Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाचे सजीवसृष्टीवर होणारे विविध परिणाम

Rushikesh Kalange

सतीश खाडे

Rain Update : पावसाने थोडी हुलकावणी दिली तरी लोकांच्या मनामध्ये चिंतेचा काहूर माजते. अर्थात, त्यांची चिंता व्यर्थ नाही. कारण पाऊस आणि पाणी यांचा सर्वांच्याच जीवनावर विविध अंगांनी प्रभाव पडत असतो.

शहरी लोकांना वाटते की पाऊस हा फक्त शेतकऱ्याच्याच जीवनाशी निगडित आहे. पण प्रत्येकाचेच जीवन, आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, संस्कृती आणि सामाजिक शांतता यावर पावसाच्या प्रमाणाचा गंभीर परिणाम होत असतो.

पाऊस आणि जीवसृष्टी :

मुळात पृथ्वीवरील जीवसृष्टी निर्माण झाली आणि लाखो वर्षे जगते आहे ती पाण्यामुळेच. पाऊसच झाला नाही तर जमिनीत अन् जमिनीवर पाणी येणार कोठून? अपुऱ्या पाण्यामुळे केवळ पिकेच नाही, तर मोठमोठ्या झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. पाणी अजिबातच न मिळाल्यास पिके व झाडे मृत्युपंथाला लागतात.

मग खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अशा स्थितीमध्ये जंगली जनावरांचे प्रचंड हाल होतात. पाळीव प्राण्यांना माणसांचा थोडाफार आधार मिळतो. पण तेही त्यांच्यापासून काहीतरी उत्पन्न मिळते म्हणून. उत्पन्न न देणाऱ्या पाळीव प्राण्यांचे हाल कोण पुसणार? माणसाने कितीही प्रगती केली तरी दुष्काळाच्या स्थितीमध्ये त्यांचे हालही काही वेगळे नसतात.

पाऊस नसल्याने कोरडवाहू आणि भूजलही खोल गेल्यामुळे थोडीबहुत बागायती करणारा शेतकरीही हवालदिल होतो. नापिकीमुळे खाण्यापिण्याचे हाल, कुपोषण, अनारोग्य या साऱ्या बाबी एका मागोमाग येतात. आर्थिक उत्पन्नाची गोष्ट तर खूप दूर. त्यातूनच घडते मोठे स्थलांतर.

स्थलांतर

भारतातील अस्ताव्यस्त अन् अवाढव्य वाढलेली शहरे ही लोकांच्या स्थलांतराची प्रचिती देतात. शेतावर आपल्या कुटुंबाचे पोटच भरू शकत नाही, हे समजल्याशिवाय खरा शेतकरी कधीही गाव सोडत नाही. दुष्काळी भागातील कोणतेही गाव बघा, त्यांच्या घरामध्ये तुम्हाला फक्त म्हातारी मंडळी सापडतील.

चार भावांपैकी किमान दोघांनी तरी शहराची वाट धरलेली असते. तालुका, शहराची वाट धरल्यानंतर किमान पोटाची खळगी तरी भरेल, हाच उद्देश. हे प्रमाण किती याचा कुणाला पडताळा घ्यायचा असल्यास कोविड महामारीमध्ये देशभरातील घरी परतणाऱ्या लोकांचे लोंढे आठवावेत.

खरेतर कोणतेही स्थलांतर म्हणजे जिवंतपणे मरणच असते. कारण घरातील जिवलग विखुरतात, कुटुंब मोडते, गावेच्या गावे ओस पडतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने होणारे स्थलांतर थोडा वेळ बाजूला ठेऊ. अशा स्थलांतरापेक्षा गावात पाणी नसल्यामुळे होणारे स्थलांतर कित्येक पट अधिक आहे.

युनेस्कोच्या अहवालानुसार, जगभरात पाण्यामुळे होणारे स्थलांतराचे प्रमाण वर्षागणिक वाढतच आहे. २०५० पर्यंत जगभरात अडीचशे कोटी लोक पाण्यासाठी स्थलांतर करतील. आपल्याकडेही कोकणात २५०० मि.मी. पाऊस पडतो, तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी ६०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडतो.

पण दोन्ही भागांतून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. संबंध पाऊस किती येतो, त्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे नियोजन कुठेतरी चुकते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. स्थलांतरातून अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्‍न तयार होतात. वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांची व्याप्ती आणि तीव्रता दोन्हीही वाढतच जाणार, हे सांगायला कोणा शास्त्रज्ञाची गरज नाही.

आरोग्य

निती आयोगाच्या २०१८ च्या अहवालानुसार, भारतातील ६० कोटी लोकांना दूषित पाणी प्यावे लागते. भारतात उपलब्ध गोड्या पाण्यापैकी (नदी, तलाव, भूजल) ७० टक्के पाणी प्रदूषित आहे. पाणी गुणवत्तेबाबत १२२ देशांच्या यादीत भारताचा १२० वा क्रमांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ८० टक्के आजार पाणी व सांडपाण्यामुळे होतात.

यात डायरिया, कावीळ, टायफाइड या आजाराबरोबरच अनेक त्वचारोग व श्‍वसनाचे रोग सामील आहेत. पाण्याच्या प्रदूषणाला जोड मिळते ती रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचे आणि तणनाशकांचे अवशेष पाण्यात मिसळल्याने. अशा प्रदूषणामुळे कॅन्सर, किडनीचे विकार, श्‍वसन यंत्रणा, मेंदूचे विकार अशा आजारांची भर पडत आहे.

दूषित पाण्यामुळे उद्‌भवलेली आजारपणे, त्यामुळे कमकुवत झालेले शरीर, आजारपणात वाया जाणारे मनुष्यतास आणि औषधोपचारावरील प्रचंड खर्च यातून होणारे वैयक्तिक आणि राष्ट्रीय नुकसान कोण लक्षात घेणार?

मेडिकल कॉलेजेस, हॉस्पिटल्स, आरोग्य विमा व औषधांचे कारखाने यापेक्षा पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व सांडपाणी, मैलायुक्त पाण्यावर प्रक्रिया व त्याची योग्य विल्हेवाट हा आरोग्याकडे नेणारा महामार्ग आहे, हे आपल्या लक्षात कधी येणार? घरगुती सांडपाणी, मैलायुक्त पाणी यांचे मोजमाप आणि नियंत्रणाचे आव्हान देशात सर्वत्रच आहे.

अशा वेळी पावसामुळे येणारे ताजे, स्वच्छ आणि शुद्ध नवीन पाणी या सर्वांचीच तीव्रता कमी करण्यास मदत करते. ते आले नाही, तर या समस्यांची बेरीज नव्हे, गुणाकार होतो.

शिक्षण

पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे होणाऱ्या नापिकी, दारिद्र्य आणि स्थलांतर यांमुळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची मोठी फरपट होते. गावागावांत सरकारने प्राथमिक व माध्यमिक शाळा उभारल्या असल्या तर मुले तर गावात राहिली पाहिजेत ना! मुलांची शाळेतून गळती होण्याची कारणे डोळसपणे तपासली तर लक्षात येते.

पाणी भरायला घरी कोणी नाही, शाळेत टॉयलेट नाही, असले तरी तिथे पाणी नाही, यामुळे दुष्काळी गावांमध्ये प्रामुख्याने मुलांमुलींची गळती होते.

अर्थकारण

भारतात आजही ६२ टक्के लोकसंख्या ही शेतीतील उत्पन्नांवर अवलंबून आहे आणिही शेती पावसाच्या पाण्यावर. एखाद्या वर्षी पावसाने ओढ दिली तरी शेतकरी व त्यावर अवलंबून शेतमजुरांची बाजारातील खरेदी क्षमता शून्य होते. म्हणजेच त्या गावाचे अर्थकारण ठप्प होते. गावात वस्तूंची विक्री होत नाही.

विक्री नाही तर वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने ठप्प होतात. सर्व प्रकारच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. गाव, शहर, राज्य आणि देशाचे अर्थगाडेच थांबून जाते. भारतासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या देशामध्ये कोणत्या ना कोणत्या भागामध्ये चार ते सात राज्यात दरवर्षी दुष्काळ असतोच. याचे बँक व्यवसायापासून जीडीपीपर्यंत सर्वांना गंभीर परिणाम सोसावे लागतात.

समाजस्वास्थ व शांतता

पावसाच्या कमतरतेमुळे गाव उद्ध्वस्त होते. नापिकीतून स्थलांतराने शहरावर ताण वाढतो. हाताला काम नाही, बकाल आणि अर्धपोटी जगण्यातून जीवनाच्या आकांक्षांना मूठमाती मिळते. स्थलांतरामुळे शहरांवरही बोजा वाढतो.

पायाभूत सोयी आणि सुविधांवर प्रचंड ताण येतो. याचे विपरीत परिणाम समाज स्वास्थ्यावर होत राहतात. पूर्ण समाजमनच निराशेच्या गर्तेत जाण्याचा धोका असतो. त्यातून असंतोष निर्माण होतो. आंदोलने, दंगली, चोऱ्या, गुन्हेगारी वाढते. शांतताच धोक्यात येते.

संस्कृती

स्थलांतरामुळे समूहाच्या समूह एकमेकापासून दूर जातात. आनंद, दुःख वा महत्वाचे क्षण आप्तांच्या समवेत घालवता येत नाहीत. समाज म्हणून तुटलेपण येते. संस्कृती विकास आणि समृद्धी रिकाम्यापोटी होऊ शकत नाही.

उलट अशा अवस्थेत तिची वीण अधिक ढिली होऊन विस्कटत जाते. वैयक्तिक व सामाजिक पातळीवर कला, साहित्य, शास्त्र परंपरा यांतील नवनिर्मिती थांबतेच, उलट असलेल्या लोककला, लोकसाहित्य लोप पावत जाते.

वरील कोणत्याही व्याख्येत न बसणारी आणखी एक सामाजिक समस्या म्हणजे दुष्काळी व जिरायती गावातील लग्नाच्या मुलांना मुलीच न मिळणे. मुळात शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांसाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यात जर ते गाव कायम दुष्काळी असेल, तिथे कोण मुलगी देणार? स्वतःच आपल्या मुलीच्या डोक्यावर पाण्याचे हंडे कोण ठेवणार? हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहेच.

आम्ही गंभीर आहोत का?

पाऊस आणि पाण्याचा मानव जीवनावर इतका मोठा परिणाम होत असूनही आपण व्यक्तिगत, समाज किंवा गाव म्हणून या प्रश्‍नाकडे तितक्या गांभीर्याने पाहतो का? तर बहुतांश लोकांचे, गावांचे खरे उत्तर नाही, असेच असणार.

गावात पडणाऱ्या पावसाचे, त्याला अडविण्याचे, साठविण्याचे, जपण्याचे प्रयत्न किती गावे करतात? गावाचे सोडा, किती घरावर पडणारे पावसाचे पाणी साठवले जाते, हे तपासून पाहा. आम्हाला पाणी पुरविण्याची जबाबदारी सरकारची ही आपली भावना! माझा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दुसऱ्याने कोणीतरी काम केले पाहिजे.

स्वतः काही करण्यापेक्षा आम्ही स्थलांतर करणे, हरणे आणि मरणाला सामोरे जाणे पसंत करतो. वैयक्तिक, गट, गाव पातळीवर पाण्यावर काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. पावसाचा प्रत्येक थेंब गावात रोखणारी, पाण्याचा एकेक थेंब जपणारी त्यातून शेत फुलवणारी माणसे बनायचे की आहे ते प्राक्तन स्विकारणारी माणसे बनायचे, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

आपण निश्‍चय केला तर एकमेकांचे सहकार्य घेत आणि आवश्यक तिथे सरकारी योजना, मदतीचा हात घेत आपले गाव जल स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प नक्कीच तडीस जाईल.

पाणी साठवणे, पाणी वाचवणे, पाणी प्रदूषित न होऊ देणे, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर, पाणी गळती व पाणी चोरी रोखणे, शुद्ध पाणीपुरवठा आणि जलज्ञानी समाजाची निर्मिती ही सप्तपदी आपण लक्षात ठेवल्यास हा संकल्प नक्कीच सिद्धीस जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT