Pune News : ‘‘रासायनिक औषधमुक्त शेती काळाची गरज आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे परागीभवन करणाऱ्या मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मधमाशीचे अस्तित्व असेल तर परागीभवनामुळे उत्पादनात दीडपट वाढ होते. राज्यात मधमाशांची गावे विकसित होणे आवश्यक आहेत.
मधमाशांचे गाव विकसित करण्यासाठी शेतकरी पुढे आल्यास त्यासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ करेल,’’ असे आश्वासन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिले.
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२४ , पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन व पीक परिसंवादाचे उद्घाटन आमदार अतुल बेनके, कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे शेतकरी, कृषी साहाय्यक यांचा सत्कार व केव्हीकेचे शास्त्रज्ञ राहुल घाडगे, निवेदिता शेटे लिखित मायक्रो ग्रीन माहितीपत्रकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘एनएचबी’चे उपसंचालक डॉ. एस. के. राय, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम केव्हीकेच्या माध्यमातून व्रतस्थ राहून अध्यक्ष अनिल मेहर करत आहेत. वातावरणातील वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे.
बदलत्या हवामानानुसार शेती पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. बदलते हवामान व शासनाचे धोरण याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.’’ या वेळी संजय काळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार रवींद्र पारगावकर यांनी मानले. सूत्रसंचालन सुनील ढवळे, मेहबूब काझी यांनी केले.
शेतकऱ्यांनी फळांचा ब्रँड तयार करावा ः आमदार बेनके
‘‘सर्व प्रकारच्या फळ भाजीपाल्याचे उत्पादन घेणारा जुन्नर तालुक्यातील शेतकरी कल्पक आहे. शेतीला नवीन दिशा देण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे. शेतकऱ्यांनी फळांचा ब्रँड तयार केला पाहिजे. देशाची प्रगती करत असताना देशातील शेतकरी, नागरिक सुखी समाधानी कसा राहील असे काम राज्यकर्त्यांनी करावे.
कांदा निर्यात बंदच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. कांदा, द्राक्ष, सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न मी विधानसभेत मांडले. डिंभे ते माणिकडोह दरम्यान कालवा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा फटका जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसण्याचा धोका आहे,’’ असे आमदार अतुल बेनके म्हणाले.
कांदा बँक काढण्याचा प्रस्ताव
शिवनेरी हापूसच्या नामांकनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. केव्हीकेचे अध्यक्ष मेहेर म्हणाले, की तालुक्यात उच्च दर्जाची फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. पर्यटन विकास होत असताना त्याला शेतीची जोड देणे आवश्यक आहे, यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढेल. कांदा चाळीत ३० ते ३५ टक्के कांद्याचे नुकसान होते. कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यात कांदा बँक काढण्याचा केव्हीकेचा प्रस्ताव आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.