Livestock Nutrition : भाताच्या पेंढ्यामध्ये पोषणमूल्य कमी असतात. त्यामुळे पोषणमूल्य वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया करणे आवश्यक आहे. भाताच्या पेंढ्यात कमी प्रथिने (२ ते ३ टक्के) आणि उच्च तंतूमय घटक असतात,ज्यामुळे पचायला कठीण जाते. युरियामधील नायट्रोजन पेढ्यामध्ये मिसळल्याने पोषणमूल्यात वाढ होते, प्रथिनांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढते आणि ती सहज पचण्याजोगी बनतात. युरिया प्रक्रिया केलेला हा पेंढा पचायला सोपा असतो. मुरलेला पेंढा जनावरे आवडीने खातात, मात्र त्यासाठी प्रक्रियेच्या पद्धती विषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
जेव्हा हिवाळ्यात उपलब्ध गवत पौष्टिक नसते, अशावेळी शेतकऱ्याजवळ असलेल्या भाताच्या पेंढ्यावर युरिया प्रक्रिया करून जनावरांना सकस आहार म्हणून देऊ शकतो. युरिया प्रक्रिया केलेला पेंढा पचायला सोपा असतो. मुरलेला पेंढा जनावरे आवडीने खातात. युरियात नत्राचे प्रमाण जास्त असते आणि याचा उपयोग रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये खुराकात प्रथिनांच्या ऐवजी करण्यात येतो. जनावरांसाठी वापरात येणारा युरिया हा पांढरा असून त्यामध्ये नत्राचे प्रमाण ४२ ते ४६ टक्के असते. जनावरांच्या पचनसंस्थेत असणारे जिवाणू या नत्राचे रूपांतर प्रथिनांमध्ये करतात. भाताच्या पेंढ्यांवर युरियाची प्रक्रिया करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो.
युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत
टाकीमध्ये किंवा जमिनीवर प्रक्रिया करण्यासाठी ताडपत्री अंथरावी. यामुळे भात पेंढ्याला माती लागणार नाही. १०० किलो भाताचा पेंढा घ्यावा. पेंढ्यांवर प्रक्रिया करण्यासाठी चार किलो युरिया लागतो. प्रक्रिया करण्यापूर्वी चार किलो युरिया १०० लिटर पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावा. तयार केलेले द्रावण झारीने संपूर्ण भात पेंढ्यावर सारख्या प्रमाणात शिंपडावे. अशा पद्धतीने सहा इंचाचा एक थर करावा. टाकी किंवा ढीग पूर्णपणे भरावा. प्रत्येक थराला पायाने दाबावे. पेंढ्यांमध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
पॉलिथिन कागदाने टाकी किंदा ढीग व्यवस्थितपणे झाकावा. अतिरिक्त पॉलिथिनचा वापर बाजू बंद करण्यासाठी करावा. प्रक्रिया केलेला भाताचा पेंढा सात दिवस मुरण्यासाठी ठेवावा. युरिया प्रक्रिया केलेला भाताचा पेंढा सात दिवस ठेवला जातो, परंतु जास्त दिवस प्रक्रिया केल्याने कोणताही अपायकारक परिणाम होत नाहीत. थंड हवामानात प्रक्रिया होण्यास जास्त वेळ लागतो. मात्र व्यवस्थित हवा बंद न केलेला कमी पेंढा आणि न कापलेला पेंढा जास्त दिवस ठेवल्याने बुरशी लागण्याची शक्यता असते याकरिता पेंढा व्यवस्थित हवा बंद राहील याची काळजी घ्यावी.
प्रक्रिया करताना काळजी
प्रक्रिया तसेच पशूखाद्यासाठी वापर करताना पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे .
युरियाची मात्रा वाढविल्यास जनावरांना अपाय होण्याचा संभाव्य असतो, तेव्हा प्रमाण योग्य ठेवावे. युरिया पूर्णपणे पाण्यात विरघळून द्रावण तयार करावे.
पेंढ्यावर द्रावण सर्वत्र एकसारख्या प्रमाणात शिंपडावे. पेंढ्यांचा प्रत्येक थर व्यवस्थितपणे दाबून घ्यावा. प्रक्रिया केलेला पेंढा पूर्णपणे हवा बंद ठेवावा.
लहान वासरांच्या खुराकात युरियाचा वापर करू नये.
युरिया प्रक्रिया केलेल्या पेंढ्यांसोबत प्रथिन युक्त खाद्य कमी प्रमाणात द्यावे.
प्रक्रिया केलेला चारा देण्याची पद्धत
प्रक्रिया केलेला चारा इतर हिरव्या किंवा सुक्या चारा सोबत मिसळून द्यावा. मोठ्या जनावरासाठी म्हणजे गाई, म्हशींसाठी दिवसाला ५ ते ८ किलो चारा द्यावा. लहान जनावरासाठी म्हणजे शेळी, मेंढ्यांकरिता दिवसाला १ ते २ किलो चारा द्यावा.
भात पेंढ्या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या निकृष्ट प्रकारच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करता येते. यामध्ये सुकलेली वैरण, कडबा आणि इतर निकृष्ट प्रकारच्या गवतावर प्रक्रिया करून जनावरास दिल्यास चाऱ्याचा योग्य वापर करणे शक्य आहे.
- डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५०, (विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) , कृषी विज्ञान केंद्र,हिवरा,जि.गोंदिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.