Property Agrowon
ॲग्रो विशेष

Property Division: वाटणी करण्याच्या विविध पद्धती

Property Partition Methods: हिंदू एकत्र कुटुंबाचे सदस्य मालमत्ता विभाजित करू शकतात किंवा एकत्र राहू शकतात आणि सामाईक मालमत्तेचा आनंद घेऊ शकतात. केवळ हिस्सा निश्चित केला तरी वाटणी होते, त्यामध्ये मालमत्तेचे प्रत्यक्ष विभाजन करण्याची आवश्यकता नाही. परंतु वाटणी झाली की हिंदू ‘एकत्र कुटुंब’ ही संकल्पना संपुष्टात येते. सहदायक एकमेकांपासून स्वतंत्र होतात.

Team Agrowon

Joint Family Property: हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार, मालमत्तेचे विभाजन म्हणजे जेव्हा हिंदू एकत्रित कुटुंबाचे सदस्य, संयुक्त कुटुंबाची मालमत्ता समान वाटून घेतील किंवा सदर मालमत्ता हस्तांतरित करण्याबाबत मृत्युपत्र लिहिले असेल तर त्यानुसार विभाजन केले जाईल. हिंदू एकत्रित कुटुंबाचे सदस्यांना संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा मिळविण्याचा जन्मतः अधिकार आहे.

विभाजन यास वाटणी हा शब्द सर्वश्रुत आहे. वाटणी म्हणजे सर्व सहदायकांचा हिस्सा निश्चित करणे आणि व तो पृथक करणे. यामध्ये मालमत्तेचे प्रत्यक्ष हिश्शानुसार विभाजन होत असते. मालमत्तेचे प्रत्यक्ष विभाजन करताना निश्चित असा हिस्सा आणि तो सीमांकनानुसार विभक्तीकरण करणे आवश्यक नाही. एकदा हिस्सा निश्चित करून पृथक/ स्वतंत्र केले की, विभाजन पूर्ण होते आणि त्यानंतर हिंदू एकत्र कुटुंबाचे सदस्य मालमत्ता विभाजित करू शकतात किंवा एकत्र राहू शकतात आणि सामाईक मालमत्तेचा आनंद घेऊ शकतात. केवळ हिस्सा निश्चित केला तरी वाटणी होते, त्यामध्ये मालमत्तेचे प्रत्यक्ष विभाजन करण्याची आवश्यकता नाही. परंतु वाटणी झाली की हिंदू ‘एकत्र कुटुंब’ ही संकल्पना संपुष्टात येते. सहदायक एकमेकांपासून स्वतंत्र होतात. वाटणीचे वेगवेगळे प्रकार आहेत.

वर्तनाद्वारे वाटणी (By Conduct)

वाटणीचा हा दुसरा प्रकार आहे. वरील ठरावानुसार वाटणी या प्रकारात आपण पहिले आहे की, वाटणीपत्रा नुसार संयुक्त मालमत्तेची वाटणी होत असते. परंतु प्रत्येक संयुक्त कुटुंबात आपापसांत सर्व संमतीने वाटणी होत नाही. त्यामुळे वाटणी पत्र न करता देखील एखादा सहदायक आपल्या कुटुंबातील इतर सहदायकांशी पटत नसल्याने वेगळी चूल मांडतो, स्वतंत्र राहतो. अशा सहदायकास घरातील कर्ता त्याचा हिस्सा खाण्यासाठी देतो. मात्र या प्रकारात लिखित स्वरूपात कोणताही दस्त केला जात नाही. हा प्रकार एका सहदायकाच्या बाबतीत किंवा सर्व सहदायकांच्या बाबतीत घडू शकतो.

या प्रकारची वाटणी म्हणजे तोंडी कराराने केलेली वाटणी होय. काही बाबतीत एका संयुक्त कुटुंबाची मालमत्ता एकापेक्षा अनेक ठिकाणी असू शकते. तसेच मालमत्ता वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात, जसे की, दुकाने, घर जागा, इमारत, उद्योग, इत्यादी. अशा प्रकारात परस्पर संमतीने सहदायक वरील मालमत्तेचा वापर करीत असतात आणि तीच त्यांची वाटणी समजली जाते. त्यास कोणाचाही आक्षेप नसेल तर त्यास वर्तवणुकीद्वारे वाटणी म्हणता येईल.

मध्यस्थीद्वारे वाटणी (Arbitration)

हा वाटणीचा तिसरा प्रकार आहे. वरील दोन्ही प्रकारानुसार जर एखाद्या कुटुंबातील मालमत्तेची वाटणी होत नसेल म्हणजेच सहदायकामध्ये एकमत होत नसेल आणि प्रत्येक सदस्य अमुक एक ठरावीक मालमत्ता मलाच द्यावी असा हट्ट धरत असेल, तर अशा वेळी त्या कुटुंबातील वाटणीचा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक केली जाते. असा मध्यस्थ हा शक्यतो त्या कुटुंबाचा कोणीतरी नातेवाईक असतो. जसे की, मामा, काका, जावई, व्याही, इत्यादी.

अशा नातेवाइकांचा त्या कुटुंबावर एक प्रकारचा प्रभाव असतो आणि अशा नातेवाईकाच्या शब्दास मान असतो. सर्व सहदायक त्याने केलेल्या वाटणीला संमती देतात. तसेच असा मध्यस्थ गावातील एखादा प्रतिष्ठीत व्यक्ती जसे की, सरपंच, पोलिस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष किंवा इतर कोणी असू शकतो. त्याच बरोबर सर्व सहदायकांच्या संमतीने एखादा कायदेतज्ज्ञ (Sole Arbitrator) असा व्यक्ती मध्यस्थ म्हणून नेमला जाऊ शकतो.

सूचनेद्वारे वाटणी (By Notice)

हा वाटणीचा चौथा प्रकार आहे. या प्रकारामध्ये एखादा सहदायक विभाजनाची सूचना सामान्यतः हिंदू संयुक्त कुटुंबातील कर्त्याला देतो, जो मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे. यासोबत इतर सहभागधारकांनाही सूचना दिल्या जाऊ शकतात.

विभाजनासाठी फक्त सहदायक वेगळे होण्याचा हेतू असणे आवश्यक आहे, ज्यामुळे हिस्से वेगळे करण्याचा हेतू स्पष्ट होतो. विभाजनाची सूचना देणे म्हणजे विभाजनाच्या अधिकाराचा एकतर्फी वापर करणे होय.

मृत्युपत्राद्वारे विभाजन

हा वाटणीचा पाचवा प्रकार आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ लागू होण्यापूर्वी, संयुक्त कुटुंब मालमत्तेतील सहदायकांचा अविभाजित हितसंबंध त्याच्या मृत्यूनंतर उत्तरजीवीत्त्वाच्या नियमानुसार विभागला जात असे. म्हणून, सहदायक त्याच्या सहदायक म्हणून असलेल्या हितसंबंधांसाठी प्रभावी मृत्युपत्र करू शकत नव्हता. परंतु, हिंदू उत्तराधिकार कायदा,१९५६ च्या कलम ३० मध्ये सहदायकाला संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेतील त्याच्या हिताचे मृत्युपत्रा अन्वये विल्हेवाट लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हा अधिकार विभक्ततेसाठी देखील वापरला जाऊ शकतो. म्हणून, सहदायक संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेपासून त्याचे हिस्सा वेगळे करण्यासाठी आणि रुग्णालय, शाळा, इतर कोणत्याही व्यक्ती, इत्यादींना दान करण्यासाठी वैध मृत्युपत्र करू शकतो.

धर्मांतराद्वारे वाटणी (By Conversion)

हा वाटणीचा सहावा प्रकार आहे. यात हिंदू एकत्रित कुटुंबाच्या सदस्याने इस्लाम, ख्रिश्चन धर्म इत्यादी सारख्या दुसऱ्या धर्मात धर्मांतर केले तर त्या सदस्याचा सहदायक म्हणून असलेला दर्जा इतर हिंदू एकत्रित कुटुंबाच्या सदस्यापासून आपोआप वेगळा होतो व विभाजन होते.

धर्मांतराच्या तारखेपासून, सदर धर्मांतरित सहदायकाचे ‘हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्य’ म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. त्याचा सहदायक म्हणून हिस्सा मिळविण्याचा हक्क गमावतो,परंतु त्याला त्याच्या धर्मांतराच्या तारखेला होता तसा संयुक्त कुटुंब मालमत्तेत वाटा मिळण्याचा अधिकार आहे.

संयुक्त कुटुंबातील सदस्य म्हणून त्याच्या धर्मांतरामुळे संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेतील त्याचा हितसंबंध तो गमावत नाही. या प्रकारे देखील वाटणी होते.

विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह

हा वाटणीचा सातवा प्रकार आहे. विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत एखाद्या सहदायकाचा गैर-हिंदूशी विवाह झाले तर ते दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्यासारखाच परिणाम देतो. सदर सहदायकाचा गैर-हिंदूशी लग्नाच्या तारखेपासून तो सहदायक आपोआप त्याचा ‘हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्य’ म्हणून दर्जा गमावतो. तो सहदायक म्हणून राहण्याचा मार्ग सोडतो, परंतु लग्नाच्या तारखेला संयुक्त कुटुंब मालमत्तेतील त्याचा वाटणी हिस्सा मिळण्याचा त्याला अधिकार आहे.

विभाजनासाठी दावा दाखल करून वाटणी (Suit For Partition)

हा वाटणीचा आठवा प्रकार आहे. वरील वाटणीचे प्रकार क्र.१ ते ३ मध्ये उल्लेखित प्रमाणे जर एखाद्या संयुक्त कुटुंबाची मालमत्तेची वाटणी नाही झाली आणि एखाद्या सहदायकास संयुक्त कुटुंबात राहायचे नसेल तर त्याला त्याच्या मालमत्तेतील हिस्सा मागण्यासाठी नाइलाजास्तव दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. - वाटणीच्या एखाद्या सह सहदायकाने हिंदू एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमधील त्याचा हिस्सा मिळण्यासाठी/विभाजनासाठी दावा दाखल केला तर सदरील दावा हा त्याचा वेगळे होण्याच्या हेतूचा स्पष्ट संकेत आहे आणि न्यायालयामार्फत ‘संयुक्त कुटुंबाचा दर्जा’ तोडून त्या सहदायकास त्याचा स्वतंत्र हिस्सा दिला जातो. न्यायालय वाटणीच्या या प्रकारातील प्रभावासाठी हुकूमनामा जारी करून विभाजन लागू करते. यासाठी अल्पवयीन आणि प्रौढ सहदायक दोघेही न्यायालयात जाऊ शकतात.

हिस्सा सोडून देऊन वाटणी (Renunciation)

हा वाटणीचा नववा प्रकार आहे. एखाद्या सहदायकाने हिंदू एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमधील त्याचा हिस्सा सोडल्याने विभाजन होऊ शकते. असा त्याग इतर सर्व सहभागधारकांच्या बाजूने आणि तो संपूर्ण संयुक्त मालमत्तेशी संबंधित असावा. त्याचा संयुक्त मालमत्तेच्या विभाजनाच्यावेळी हिश्शामध्ये बदल होतात, कारण सदर हिस्सा सोडलेल्या सदस्याचा त्याने सोडून दिलेल्या हिस्सा त्याच्या इच्छेनुसार एका सहदायकास किंवा एकापेक्षा जास्त सहदायकास मिळतो.

एका सहदायकाने दुसऱ्याला हिश्‍शाची विक्री

जेव्हा एक सहभागधारक दुसऱ्या सहदायकाला, त्याचा संयुक्त मालमत्तेतील आपला हिस्सा विक्री करतो, तेव्हा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचे विभाजन होते. अशाप्रकारे हिंदू एकत्रित कुटुंबाची मिळकत सर्व सहदायकांमध्ये वरीलप्रमाणे उल्लेखित कोणत्याही एका प्रकाराने वाटून घेता येईल.

मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम ४४ नुसार सहदायकाकडून मालमत्तेच्या हस्तांतरणाचे नियमन करण्यासाठी केलेले आहे. यानुसार एका सहदायकाला इतर सहदायकांच्या संमतीशिवाय मालमत्तेतील त्यांचा हिस्सा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्याची परवानगी देते. तथापि, नवीन हस्तांतरणकर्त्याचे हक्क इतर सहदायकांच्या विद्यमान अधिकारांएवढेच असते.

bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT