Agriculture Land Record Agrowon
ॲग्रो विशेष

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Property Document Records: जी एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एखाद्या जमिनीचा भोगवटा करतात त्या व्यक्तीचे किंवा व्यक्तींची नावे हक्क पत्रकाच्या (गाव नमुना सात) मधल्या भागात म्हणजे भोगवटादार सदरात नोंदवलेली असतात. भोगवटादार सदरात नोंदवलेल्या व्यक्तीला साधारणतः जमिनीचे मालक मानण्यात येते; पण हा किंवा हे इसम जमीन मालक असतातच असे नाही.

Team Agrowon

Farmer Rights:

दशमान आकड्यांमध्ये क्षेत्र आणि आकार

लागवडीयोग्य क्षेत्र, पोटखराब क्षेत्र एक गुंठे आणेमध्ये दर्शविण्यात येत होते, तर जमिनीचा आकार रुपये आणि पैसे यामध्ये दाखविण्यात येतो.

१९६८ मध्ये सर्व भूमापन अभिलेखांचे दशमान पद्धतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. (जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेखन यांचे परिपत्रक क्र. एस. आर. १६६ दिनांक १५ ऑक्टोबर, १९६८ आणि महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग परिपत्रक क्रमांक एम. एस. सी. ३७०/२२०००३ डब्ल्यू, दिनांक २७ ऑक्टोबर १९७०) आकारबंद आणि इतर सबंद्ध अभिलेख दशमान आकड्यांमध्ये लिहिण्यात आल्यानंतर अशा गावामध्ये गाव नमुना सातमध्ये गावातील क्षेत्रासंबंधीच्या नोंदी दशमान आकड्यांमध्ये म्हणजे एकर व गुंठ्यांऐवजी हेक्टर व आर कराव्यात अशा सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. ही पद्धत १० वर्षे चालू ठेवण्यात आली आणि त्यानंतर एकर व गुंठ्यामध्ये आकडे लिहिण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

आता गाव नमुना सातमधील जमिनीचे क्षेत्र हेक्टर आणि आर, तर आकार रुपये-पैसे या दशमान पद्धतीमध्ये ठेवण्यात येत आहेत.

सातबारातील मधला भाग

जमीन भोगवटादार

जी एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एखाद्या जमिनीचा भोगवटा करतात त्या व्यक्तीचे किंवा व्यक्तींची नावे हक्क पत्रकाच्या (गाव नमुना सात) मधल्या भागात म्हणजे भोगवटादार सदरात नोंदविलेली असतात. भोगवटादार सदरात नोंदवलेल्या व्यक्तीला साधारणतः जमिनीचे मालक मानण्यात येते; पण हा किंवा हे इसम जमीन मालक असतातच असे नाही. कारण सातबारा मालकी हक्क नसतानाही दीर्घकालीन कब्जा वहिवाटीमुळे एखादी व्यक्ती जमिनीची भोगवटादार होत असते. तशी त्याची नोंद भोगवटादार सदरात होते.

जमिनीच्या मूळ मालकाचे दुर्लक्ष, असहाय्यता, मूक संमती, बेपत्ता होण्यामुळे, निर्वंश झाल्याने किंवा नाकर्तेपणामुळेही मालकी हक्क नसणाऱ्या अन्य व्यक्तीचा भोगवटा प्रस्थापित होत असतो. अशा प्रकारे भोगवटा प्राप्त करून जमिनीवर हक्क प्रस्थापित करणारेही कालांतराने जमीनमालक होतात; पण ही त्यांची मालकी उलट्या कब्जाने (अॅडव्हर्स पझेशन) प्रस्थापित झालेली असते. थोडक्यात, जमिनीवरील मालकी हक्क गाव सातमधील भोगवटादार सदरावरून सांगता येईलच असे नाही.

भोगवटादारावर सारा भरण्याची जबाबदारी

जमिनीवर मालकी हक्क असो की नसो, ज्या इसमाचा जमिनीवर प्रत्यक्ष भोगवटा आहे त्याची नोंद भोगवटादार सदरात करण्यात येते. भोगवटादार सदरात नोंद असलेले इसम त्या जमिनीचा आकार भरण्यास जबाबदार असतात. तलाठी त्यांच्याकडून पट्टी वसूल करतात. त्यांनी सुरळीतपणे आकार भरला नाही, तर जमीन महसूल संहितेच्या तरतुदीनुसार साध्या किंवा सक्तीच्या उपाययोजनेचा अवलंब करून जमीन महसुलाची बाकी म्हणून ती वसूल करण्यात येते.

जमीन भोगवटादार म्हणून धारण करणाऱ्या आणि जमिनीचा आकार भरणाऱ्या व्यक्तींची नोंद भोगवटादार म्हणून हक्क पत्रकाच्या मधल्या भागात करण्यात येते. जमिनीचा भोगवटादार हा सारा भरण्यास जबाबदार असल्याने त्याच्या नावे जमिनीचे खाते गाव नमुना आठ-अ म्हणजे खातेपत्रकामध्ये उघडलेले असते; तसेच त्याचा खाते नंबर हक्क पत्रकाच्या उजव्या बाजूला तलाठ्याने दर्शविलेला असतो. त्याची माहिती स्वतंत्रपणे दिलेली आहे.

दिवाणी कोर्ट ठरविते मालकी हक्क

जमिनीचा भोगवटादार कोण, हे ठरविण्याचा अधिकार जमीन महसूल संहिता आणि आनुषंगिक नियमाप्रमाणे तलाठी, तहसीलदार यांना आहेत; पण सात-बारामध्ये भोगवटादार म्हणून नोंदलेली व्यक्ती जमिनीची कायदेशीर मालक आहे की नाही याबाबतचा वाद निर्माण होतो तेव्हा त्याबाबत निर्णय करण्याचा अधिकार तहसीलदार यांना म्हणजेच महसूल खात्याला नाही. जमिनीचा कायदेशीर मालक कोण आहे हे ठरविण्याचा अंतिम अधिकार दिवाणी कोर्टाला आहे.

कंसातील फेरफार क्रमांक

गाव नमुना सात म्हणजे हक्क पत्रकातील मधल्या भागात भोगवटादार म्हणून नोंदलेल्या व्यक्तीचे नाव गाव नमुना सहामधील कोणत्या फेरफाराने नोंदलेले आहे. त्या फेरफार नोंदीचा क्रमांक भोगवटदार व्यक्तीच्या नावाखाली नमूद केलेला असतो. त्या फेरफार क्रमांकाला गोल केलेला असतो किंवा तो कंसातदेखील दाखविण्यात येतो.

भोगवटादाराच्या नावाखाली कंसात किंवा गोलात दाखविलेल्या फेरफार नोंद क्रमांकाची गाव नमुना सहामधील नक्कल तलाठ्याकडून प्राप्त केल्यानंतर संबंधित व्यक्तीने जमीन भोगवटादार म्हणून केव्हा, कशाप्रकारे, कोणापासून हक्क प्राप्त केला आहे हे समजून येते. वारसा, विभागणी, बक्षीसपत्र किंवा अन्य प्रकारे जमिनीवरील हक्क बदल झाल्याने अस्तित्वात असलेल्या भोगवटादाराचे नाव कमी करून त्याऐवजी हक्क प्राप्त झालेल्या भोगवटादाराचे नाव हक्कपत्रकात नोंदण्यासाठी गाव नमुना सहामध्ये फेरफार नोंदवून तो जेव्हा मंजूर होतो, तेव्हा संबंधित सात-बारामधील ज्याचा हक्क संपुष्टात आलेला आहे त्या भोगवटादाराच्या नावाला कंस करण्यात येतो आणि त्याच्या नावाखाली नव्याने हक्क प्राप्त झालेल्या भोगवटादाराचे नाव नोंदण्यात येते आणि ज्या फेरफाराने त्यास हक्क प्राप्त झाला त्या फेरफाराचा क्रमांक कंसात किंवा गोलात नावाखाली दाखविण्यात येतो.

अशा प्रकारे वेळोवेळी भिन्न प्रकाराने होणारे हक्कबदल व त्यामुळे नव्याने हक्क प्राप्त झालेल्या भोगवटादाराची नावे पूर्वीच्या नावाला कंस करून त्याखाली नोंदण्यात येतात. त्या नोंदीजवळ अथवा खाली फेरफार नोंद क्रमांक कंसात किवा गोलात दाखविण्यात येतो. तलाठ्याने गावाच्या हक्कपत्रकात (गाव नमुना सात) गाव नमुना सहामधील मंजूर फेरफार नोंदीमुळे झालेले सर्व हक्क बदल वेळोवेळी दर्शवायचे आहेत आणि ते दर्शविताना संबंधित फेरफार नोंद क्रमांकही नमूद करायचा असतो, म्हणून या हक्कपत्रकाला फेरफार नोंद वहीचे सूचिपत्र म्हणूनही संबोधले जाते.

जमीन मालकी हक्क शोध

एखाद्या जमिनीमधील सर्व हक्कबदल नोंदविणाऱ्या साऱ्या फेरफार नोंदीच्या प्रती तलाठ्याकडून घेतल्यावर त्या जमिनीची हस्तांतरणे केव्हा केव्हा, कशी कशी आणि कोणा कोणामध्ये झाली याची साद्यंत माहिती प्राप्त होऊ शकते. सध्याच्या भोगवटादाराचे असलेला जमीन कब्जा त्याच्याकडे कायदेशीरपणे आहे की नाही हे तपासण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. एखाद्या जमिनीचे हस्तांतरण करावयाचे असेल तेव्हा ती जमीन विकत घेणारा त्या जमिनीच्या मालकीचा शोध घेण्यासाठी अशी माहिती घेत असतो. थोडक्यात कोणत्याही जमिनीवरील भोगवटा कायदेशीर आहे की नाही? हा भोगवटा जमीनमालक म्हणून आहे की कसे? हे जाणून घेण्यासाठी जमिनीचा सात-बारा; तसेच या जमिनीमध्ये गेल्या ३० वर्षांच्या कालावधीतील सर्व फेरफार उपयुक्त ठरतात. तेव्हा प्रत्येक खातेदाराने स्वतःच्या जमिनीचे सर्व फेरफार निदान गेल्या ३० वर्षांच्या कालावधीतील, तलाठ्याकडून मिळवून स्वतःच्या संग्रही ठेवणे सोयीचे ठरणारे आहे.

भोगवटादाराची आणेवारी

जेव्हा एखाद्या जमिनीत एकापेक्षा अधिक भोगवटादार असतात आणि ज्या फेरफाराने त्यांची नावे लावण्यात आली असतील त्यामध्ये प्रत्येकाचा हिस्सा नमूद केलेला असेल तेव्हा तो हक्क पत्रकाच्या भोगवटादार सदरात दाखविला जातो. उदाहरणार्थ, एखादा भोगवटादार मयत झाला त्याच्या तीन मुलांची व त्याच्या विधवेचे नाव वारसदार म्हणून दाखविण्यात आले. या चारही वारसदारांना सारखा हिस्सा असल्याने प्रत्येकाला ४ आणे हिस्सा किंवा १/४ हिस्सा असल्याचे फेरफारात नमूद केलेले असेल, तर भोगवटादार सदरात या चौघांची नावे दाखवून प्रत्येकापुढे १/४ किंवा ४ आणे हिस्सा असल्याची नोंद करण्यात येते. भोगवटादारांचा जमिनीतील हिस्सा किंवा आणेवारी दाखविण्याची पद्धत सर्वत्र रूढ आहे.

पेन्सिल नोंद शाईने केव्हा करतात?

गाव नमुना सात हक्क पत्रकातील कोणतीही नोंद काही थोडे अपवाद वगळता ज्याचा उल्लेख येऊन गेला आहे, कोणताही बदल गाव नमुना सहा फेरफार नोंदवहीमध्ये फेरफार करून, त्यात रीतसर हितसंबंधितांना नोटीस देऊन, नोटीस मुदतीत कोणाची हरकत आल्यास त्यामध्ये निर्णय दिल्यानंतर किंवा नोटीस मुदतीत कोणी हरकत घेतली नाही तर मंजुरी दिल्यानंतरच करण्यात येतो; परंतु हक्कबदल फेरफार वरीत नोंदल्याबरोबर त्या फेरफाराचा क्रमांक देऊन संबंधित गाव नमुना सात म्हणजे हक्क पत्रकात पेन्सिलीने नोंदवून फेरफार मंजूर झालेला नाही असा शेरा तलाठ्याने द्यायचा आहे.

जर फेरफार रद्द करण्यात आला किंवा त्यात काही दुरुस्ती करण्यात आली तर गाव नमुना सातमध्ये केलेली पेन्सिल नोंद तलाठी यांनी रबराने पुसून टाकायची आहे. तर दुरुस्त केलेली मंजूर नोंद त्याने शाईने लिहायची आहे. पीक पाहणी आणि इतर तपासणीच्या वेळी निरीक्षणासाठी या पेन्सिल नोंदीचा उपयोग होतो; तसेच झालेला व्यवहार दडपला जात नाही. हितसंबंधितांना संभाव्य ठकवणुकीपासून या पेन्सिल नोंदीमुळे संरक्षण मिळते.

उजवी बाजू इतर अधिकार

गाव नमुना सात हक्क पत्रकाच्या उजव्या बाजूला इतर हक्क किंवा इतर अधिकार नोंदवायचे आहेत. या नमुन्याच्या मधल्या भागात दाखविलेल्या भोगवटादाराचे जे हक्क जमिनीवर आहेत त्याशिवाय अन्य व्यक्ती, व्यक्ती समूह, संस्था, सरकार किंवा इतरांचे जे काही इतर अधिकार असतील ते या सदरात दाखवयाचे आहेत. यामध्ये खालील प्रकारच्या नोंदी प्रामुख्याने ठेवायच्या आहेत.

जमिनीमध्ये भोगवटा नसलेल्या पण हक्क असलेल्या सहहिस्सेदारांची नावे, उदाहरणार्थ मूळ मयत खातेदाराचे वारस ४ भाऊ व ३ बहिणी आहेत, यांपैकी २ भाऊ व एका बहिणीचा प्रत्यक्ष भोगवटा जमिनीवर आहे, तर या तिघांची नावे भोगवटादार सदरात दर्शवायची आहेत आणि राहिलेले २ भाऊ व २ बहिणी ज्यांचा या जमिनीवर सहहिस्सेदार म्हणून हक्क आहे; पण ते अन्य कारणांमुळे (परगावी, परदेशात वास्तव्य, दुसरा अकृषी व्यवसाय वगैरे) जमीन भोगवटा प्रत्यक्ष करत नसल्याने त्यांची नावे इतर अधिकार सदरात दाखवायची आहेत व त्याखाली फेरफार नोंद क्रमांक कंसात किंवा गोलात दाखवायचा आहे.

राष्ट्रीय बँक, सहकारी बँक, सहकारी संस्था वगैरेंनी केलेली पतपुरवठा रक्कम, सरकारने मंजूर केलेली तगाई रक्कम.

कुळकायद्याप्रमाणे जमीन विक्री झाली असेल, तर रक्कम फिटेपर्यंत विक्री रक्कम.

जमिनीतून पाणी घेण्याचा, जाण्या-येण्याचा किंवा अन्य सुविधाधिकार.वर नमूद केलेल्या प्रमुख नोंदींव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार या सक्षम महसूल अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या इतर बाबीही इतर हक्क सदरात तलाठ्याने नोंदवायच्या आहेत. इतर अधिकार सदरात फेरफार नोंद करूनच नोंद ठेवायची असते. भोगवटादार सदराप्रमाणेच इतर अधिकार सदरातही केलेल्या नोंदीच्या खाली कोणत्या फेरफाराने नोंद केलेली आहे, त्या फेरफार नोंदीचा क्रमांक गोलात किंवा कंसात दाखविला जातो.

काही अपवाद

फेरफार नोंदवहीमध्ये म्हणजेच गाव नमुना सहामध्ये नोंद न करता, इतर अधिकार या स्तंभामध्ये या नमुन्यात पुढील नोंदी खाली दर्शविल्याप्रमाणे शाईने किंवा पेन्सिलीने करण्यात येतात.

एक

जमीन महसुलाच्या किंवा तगाईच्या वसुलीसाठी आणलेल्या न्यायालयाच्या जप्ती किंवा जप्तीच्या नोटिस कब्जाचे हस्तांतर होईपर्यंत फेरफार ठरत नाहीत, याची दहा आठव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन विकास योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बाराच्या उताऱ्यावर इतर हक्क सदरात नोंद ठेवण्यात येते.

हक्क पत्रकातील नोंदीवर असलेले नियंत्रण

गाव नमुना सात हक्क पत्रकातील उजवी बाजू जमिनीची माहिती, मधली बाजू भोगवटादार आणि डावी बाजू इतर अधिकार या तिन्हींची माहिती आपण घेतली. त्यावरून असे आढळून येते, की भूमापन क्रमांक, हिस्सा क्रमांक, पोटखराब आणि कृषिक आकारणी यांसह असलेले क्षेत्र यामधील नोंदी व त्यामधील बदलांना जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेखा यांनी तयार केलेला आकारबंद, कमी-जास्ती पत्रक आणि आकारफोड पत्रक किंवा हिस्सा नमुना क्रमांक बारा यांचा आधार असतो. भूधारणा प्रकारामधील बदल शासनाच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा इतर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात. खाते क्रमांकामधील बदल तलाठ्याकडून दहा वर्षांतून एकदा म्हणजे गाव नमुना आठ-अ चे जेव्हा पुनर्लेखन करण्यात येते तेव्हा केला जातो. जमीन भोगवटादार किंवा कुळाचे नाव व इतर अधिकार यामधील बदल गाव नमुना सहामधील प्रमाणित नोंदीच्या आधारे करण्यात येतात; परंतु शेताचे स्थानिक नाव क्वचितच बदलते. कारण पिढ्यान् पिढ्या परंपरेने ते प्रचारात आलेले असते.

bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT