाहतीतील माणसाबरोबर वस्तीवर निघालेला दिसला. मी हात केल्यावर तो आला आणि त्यानं लगेच मला टिकाव आणायला सांगितलं. टिकावानं त्यानं माळालाच खड्डा काढला आणि फाटकं पोतं अंथरून पिलाला खड्ड्यात टाकून वरून माती सारली. त्यावर काट्याची फांजर व मोठे दगड ठेवले. माकडीण गेली नव्हती, पण शांतपणे बघत राहिली. रवीनं मला हलायला सांगितलं आणि तो पण निघाला.

काकांनी बैल बाहेर काढून गाडी जुपली. मी गाडीत बसून घरी आलो. दिवसभर भिजून मला जरा कणकण आलेली. जेवून पडलो, पण झोप येईना. सारखं माकडीण आणि तिचं पिलू डोळ्यांसमोरून जाईना.

सकाळी उठलो तर गाडी खोरीला निघाली. मामा, काका आणि मळ्यातली पण दोघंतिघं आमच्या बरोबर आली. खोरीला पाण्यानं तळं भरलेलं, तर रानात पाण्यानं मोठी ओघळ पडलेली. बरीच माती वाहून गेलेली. काय करायचं याची चर्चा चालली तोवर मी डोंगराकडे आलो. तिथं ढोबळ्याचा पका सीताफळं शोधत होता. सीताफळं लगडली होती, पण अजून लहान होती. आज पका नारळ घेऊन देवाला निघालेला. मला जरा कणकण होती; पण पुन्हा लवकर जायला मिळायचं नाही म्हणून मी पण त्याच्या बरोबर निघालो.

खालीच फॉरेस्टची माणसं आणि गडी झाडं लावायला आलेली. आम्ही तिथं थांबलो तर पाटील मळ्यातला म्हातारा पावसात भिजत तिथं थांबलेला. म्हातारा ठार बहिरा. त्याला फॉरेस्टच्या साहेबानं झाडे लावतोय म्हणून सांगितलं. हातवारे केल्यावर म्हाताऱ्याला काय जुळणी चालली आहे ते समजलं. तो मोठ्यानं बोलायला लागला, ‘अशी झाडं जगत्यात व्हय? आणि ही कसली झाडं आणल्यात? लकांनो, डोंगरात झाडं लावायची नसत्यात, ती उगीवत्यात, फकस्त दोन साल डोंगरावर कोणाला सोडू नका, बघा डोंगर भरून जाईल.’ साहेब म्हाताऱ्याकडं बघत राहिला. म्हातारा जवळच्या घानेरीच्या झुडपाकडे गेला आणि त्यानं त्याच्या बुडख्याला लिंबाचं रोपट उगवलेले साहेबाला दाखवलं. साहेब मान हलवायला लागला.

आम्ही डोंगरावर निघालो, वर काश्मीरच्या चित्रासारखं धुकं पडलेलं. तीन टेंगुळ चढून गेल्यावर माथा लागतोय. डोंगर चढताना मला एकदमच हलकं हलकं वाटायला लागलं. मी वेगळ्याच स्वप्नमयी दुनियेत गेलो. संतोषगिरीच्या महाराजानं मला खांद्यावर घेतललं. हाताची तिट्टी माझ्या कंबरेला टाकलेली. लांब लांब ढेंगा टाकत तो चाललेला. जाताना माझ्या तळव्याला त्यानं गुदगुल्या केल्या. मी खिदळून पाय झाडलं मग त्यानं माझे पाय, तळवे चोळले. वाऱ्याच्या तालावर सुरात त्यानं‘'सुंबरान मांडलं गा, सुंबरान मांडलं’ चालू केलं. मी त्याला विचारलं, ‘हे सुंबरान मांडलं गा, मजी काय रं?’ तो गडगडा हसून म्हणाला ‘आठीवलं तस मांडलं.’ मला कधी डोंगरमाथा आला ते कळलंच नाही.

देवळात दह्याबाचा देवा आणि एक धनगर पाय पसरून बसलेले. पकाने नारळ वाढवला, अर्धे भकाल ताटात ठेवलं आणि अर्ध सगळ्यांना वाटलं. देवासोबतचा धनगर उपाशी होता, देवानं ताटातले भकाल त्याला दिलं. आम्ही दोघांनी कपाळभर भंडारा लाऊन घेतला. गाभाऱ्यात जाऊन महाराजापुढं डोकं टेकले. महाराजा बारीक डोळं करून दाढीमिशातून हसायला लागला. मग मी पण बाहेर येऊन ‘सुंबरान मांडलं गा’ सुरू केलं. सगळी हसायला लागली आणि आम्ही परतीची वाट धरली.

रानात डोंगरातून येणाऱ्या पाण्याला वाट केली होती. फुटलेली ताल सांधून घेतली होती. माणसं तलावात हात-पाय धुऊन, पानी पिऊन वर आली आणि गाडी जुपून घराकडे निघालो. घरात पोहोचेपर्यंत अंधार झालेला, घरात धूर भरलेला. पलीकडे सगळ्या आत्या, पाहुणे जमलेले. बाबयची परिस्थिती नाजुक झालेली. मी खोलीत पडलो. झोपेत बाबय खालतीकडच्या वाटेवरील आडाशेजारील पिंपळावर बसलेली दिसायला लागली.
------------
(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com