Silage Making Agrowon
ॲग्रो विशेष

Silage Making : चारा टंचाई काळात मुरघास उपयुक्त

Team Agrowon

एस.एस.संकपाळ, डॉ.व्ही.जे.गिम्हवणेकर

Silage Production : मुरघास हा ओला चारा वर्षभर उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी मुरघास अतिशय उपयोगी आहे. यामध्ये ज्या वेळी ओला चारा उपलब्ध आहे, त्यावेळी त्यावर विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून त्याच स्वरूपात व त्यातील पोषणमूल्य कमी न होता साठवून ठेवू शकतो.

मुरघास केल्याने हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता वाढते. हा चारा आपत्कालीन काळात उन्हाळ्यात व दुष्काळात जेव्हा हिरवा चारा उपलब्ध नसतो तेव्हा फार उपयुक्त असतो. या पद्धतीमध्ये हवा विरहित अवस्थेत जगणाऱ्या सूक्ष्म जिवांमुळे हिरव्या वैरणीतील साखरेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते.

मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर गवत, मारवेल गजराज, मिनी गवत या कर्बोदकयुक्त चाऱ्यापासून चांगला मुरघास बनवता येतो. चाऱ्याची २ ते ४ सेंमी यंत्राच्या साहाय्याने कुट्टी करावी. कुट्टी केल्याने जास्त प्रमाणात चारा साठवता येतो व हवाबंद ठेवल्यास मदत होते.

दव असताना मुरघासासाठी चारा कापू नये. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढते. फुलोरा आला असता कापणी केल्याने त्यावेळी त्या चाऱ्यात जास्तीत जास्त अन्नघटक व जीवनसत्त्वे असतात.

मुरघासाची उपयुक्तता

१. मुरघास रुचकर, रसदार ,कसदार व किफायतशीर व सौम्य रेचक खाद्य आहे. चांगल्या मुरघासाचा रंग सोनेरी असतो. त्याला गोड, आंबूस वास येतो त्यामुळे हिरव्या चाऱ्यातील अन्नघटकांचे पाचक मूल्य वाढते. सर्व अन्नद्रव्य, जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो.

२. मुरघासामुळे खुराकाची बचत होते. त्यामुळे खाद्य खर्चात बचत होते. मुरघासातील सेंद्रिय आम्लांचा उपयोग जठरात तयार होण्याच्या आम्ल-रसासारखा होतो. त्यामुळे पचनसंस्था सुलभ होते.

३. जनावरांची भूक वाढते. दूध उत्पादनात वाढ होते. वाळलेल्या वैरणीतील अन्नघटकांची त्रुटी भरून निघते.

४. उपयुक्त व पौष्टिक चारा, गवत यांचा वापर मुरघासामध्ये केल्याने प्रथिने, कॅरोटीनचे प्रमाण वाढते.

५. मुरघास कोणत्याही मोसमात करता येतो. जेणेकरून जनावरांसाठी बाराही महिने हिरवा चारा उपलब्ध होतो.

मुरघासासाठी पिकाची निवड

१) मका पीक दुधाळ अवस्थेत असताना कापणी करावी. ज्वारी पीक फुलोऱ्यात असताना कापणी करावी. डाळवर्गीय चारा हा फुलोऱ्यात असताना कापणी करावी. यापासून बनवलेल्या मिश्रणाचा मुरघास हा स्वादिष्ट, रुचकर आणि संतुलित असतो. पिकाच्या खोडात भरपूर शर्करा व कर्बोदके असावीत.

२) मुरघास तयार करण्यासाठी सर्वच चारा पिकांचा वापर करता येतो. कडवटपणा असलेल्या पिकांपासून मुरघास बनवताना प्रक्रियेदरम्यान कडवटपणा नाहीसा होतो.

३) तृणधान्य पिकात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. जिवाणूंची त्यावर प्रक्रिया होऊन अमोनिया तयार होतो व आम्लतेचे प्रमाण कमी होते.

४) पिकामध्ये फुलोऱ्यानंतर दाणे भरत असतानाच्या अवस्थेत भरपूर अन्नद्रव्ये असतात. शक्यतो डाळवर्गीय पिके एकटी न वापरता ६० ते ८० टक्के तृणवर्गीय आणि २० ते ४० टक्के डाळवर्गीय असे प्रमाण घेतल्यास मुरघास उत्तम होतो.

मुरघास तयार करताना

१) पाणी ६५ टक्के असावे.

२) ताबडतोब उपलब्ध होणारी कर्बोदके असावीत. इतर अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असावीत.

३)मुरघास पिशवीत भरताना घट्ट दाब द्यावा.

४) जास्त प्रथिनांच्या चाऱ्यात १ टनाला १५ कि. ग्रॅ. मळी वापरावी.

कमी प्रथिनांच्या चाऱ्यात युरिया वापरावा.

मुरघास बनवण्याच्या पद्धती :

खड्डा पध्दत

१. खड्डयासाठी उंचवट्याची जागा निवडावी. पावसाचे पाणी खड्ड्यात झिरपणार नाही, जमा होणार नाही याची खात्री करून घ्यावी.

२. मुरघास खड्ड्याची रचना, आकार व बांधण्याची पध्दत ही त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असते. खड्डा बनवताना तो चौरसाकृती असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी खड्ड्यांचे कोपरे गोलाकार ठेवतात.

३. खड्डा शक्यतो गोलाकार किंवा चौकोनी असावा. शक्यतो वेगवेगळ्या आकाराचे खड्डे असावेत. त्यांच्या भिंती गुळगुळीत असाव्यात.

४. खड्डा गोठ्यापासून जवळ असावा.

५. खड्ड्यावर आच्छादन करावे. पावसाचे पाणी आत जाणार नाही.

खड्डा भरण्याची पद्धत

१. मुरघास तयार करण्याच्या खड्ड्यात पॉलिथिन शीट अंथरून घ्यावी. चारा पिके ५० टक्के फुलोऱ्यात असताना कडबा कुट्टी यंत्राचे लहान तुकडे करावे. कोणत्याही परिस्थितीत कुट्टी केल्यानंतर ती वाळू देऊ नये कारण त्यातील पोषण द्रवे नष्ट होतात. एकदल व द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास बनवताना ४:१ प्रमाण ठेवावे.

२. एकदल वर्गीय पिकापासून मुरघास बनवतेवेळी १ किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण चारा कुट्टीवर शिंपडावे.

३. द्विदल पिकापासून मुरघास बनवतेवेळी १ किलो गूळ १०० लिटर पाण्यात विरघळून तयार झालेले द्रावण चारा कुट्टीवर शिंपडावे.

४. कुट्टी तयार करून खड्ड्यात एका फुटापर्यंत थर येईल अशा प्रकारे भरावी.

५. प्रत्येक थरांवर तयार केलेले द्रावण शिंपडावे.

६. चारा कुट्टीचा थर खड्ड्यात भरताना त्यावर दाब द्यावा. त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहत नाही.अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा भरावा.

७. चारा भरताना त्यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण हवेचा संपर्क आल्यास चाऱ्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते. भरलेल्या खड्ड्यावर वाळलेले गवत किंवा कडबा यांच्या मदतीने अच्छादन करतात.

८. शेण व मातीच्या मिश्रणाने ते अच्छादन लिंपून गोल घुमटासारखा आकार द्यावा.

९. साधारण २ महिन्यांनी (४५ ते ६० दिवस ) चांगला, स्वादिष्ट व रुचकर असा पौष्टिक असा मुरघास जनावरांसाठी उत्कृष्ट खाद्य महणून तयार होतो.

प्लॅस्टिक बॅग पध्दत

१. मुरघास तयार करण्यासाठी पांढऱ्या रंगाची ४५० ते ५०० जीएसएम बॅग वापरावी. बाजारामध्ये १, ३, व ५ टन या आकारमानाच्या बॅग उपलब्ध आहेत.

२. खड्डा पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे कुट्टी तयार करून पिशवीमध्ये एका फुटापर्यंत थर येईल अशा प्रकारे भरावी.प्रत्येक थरांवर वर सांगितल्याप्रमाणे द्रावण शिंपडतात.

३. चारा कुट्टीचा थर पिशवीमध्ये भरताना त्यावर दाब देतात, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहत नाही.अशा पद्धतीने थरावर थर देऊन पिशवी भरावी.

४. पिशवीचे तोंड बंद करण्यास दोरी याचा वापर करावा. जेणेकरून पिशवीला कच पडणार नाही. हवेचा चाऱ्यामध्ये प्रवेश होणार नाही.

५. चारा भरताना त्यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी करण हवेचा संपर्क आल्यास चाऱ्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते.

६. साधारण २ महिन्यांनी (४५ ते ६० दिवस ) चांगला, स्वादिष्ट व रुचकर असा पौष्टिक असा मुरघास जनावरांसाठी उत्कृष्ट खाद्य महणून तयार होतो.

मुरघास जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरताना

१. एका गाईला तिच्या वजनानुसार २० ते २५ किलो मुरघास लागतो. हा मुरघास दिवसातून २ किंवा ३ वेळा समभागात विभागून द्यावा.

२. मुरघास खाऊ घालण्यापूर्वी वाळलेली वैरण द्यावी.

३. मुरघास आम्लयुक्त किंवा आंबट असल्यास थोडा वेळ सुकवून द्यावा.

४. शेळीला ६०० ते ७०० ग्रॅम किंवा वजनावर जास्तीत जास्त २ ते २.२५ टक्के द्यावा.

५. दुधाळ जनावरांना धारा काढल्यानंतर मुरघास द्यावा.

संपर्क - एस. एस. संकपाळ, ७७०९३१८२७८, डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर,८३९०७१७३६५, (कृषी महाविद्यालय,आचळोली,ता.महाड, जि.रायगड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT