आर्थिक सुधारणा असो की वृद्धिपूरक धोरणांचा अवलंब, याबाबत केवळ बोलून चालत नाही, तर त्याबाबतच्या सकारात्मक परिणामांचा अनुभव सर्वसामान्यांसह सर्वांना आला पाहिजे.एकीकडे अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल सुरू असल्याचे भासविले जात आहे तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची वरचेवर घसरण सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपी मध्ये ८.२ टक्क्यांची अशी दमदार वाढ झाल्याचे नुकतेच पुढे आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्थिक सुधारणांबरोबर वृद्धिपूरक धोरणांचा परिणाम असल्याचे सांगतात. .त्याचवेळी रुपयाच्या अवमूल्यनाबाबत मात्र ते चुप्पी साधून आहेत. अधिक गंभीर बाब म्हणजे आपल्या जीडीपीच्या वाढीवर अर्थतज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. जीडीपी वाढ ही वस्तुनिष्ठ आकडेवारीवर नाही तर गृहीतकांवर ठरवून फुगवटा दाखविला जात असल्याचे मत या अर्थतज्ज्ञांचे आहे. भारतातील असंघटित क्षेत्राबाबत आवाजवी वाढीचा अंदाज व्यक्त केला जात असताना हे क्षेत्र घटत असल्याचा दावा हे अर्थतज्ञ करतात..Indian Economy: भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची झलक.ही अति गंभीर बाब म्हणावी लागेल. दुसरीकडे रुपयाची घसरण मात्र चिंताजनक पातळीवर येऊन पोहोचलेली आहे. एप्रिल २०२५ पासून बघितल्यास डॉलरच्या तुलनेत रुपया जगात सर्वाधिक ५.५ टक्क्यांनी गडगडला आहे. असे असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मात्र रुपयाचे अवमूल्यन झाले नाही तर डॉलरचे मूल्यवर्धन होत असल्याचे सांगून याचे लंगडे समर्थन वारंवार करताना दिसतात..चलनाच्या किमतीतील चढ-उतार ही फार असाधारण बाब नाही. परंतु रुपयाची घसरण ज्या सातत्याने होत आहे हे पाहता अर्थव्यवस्थेतील काही आव्हानांवर चर्चा व्हायलाच पाहिजे. जागतिक पातळीवर राजकीय आणि व्यापारामध्ये सुद्धा मागील काही वर्षांपासून खूपच अनिश्चितता वाढली आहे. त्यात आता जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था व्यापाराच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्या गेल्याने चलन अवमूल्यन तसेच मूल्यवर्धनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे..Indian Economy : कोट्यवधी नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल?.डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयात महाग तर निर्यात स्वस्त होते. परंतु आपल्या देशाची आयात, निर्यातीपेक्षा अधिक असल्याने अर्थात व्यापार तूट जास्त असल्याने रुपयाच्या अवमूल्यनाचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूलच परिणाम होणार आहे. शिवाय आपली धोरणे खासकरून शेतीमालाच्या बाबतीत ही खुली आयात तर निर्यातीला अधिक निर्बंध अशी असल्याने रुपयाच्या अवमूल्यनाचा निर्यात वृद्धीच्या अनुषंगाने फारसा फायदा होणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे..त्याच वेळी पेट्रोल, नैसर्गिक वायू, सोने व अन्य मौल्यवान धातूच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. शिवाय परदेश प्रवास, वास्तव्य, शिक्षण या डॉलरच्या संबंधित बाबी महाग होतील, त्याचा भुर्दंड देशातील नागरिकांवर बसणारच आहे. मुळात देशात परकीय गुंतवणुकीसाठी पायघड्या घातल्या जात असल्या तरी ती अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही. रुपयाच्या सातत्याने अवमूल्यनाने परदेशी खासगी भांडवली गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता अधिक आहे..रुपयाचे अवमूल्यन होते आहे. देशात महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. युवक बेरोजगारीने ग्रस्त आहेत. आर्थिक विषमताही वाढत आहे. आयात - निर्यातीबाबत स्पष्ट दीर्घकालीन धोरण नाही आणि आपण विकसित भारताची स्वप्न पाहतोय. आर्थिक सुधारणा असो की वृद्धिपूरक धोरणांचा अवलंब, याबाबत केवळ बोलून चालत नाही तर त्याबाबतच्या सकारात्मक परिणामांचा अनुभव सर्वसामान्यांसह सर्वांना आला पाहिजे. स्वप्नरंजन आणि वस्तुस्थिती हा फरक केंद्र सरकारच्या लक्षात आला तरच देशावरच्या आर्थिक संकटाबाबत त्यांच्याकडून सावध पावले उचलली जातील, तोपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया दुबळा होत जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.