Agriculture AI : शेतकऱ्यांच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती आणेल

Sharad Pawar : जगभर झपाट्याने प्रसारित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर सर्वप्रथम राज्याच्या ऊस शेतीत होतो आहे. या तंत्राचा वापर पुढे सर्व पिकांमध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : ‘‘जगभर झपाट्याने प्रसारित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर सर्वप्रथम राज्याच्या ऊस शेतीत होतो आहे. या तंत्राचा वापर पुढे सर्व पिकांमध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित हवामान बदलास सक्षमपणे तोंड देणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. २२) पुण्यातील मोदी भाग येथे झाला. त्या वेळी श्री. पवार पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या तीन प्रख्यात संस्थांनी हा प्रकल्प तयार केला आहे. तीन वर्षे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात चाचण्या घेतल्यानंतर आता एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे.

उपग्रह प्रणाली, स्वयंचलित हवामान केंद्र, आयओटी, सेन्सर्स आदीचा वापर असलेल्या या प्रकल्पातील उपकरणांचे वितरण श्री. पवार यांनी निवडक शेतकऱ्यांना केले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे विश्‍वस्त व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; आरक्षण, दूध दराच्या बैठकीसाठी आग्रही

श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प देशात प्रथम होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांना राजी करण्याचे काम प्रतापराव पवार यांनी केले आहे. या संस्था सहभागी झाल्यानंतर बारामतीमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यासाठी राजेंद्र पवार यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली आहे. भविष्यात सर्व महत्त्वाची पिके या प्रकल्पात समाविष्ट केली जातील.

मात्र राज्यात ऊस महत्त्वाचे पीक असल्याने तेच या प्रकल्पासाठी प्रथम घेतले गेले. या पिकाच्या काही समस्या आहे. सतत अतिरिक्त पाणी व खतांचा वापर ऊस शेतीत केला जातोय. त्यामुळे त्यात समस्या उद्‍भवल्या आहेत. उत्पादकता व साखर उतारादेखील कमी होतो आहे. परंतु आता ऊस शेतीमधील या समस्यांची सोडवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राद्वारे होऊ शकेल.’’

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘ऑक्सफर्ड विद्यापीठासह मायक्रोसॉफ्ट व बारामतीमधील ट्रस्ट या तीनही संस्था गेल्या तीन वर्षांपासून दिवसरात्र या प्रकल्पावर मेहनत घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे ६० ते ४० टक्के उत्पादन वाढ आहे. सरकार पिकाला भाव देणार की नाही हे माहीत नाही; परंतु कमी खर्चात उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना आज उपलब्ध करून देत आहोत.

Sharad Pawar
Agriculture AI : शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर

मायक्रोसॉफ्ट व बिल गेट्‍स फाउंडेशनच्या सहभागातून जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ फार्म व्हाइब्जची तयार होणार आहे. ते बारामतीच्या ट्रस्टमध्ये करण्याची घोषणा या संस्थांनी केली आहे. मुळात बारामती ट्रस्टसारख्या आदर्श शैक्षणिक संस्था शरद पवार यांनी निर्माण केली नसती तर आज या आंतरराष्ट्रीय संस्था किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पदेखील येथे आला नसता.’’

‘शेतकऱ्यांनो, प्रकल्प बारकाईने समजून घ्या’’

‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्याची शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे तंत्र बारकाईने समजून घ्यावे. त्यासाठी बारामतीमध्ये प्रकल्पस्थळी भेट द्यावी,’’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. दरम्यान, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन केवळ एका पिकापुरते किंवा शेतकऱ्यांपुरते मर्यादित ठेवले जाणार नाही. फळे व भाजीपाला पिकांसाठी संशोधन वापरले जाईल. संशोधक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व उद्योजकांनाही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र उपलब्ध असेल,’’ असे श्री. पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com