Sangli News : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊस लागवडीचे प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात आलेत. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (बारामती) पुढाकाराने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट अशा जागतिक संस्थांच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
राज्यात अशा प्रयोग करणारा ‘क्रांतिअग्रणी’ पहिला सहकारी साखर कारखाना ठरला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. अध्यक्ष शरद लाड म्हणाले, की उत्पादन, सेवा अशा बऱ्याच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. ऊस शेतीतील लागवड खर्च कमी करणे, उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे व बदलत्या हवामानावर मात करत ऊस शेती किफायतशीर करणे, अशी प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत.
ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या उद्देशाने मोठी भरणी झालेल्या उसावर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे यशस्वी प्रयोग २०१९ मध्ये सर्वप्रथम कारखान्यांत घेऊन शेतकऱ्यांत ड्रोनचा वापर वाढण्यास गती दिली.
कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या मालकीचे १३ ड्रोन फवारणीचे काम करत आहेत. पुढचे पाऊल म्हणजे उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान (क्लायमेट बेस्ड स्मार्ट ॲग्रीकल्चर) व जमिनीच्या गुणधर्माशी सुसंगत रासायनिक खते, पाणी व्यवस्थापन तसेच लागवडीशी निगडित सर्व घटकांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने माहिती घेऊन ऊस लागवड प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे.
प्रात्यक्षिकांत १२ शेतकरी सहभागी झाले. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हवामान वेधशाळा, उपग्रह संचलित कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बहुपयोगी सेन्सर उपकरणे बसवलेत. उपग्रहातील हायपरस्पेक्ट्रल इमेज, रिमोट सेन्सिंग, ग्राऊंड टूथ इमेजिंगच्या आधारे शेतकऱ्यांना मोबाइलवर पिकांना आवश्यक पाण्याची गरज, फवारण्याची अचूक वेळ व फर्टिगेशनबाबत अचूक सल्ला दिला जाईल.
शेतात अन्नघटकांची कमतरता, पिकाची योग्य-अयोग्य वाढ, रोग-कीड प्रादुर्भावाची सूचना मिळणार आहे. प्रात्यक्षिकाचे शुल्क रुपये १० हजार रुपये असून शेतकऱ्यांना २ ते २.५ एकर क्षेत्र सहभागी करता येते. शिवाजी गोविंद राजमाने (निमणी) यांचे ऊस प्लॉटला बारामतीचे शास्त्रज्ञ तुषार जाधव, ‘मॅप माय क्रॉप’चे शास्त्रज्ञ डॉ. भूषण गोसावी व सहकाऱ्यांनी भेट देऊन प्रात्यक्षिकांत सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.