Agriculture AI : प्रतापराव पवार यांच्याकडून ३.५ कोटींची देणगी

Pratap Pawar : शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा देशातील पहिला प्रयोग बारामतीमधील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ऊस पिकावर केला जात आहे.
Pratap Pawar
Pratap PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या भारतातील पहिल्या क्रांतिकारी प्रयोगासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी साडेतीन कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे. त्यामुळे या प्रयोगाच्या विस्ताराला चालना मिळणार आहे.

शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा देशातील पहिला प्रयोग बारामतीमधील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ऊस पिकावर केला जात आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या या प्रयोगाची पायाभरणी श्री. पवार यांनी केली. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अशा नामांकित संस्थांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला.

प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निधीअभावी हा प्रकल्प मागे पडू नये, यासाठी श्री. पवार यांनी पुढाकार घेत साडेतीन कोटींची व्यक्तिगत देणगी दिली. विशेष म्हणजे प्रकल्पाची उर्वरित रक्कमदेखील विविध संस्था व व्यक्तींकडून मिळविण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले.

Pratap Pawar
Agriculture AI : शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गेल्या २२ जून रोजी निवडक शेतकऱ्यांना ऊस शेतीची अत्याधुनिक उपकरणे प्रदान करीत प्रकल्पास प्रारंभ झाला. प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडक अडीचशे शेतकऱ्यांचा समावेश आहे. उपग्रहाच्या मदतीने या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक प्रणालीचे नकाशे (क्रॉप मॅपिंग) तयार करण्यात आले आहेत.

तसेच शेतामध्ये अत्याधुनिक संवेदके (सेन्सर्स) व स्वयंचलित हवामान केंद्र (वेदर स्टेशन) बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. उसामध्ये सुरू असलेला पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतर पिकांमध्येही तो राबविला जाणार आहे.

Pratap Pawar
Agriculture AI : शेतकऱ्यांच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती आणेल

शेतीविषयी आस्था

पाणी व्यवस्थापन, शेतीतील उत्पादकता आणि गुणवत्ता वाढ, ग्रामीण अर्थकारण, उद्योजकता विकास हे प्रतापराव पवार यांच्या आत्यंतिक आस्थेचे विषय आहेत. या विषयांमध्ये सातत्याने कार्यरत राहणे त्यांना आवडते. या क्षेत्रांत विविध संस्थांच्या माध्यमातून श्री. पवार यांनी आजवर मोलाचे काम केले आहे.

विशेषतः सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून गेली काही वर्षे सातत्याने ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे आजवर ८८५ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणाऱ्या या कामाची व्याप्ती वाढावी यासाठी श्री. पवार यांनी सकाळ रिलीफ फंडालाही चार कोटी रुपयांची व्यक्तिगत देणगी नुकतीच दिली आहे.

“शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे. भारतीय कृषी व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. आम्ही या प्रकल्पाला ऊस शेतीपासून सुरुवात केली आहे. बळीराजाला समृद्धीकडे नेणाऱ्या या प्रकल्पाचा विस्तार लवकरच सर्व पिकांमध्ये होईल, असा माझा ठाम विश्‍वास आहे.”
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com