Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Management : कापसामध्ये सिलिकॉनचा वापर

Team Agrowon

डॉ. शिवाजी थोरात

आपल्याकडील कापसाच्या कमी उत्पादकतेचा विचार केला असता आपले सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे जिरायती आहे. अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा, पीक संरक्षणाची योग्य काळजी न घेणे, अपुरा व अवेळी पडणारा पाऊस इत्यादी कारणे दिसून येतात. सिलिकॉनयुक्त खतांचा वापर केल्यास आपण निश्चितच उत्पादकता वाढवू शकतो त्याचबरोबर उत्पादन खर्चही कमी करू शकतो.

सिलिकॉन हे गरजेचे अन्नद्रव्य असून सर्व पिकांना त्याचा फायदा होतो, हे जर्मन शास्त्रज्ञ जस्टिस लेबेग यांनी सिद्ध केले. जमिनीमध्ये २६ टक्यांपर्यंत सिलिकॉन हा घटक असतो, परंतु तो पिकांना उपलब्ध स्वरूपात नसल्याने त्याचे शोषण पिकांद्वारे होत नाही. आपण जमिनीस त्याचा उपलब्ध घटकांद्वारे पुरवठा केल्यास त्याची उत्पादन वाढ, कीड-रोगास प्रतिबंध, निरनिराळ्या ताण तणावांपासून संरक्षण, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढणे इत्यादी बाबींवर अनुकूल परिणाम दिसून येतात.

सिलिकॉनचे फायदे

याच्या वापरामुळे नत्र, स्फुरद, पालाश आणि अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता २० ते ३० टक्यांनी वाढते. यामुळे पिकांचे पोषण व्यवस्थित होते, बोंडांची संख्या वाढते, पातेगळ कमी होणे, बोंडांचे आकारमान वाढते.

पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे तांबेरा, करपा, मर इत्यादी रोगांना प्रतिबंध होतो.

सिलिकॉनचे पेशीभित्तिका भोवती एक प्रकारचे संरक्षक कवच तयार होते. त्यामुळे कपाशीवरील फुलकिडे, बोंड अळी, तुडतुडे, मावा इत्यादी किडींना प्रतिबंध होतो. त्यापासून होणारे नुकसान कमी केले जाते.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत पावसाने ओढ दिली किंवा तापमान वाढले तर याचा विपरीत परिणाम कापसाच्या उत्पादनावर होतो. अशा वेळेस सिलिकॉनचा वापर केला असता जमिनीतील ओलावा टिकून ठेवला जातो, पिकांना दीर्घकाळ पाण्याची उपलब्धता होत राहते.

केओलिनचा वापर

वातावरणातील तापमान वाढल्यामुळे पिकाची पाण्याची गरज वाढते. जर यावेळी केओलिनचा फवारणीद्वारे वापर केला तर पानांमधून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी केले जाते. हवेत उडून जाणारे पाणी कमी होऊन त्याची पिकांना उपलब्धता वाढते.

विविध प्रयोगानुसार केओलिनचा वापर केला असता पाणी वाया जाण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के कमी होते. त्याची पिकांना उपलब्धता वाढते, कमी पाण्यातही पीक तग धरते. यावेळी बोंड पोसण्याची अवस्था असते. या वेळी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे बोंड व्यवस्थित पोसतात, गळ ही कमी होते.

संशोधनाचे निष्कर्ष

अन्न आणि कृषी संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बोटीर खैताव्ह यांच्या संशोधनात असे दिसून आले आहे, की सिलिकॉनच्या वापरामुळे कापूस पिकाची उत्तम वाढ होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि उत्पादन या दोन्हींमध्ये वाढ झालेली दिसून आले. कपाशीच्या जीव वस्तूमानात (बायोमास) १०.६ टक्के, आर्थिक उत्पादन १९.४ टक्के, सरकी उत्पादनात १४.३ टक्के आणि रुई उत्पादनात १६.२ टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नत्राची उपलब्धता ८७.४ ते १०७ किलो प्रति हेक्टर, स्फुरदाची उपलब्धता २७.८ किलो प्रति हेक्टर, पालाशची उपलब्धता १९.४ किलो प्रति हेक्टर वाढली आहे.

ब्राझील येथील संशोधक जोनास डिसूझा यांच्या प्रयोगानुसार सिलिकॉन व बोरॉन यांचा एकत्रित वापर बोंडे पोसण्याच्या वेळी केला असता कापूस धाग्याची लांबी वाढून कणखर बनतो, असे दिसून आले आहे.

झिजियांग कृषी विद्यापीठातील (चीन) येथील संशोधक झाँग डॉवेल यांच्या संशोधनानुसार सिलिकॉनचा वापर फुलोरा अवस्था आणि बोंडे पोसण्याच्यावेळी केला असता फुलांचे बोंडात रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले. फूल व पातेगळ कमी झाली. बोंडांची संख्या, आकारमान, उत्पादनात १६ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.

पाकिस्तानमधील संशोधक शाद अली अन्वर यांच्या संशोधनानुसार हायड्रोजन पेरॉक्साइड आणि मॅलॉन डी डायहायड्रोजन या हानिकारक घटकांचे प्रमाण कमी होऊन कापूस उत्पादन वाढले.

सिलिकॉनचा फवारणीद्वारे वापर केल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रिया जलद व सुलभ होते. पर्णछिद्रे अधिक कार्यक्षम राहून त्याद्वारे पाण्याचा ऱ्हास कमी होतो, असे ब्राझीलमधील संशोधक बॅरोस व डी मेले प्राडो यांच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

चीनमधील संशोधक लिआओ व झाँग यांच्या संशोधनानुसार सिलिकॉनचा हेक्टरी १७५ किलो वापर केला असता पात्यांची संख्या १६ टक्यांनी वाढली, तर कपाशीचे उत्पादन १५ टक्क्यांनी वाढले.

- डॉ. शिवाजी थोरात,

९८५००८५८११

(लेखक ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन ॲग्रिकल्चर’चे

सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Development : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती हेच ध्येय्य

Agriculture Management Techniques : हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन तंत्र

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

SCROLL FOR NEXT