Bees Agrowon
ॲग्रो विशेष

Species of Bees : पालनासाठी मधमाश्यांच्या उपयुक्त प्रजाती

Information on Bee Species : पिकांचे उत्पादन वाढविण्यासोबतच मध, मेेण आणि अन्य उपउत्पादने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर घालतात. पालनासाठी मधमाश्यांच्या प्रजातींची माहिती या लेखातून घेऊ.

Team Agrowon

राहुल साळवे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर

Information on Bee Species

भाग : १

मधमाश्या मध उत्पादनाबरोबर पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पीक उत्पादन वाढीसाठी सर्व निविष्ठा वापरूनही पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतात मधमाश्या नसतील, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मधमाशीमुळे पिकांमध्ये उत्तमरीत्या परागीभवन होते. त्यामुळे चांगले आणि अधिक उत्पादन मिळते, यासाठी मधमाशींची संख्या कशी वाढविता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

‘एफएओ’च्या एका अहवालानुसार जगात मधमाश्यांची संख्या कमी होत गेली तर १० वर्षांत अन्नधान्य उत्पादन एक तृतीयांशाने घटेल. याचा मोठा फटका भारतासारख्या विकसनशील देशांना बसणार आहे. आज विविध कारणांनी मधमाश्‍या, त्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत. तसेच कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराने देखील मधमाश्यांसह अनेक परागसिंचक कीटकांच्या जाती नामशेष होत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन करून मधमाश्यांचे वसाहती वाढविणे गरजेचे आहे.

मधमाशीपालनाचा उद्देश :

मधमाशीपालनाचा मुख्य उद्देश फळवर्गीय, भाजीपालावर्गीय व तेलवर्गीय पिकांचे परागसिंचन करून उत्पादन वाढविणे.

मध, मेण आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन करणे.

मानवी आरोग्यासाठी प्रथिने, संप्रेरके आणि व्हिटॅमिन्स यांचा मुख्य स्रोत असणाऱ्या रॉयल जेलीचे उत्पादन (तसेच परागकणाचे उत्पादन) करणे.

संधिवाताची चिकित्सा करण्यासाठी मधमाशीपासून निघणाऱ्या विषाचे उत्पादन करणे. अशा प्रकारे मधमाशीपालनाचे विविध उद्देश असले, तरी मध उत्पादनावरचा सर्वसाधारण मानवाचा कल दिसून येतो. तथापि, पिकांचे उत्पादन वाढीसाठी म्हणून मधमाश्‍यापालनाचे महत्त्व सर्वांना ज्ञात होणे आवश्यक आहे. त्यामुळे मधमाशीपालन हे कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचे व अनिवार्य अंग झाले पाहिजे.

मधमाश्‍यांचे प्रकार :

भारतामध्ये एकूण चार प्रकारच्या मधमाश्‍या आढळून येतात. त्यापैकी सातपुडी मधमाश्‍या या मधमाशीपालनाच्या दृष्टीने उपयुक्त व योग्य आढळून आल्या आहेत.

सातपुडी (एपिस सेरेना इंडिका)

ही मधमाशी संपूर्ण देशभर आढळते.

या माश्या आकाराने आग्या माश्यांपेक्षा लहान व झुडपी माश्यांपेक्षा मोठ्या असतात.

वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहतात. पोकळी मोठी असेल, तर पोळ्यांची संख्या ९ ते १० पर्यंत वाढवितात.

पोळ्याचा आकार देखील मोठा असतो. एक पोळे २० बाय १५ सेंमी आकाराचे असते. पोळ्यामधून एकाच वेळी ३ ते ४ किलो मध मिळू शकतो.

या मधमाश्‍या स्वभावाने शांत असून सहजरीत्या माणसाळतात. या गुणवैशिष्ट्यांमुळे कृत्रिम अशा लाकडी पेट्यांत ७ ते १० चौकटी ठेवून त्या पोकळीत त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करता येते.

कायम अंधाऱ्या जागेत, झाडाच्या पोकळीत, दगडांच्या कपारीमध्ये, दगड निखळून झालेल्या विहिरीतील किंवा घराच्या पोकळीत, अडगळीच्या जागी असलेल्या रिकाम्या मडक्यात, जुन्या टाकून दिलेल्या मोटार, ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या टायरमध्ये राहते. अशा पोकळीत त्या नेहमी एकमेकाला समांतर अशी सात ते आठ पोळी एका रांगेत बांधतात. त्यामुळेच त्यांना सातपुडी, सातेळ, सातेरी व सातपाळी अशी नावे देण्यात आली आहेत.

युरोपीयन मधमाशी (एपिस मॅलिफेरा)

ही माशी युरोप आणि इटलीमध्ये आढळून येते. या माश्यांना सहजपणे पाळणे शक्य आहे.

या माश्‍या दगडाच्या कपारित, अंधारात झाडांच्या ढोलीत पोळी बांधतात. पोकळीचा आकार ४५ बाय २५ सेंमी इतका असतो. साधारण ७ ते १० पर्यंत पोळे बांधतात. - प्रति वर्षी या माश्या ५० ते १०० किलो मध प्रति पोळे निर्माण करतात.

झाडी, झुडपी लहान मधमाशी (एपिस फ्लोरिया)

या माशीला छोटी माशी असे म्हणतात. कारण ही माशी छोटे म्हणजेच साधारण २० बाय १५ सेंमी आकाराचे एकच पोळे बनविते.

हे पोळे झाडाच्या फांदीला, झुडपामध्ये किंवा इमारतीच्या भिंतीला आढळून येते.

या पोळ्यामधून जास्त मध प्राप्ती होत नाही. (०.५ किलो मध प्रति वर्षी प्रति पोळे)

या माश्‍या कधीही हल्ला करत नाहीत.

ही माशी लाकडी पेटीत राहत नाहीत. त्यामुळे माश्यांचे पालन करणे शक्य होत नाही.

आग्या मधमाशी (एपिस डोरसाटा)

या माश्‍या आकाराने सर्वांत मोठ्या असून स्थलांतर करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना पाळता येत नाही.

या मधमाश्‍या स्वभावाने जास्त चिडक्या, रागीट व क्रूर असतात.

त्यांच्या वसाहतीवर हल्ला होतोय असे जाणवल्यानंतर या माश्‍या चवताळतात आणि दंश करतात. दंश केल्यानंतर भयंकर आग होते. त्यासाठी या मधमाश्‍यांना रात्रीच्या वेळी धूर करून मध गोळा केला जातो.

या मधमाश्‍या मोठ्या झाडांवर, उंच इमारतीच्या छताखाली, उंच पाण्याच्या टाक्यांजवळ भलेमोठे एकच पोळे (१ बाय १ मीटर वसाहत) बांधतात.

या मधमाश्यांची मध गोळा करण्याची शक्ती अफाट असते. एका पोळ्यातून एकाच वेळी ३० ते ४० किलोपर्यंत मध मिळू शकतो.

या माशीच्या आक्रमता व स्थलांतर या गुणवैशिष्टांमुळे त्यांचे व्यावसायिकदृष्ट्या संगोपन करून मध गोळा करणे यशस्वी झाले नाही.

डॅमर (डास) माशी (मेलिपोना इरिडीपेनीस)

या मधमाश्‍या आकाराने इतर मधमाश्‍यांपेक्षा फारच लहान म्हणजेच मच्छराच्या आकाराएवढ्या असतात.

झाडाच्या किंवा भिंतीच्या पोकळीत द्राक्षाच्या घोसासारखे पोळे बांधतात. द्राक्षाच्या आकाराच्या प्रत्येक कुपीत मध गोळा करून ती सीलबंद करून ठेवतात.

पोळे अतिशय लहान म्हणजे ६ ते १२ इंच लांब इतक असते. परंतु झाडाची पोकळी मोठी असेल, तर त्यादेखील दोन अडीच फूट लांबीचे पोळे बांधतात.

या मधमाश्‍यांचा डंख संरक्षणाच्या दृष्टीने कुचकामाचा असतो. तरीदेखील त्या पोळ्याचा संरक्षण उत्तमरीतीने करतात.

संरक्षणासाठी पोकळीच्या तोंडाशी मेणाची एक ते दीड इंच लांबीची नळी तयार करतात. सायंकाळी सर्व माश्‍या पोळ्यात आल्या, की कामकरी माश्‍या या नळीचे तोंड मेणाच्या पडद्याने बंद करतात. त्यामुळे पाल, सरडे व अन्य शत्रू कीटक त्यांच्या पोळ्यात शिरू शकत नाहीत. सूर्योदय होताच पडदा तोडून माश्‍या मार्ग मोकळा करतात.

पोळे काढण्याचा किंवा मध काढण्याचा प्रयत्न केला, तर त्या हजारोंच्या संख्येने पोळ्याबाहेर पडतात. आणि मनुष्याच्या कानात, डोळ्यात शिरून हल्ला करतात. चावा घेताना विशिष्ट प्रकारचा द्रव कातडीवर सोडतात. त्यामुळे अंगाची आग होते.

पोळ्यातून एका वेळी ३० ते ५० ग्रॅम मध मिळतो. मध चवीला थोडा आंबट, खारट व काळपट असतो. काही वेळा स्वच्छ व गोड मध देखील मिळतो.

पोळ्याची विशिष्ट रचना व फार कमी मध साठविण्याची क्षमता यामुळे त्यांना पाळण्याचा प्रयत्न कोणी करत नाही.

डॉ. पुरुषोत्तम नेहरकर (विभाग प्रमुख), ९८२२९ ३६९८६

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT