Cotton Management : अतिवृष्टीबाधीत कपाशी पीक व्यवस्थापन

Heavy Rain Cotton Crop : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी कपाशी लागवडीमध्ये पाणी साठून राहिल्याचे दिसून येत आहे. शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
Cotton Management
Cotton ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. भाऊसाहेब पवार, डॉ. सुदर्शन लटके, डॉ. नंदू भुते, डॉ. पवन कुलवाल

मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी कपाशी लागवडीमध्ये पाणी साठून राहिल्याचे दिसून येत आहे. शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. साचलेल्या पाण्यासोबतच रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाचा धोकाही दिसून येत आहे. पाणी साचलेल्या जमिनीतून पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश यासारखी अन्नद्रव्ये घेणे कठीण होते. झाडे कमकुवत व पिवळी दिसू लागतात. पाने मोठी होत नाहीत.

पावसाचा मोठा खंड व त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाला की नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे झाडाची कायिक वाढ जास्त होऊन कपाशी काढणीला नेहमीपेक्षा उशीर होण्याची शक्यता असते. अपरिपक्व धाग्यांचे प्रमाण वाढून धाग्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

पावसामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे मर रोग (पॅराविल्ट), पातेगळ व बोंडसड या सारख्या समस्या दिसून येतात. त्यासाठी कपाशी पिकातील अतिरिक्त पाण्याचा तत्काळ निचरा करण्याकडे लक्ष द्यावे. ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे लवकरात लवकर जमीन कशी कोरडी होईल, हे पाहावे.

आकस्मिक मर रोग (पॅराविल्ट)

पाण्याचा ताण पडला आणि त्यानंतर मोठा पाऊस होऊन जमिनीत पाणी साचल्यास कपाशीची झाडे अचानक सुकू लागतात. याला मर रोग म्हणतात. दिवसाचे जास्त तापमान दीर्घकाळ टिकून राहिल्यास, पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरिरक्रियावर अनिष्ट परिणाम होतो.

Cotton Management
Cotton Management : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाचे व्यवस्थापन

अन्नद्रव्ये शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात.

जमिनीत वाफसा नसल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्ये घेता येत नाहीत.

झाडांच्या पाने, फुले, बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो.

पाने, फुले व बोंडे यांची गळ होते. झाड मरते. या प्रकारच्या विकृतीसाठी कोणतीही बुरशी, सूत्रकृमी, जिवाणू किंवा विषाणू कारणीभूत नाहीत.

उपाय

झुकलेली झाडे सरळ करून मातीची भर देऊन दाबून घ्यावीत.

विकृतीग्रस्त झाडांची लक्षणे दिसू लागताच कॉपर ऑक्सिक्लोराईड २५० ग्रॅम + युरिया १.५ किलो + पालाश १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मिलि द्रावण प्रति झाड आळवणी करावी.

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारसीत बुरशीनाशकाचा वापर करावा.

त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ किलो डीएपी प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून या

द्रावणाने प्रति झाड १५० ते २०० मिलि या प्रमाणात झाडाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.

सर्व उपाययोजना लक्षणे दिसू लागताच २४ ते ४८ तासाच्या आत केल्यास पुढील नुकसान टाळता येईल.

पातेगळ

पावसाच्या मोठ्या खंडानंतर अचानक मोठा पाऊस झाला की नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणात होते. ही पातेगळ रोखण्यासाठी नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड (एनएए) २० पी.पी.एम. म्हणजेच २० मिलीग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी करताना या संजीवकामध्ये अन्य कोणतेही रसायन मिसळू नये.

फुले लागणे व बोंड विकासाच्या अवस्थेत असताना डीएपी (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेसुद्धा पातेगळ होते. यामध्ये कॅल्शिअम, बोरॉन आणि झिंक यांची कमतरता प्रामुख्याने कारणीभूत असते. या करिता फुले द्रवरूप ग्रेड २ मायक्रोन्यूट्रीयंट पाच मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. या शिवाय बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Cotton Management
Cotton Crop Management : कपाशी पातेगळची कारणे जाणून करा उपाययोजना

बोंड सड

जास्त आर्द्रतेमुळे बोंड उघडण्यास विलंब होतो. ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस त्यामुळे झाडाच्या खालच्या बाजूस लागलेली बोंडे सडतात. बोंड सड (बॉल रॉट) सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.

उपाय

रस शोषणाच्या किटकांच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार उपाय करावेत.

बोंडांना चिटकून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या काढून टाकाव्यात.

झाडांची कायिक वाढ रोखण्यासाठी नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.

सतत पाऊस पडत राहिल्यास आंतरिक बोंड सड नियंत्रणासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

बाह्य बोंड सड रोखण्यासाठी, कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यू. पी.) ०.४ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५टक्के एस.सी.) १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.  खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

 बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत.  पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.  रसायनांचा गट तपासावा.

 पीएचआय, एमआरएल तपासावेत.  पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

- डॉ. भाऊसाहेब पवार, ७५८८६०४०९०, (कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com