Crop Management : भाजीपाला पिकाच्या वेलीला योग्य पद्धतीने आधार आणि वळण दिल्यास चांगली वाढ होते. तसेच दर्जेदार उत्पादनही मिळते. पिकात दोन ओळींमध्ये १ ते २ महिने कालावधीचे आंतरपीक घेता येते. वेल ६ ते ७ महिने चांगल्याप्रकारे उत्पादनक्षम राहते.
वेलांना आधार आणि वळण देण्याची पद्धत
बिया टोकणीनंतर ८ ते १२ दिवसांत रोपे उगवून येतात.उगवणीनंतर चांगले जोमदार वाढलेले एक रोप ठेवून बाकी रोपे काढून टाकावीत.
वेलींच्या जवळ एक फूट उंचीच्या काड्या रोवून घ्याव्यात. रोवल्यानंतर काड्यांना सुतळी बांधावी. सुतळी वेलींच्या अगदी बरोबर वरून आडव्या जाणाऱ्या तारेला दोन पदरी पद्धतीने बांधाव्यात.
सुतळीच्या पिळ्यामधून वेळोवेळी वेली ओढून घ्याव्यात. वाऱ्याच्या हेलकाव्याने वेली खाली पडणे यामुळे टाळता येते. वेलींचा शेंडा मोडणार नाही, याची काळजी घ्यावी.
मुख्य वेलीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी बगल फूट काढणे गरजेचे आहे. वेल तारेच्या खाली एक फुटावर आल्यानंतर वेलीची बगल फूट काढणे बंद करावे. वेली त्यानंतर ३ ते ४ फुटी मांडवाच्या तारेवर आडव्या पसरून घ्याव्यात.
मंडप आणि ताटी पद्धत
कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी मंडप आणि ताटी पद्धतीचा अवलंब करावा.
अ) मंडप पद्धत
या पद्धतीमध्ये १.५ × १.० मीटर अंतरावर वेलवर्गीय भाजीपाला रोपांची लागवड करावी. यासाठी १.५ मीटर अंतरावर सरी पाडावी. मांडवाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी एक आड एक सरी सोडून म्हणजे ५ मीटर अंतरावर १० फूट उंच आणि ४ इंच जाडीचे लाकडी खांब शेतीच्या बाहेरील बाजूस झुकतील, अशा पद्धतीने २ फूट जमिनीत गाडावेत.
खांबाच्या खालच्या बाजूवर डांबर लावावे. यामुळे जमिनीत गाडल्यावर खांब कुजण्याचे प्रमाण कमी होते. प्रत्येक खांबास बाहेरील बाजूने १० गेज जाडीच्या तारेने ताण द्यावा. त्यासाठी १ ते १.५ फूट लांबीच्या निमुळत्या दगडास तारा बांधून तो दगड जमिनीत २ फूट खोलीपर्यंत पक्का गाडावा. नंतर खांब बाहेरील बाजूस ओढून ६.५ फूट उंचीवर तारेने ताणून पक्का करावा.
तार खाली घसरू नये म्हणून तारेवर यू आकाराचा खिळा ठोकून तार पक्की करावी. अशा रीतीने खांबाला ताण दिल्यानंतर १० गेज क्षमतेची तार पीळ देऊन ६.५ फूट उंचीवर यू आकाराचा खिळा ठोकून त्यातून ओवून घ्यावी. तसेच चारही बाजूंचे समोरासमोरील लाकडी खांब एकमेकांना १० गेजच्या तारेने जोडून घ्यावेत.
पुलरच्या साह्याने ताण द्यावा. नंतर १.५ फूट अंतरावर १६ गेज जाडीची तार आडवी उभी पसरावी. म्हणजेच जमिनीपासून ६.५ फूट उंचीवर १.५ x १.५ फूट आकाराचा चौरस तयार होईल.
चौरस बनल्यानंतर वेलीच्या प्रत्येक सरीवर ८ फूट अंतरावर बांबूने (१० फूट व २ इंच जाड) वेलांच्या तारेस आधार द्यावा. असे केल्याने मंडप झुकणार नाही, तसेच वाऱ्याने हलणार नाही. वेल साधारण १ ते १.५ फूट उंचीचा होण्यापूर्वी मंडप उभारणीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
मंडप तयार झाल्यानंतर साधारण ६.५ ते ७ फूट लांबीची सुतळी घेऊन तिचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे. दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे. सुतळीस पीळ देऊन वेल चढवावा.
वेल सुतळीच्या साह्याने वाढत असतानाच बगल फूट आणि तणावे काढावेत. ५ फूट उंची झाल्यानंतर बगल फूट आणि तणावे काढणे थांबवावे. मुख्य वेल मांडवावर पोचल्यानंतर त्यांचा शेंडा खुडावा. राखलेल्या बगल फुटींच्या वाढ होण्यासाठी भर द्यावा.
मंडपाच्या सर्व तारांना सारखा ताण द्यावा. तारा केवळ हाताने किंवा पकडीच्या साह्याने ओढून पाहिजे तेवढ ताण देता येत नाही. त्यासाठी लोखंडी पुलर आणि लाकडी पुलरचा वापर करावा.
ब) ताटी पद्धत
ताटी पद्धतीने १.५ × १ मीटर अंतरावर वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करतात. यासाठी १.५ मीटर अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक ५ मीटर अंतरावर आडवे पाट तयार करावेत.
सरीच्या लांबीच्या दोन्ही टोकांना १० फूट उंच आणि ४ इंच जाडीचे लाकडी खांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील या पद्धतीने जमिनीत २ फूट खोलीपर्यंत गाडावेत. खांबांना दोन्ही बाजूंनी १० गेजच्या तारेने ताण द्यावा.
ताण दिल्यानंतर ७ ते ८ फूट उंचीचे बांबू जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत गाडून उभे करावेत. वेलीमध्ये उभे केलेले बांबू आणि कडेचे लाकडी खांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी.
बांबू आणि खांबाच्या दरम्यान १६ गेज जाडीची तार जमिनीपासून २ फूट अंतरावर समांतर ओढावी. दुसरी तार जमिनीपासून ४ फूट उंचीवर, तिसरी जमिनीपासून ६ फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलीचे २ फूट उंचीपर्यंतचे तणावे आणि बगल फूट काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावा.
बांबूऐवजी शेवरी किंवा इतर जंगली लाकडाचा वापर केला तर खर्च कमी होतो. मात्र बांबू आणि तार जवळ जवळ तीन ते चार हंगामांसाठी वापरता येतात.
मंडप, ताटी पद्धतीचे फायदे
वेलीला आधार दिल्यास चांगली वाढ होते. वेल ६ ते ७ महिने चांगल्याप्रकारे उत्पादनक्षम राहते. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात.
वेलवर्गीय भाजीपाला पिकाची पाने, फळे यांचा संपर्क जमिनीशी होत नाही. हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे, कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते.
लागवडीमध्ये फवारणी व्यवस्थित करता येते. वेलवर्गीय फळांची व्यवस्थित वाढ होऊन रंग सारखा व चांगला राहतो.
फळाची तोडणी, खुरपणी ही कामे अत्यंत सुलभ रीतीने होतात.
पिकात दोन ओळींमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्यांचे अंतर पीक, उदा. पालेभाज्या, कोथिंबीर, पालक इत्यादी घेता येतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.