
Property Distribution:
भीमाशंकर बेरुळे
हिंदू एकत्रित कुटुंबाची मालमत्ता विभाजित करणे म्हणजे वाटणी होय. पूर्वीच्या काळी वाटणीच्या हक्कासाठी कायदा नव्हता. घरातील मोठी मंडळी, गावातील पंच वाटणी करायचे. यात सर्वांना समान वाटणी मिळत नव्हती. हक्क डावलले जात होते. आजच्या काळात वाटणीसाठी न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागितल्यास कायद्याने दिलेल्या वारसा आणि अन्य हक्कानुसार जमिनीची वाटणी मिळते. त्यात अन्याय होत नाही. वाटणीच्या कायद्यांची चर्चा आपण करत आहोत.
प्रत्येक कुटुंबाला वाटणीच्या दुःखदायक व क्लेशदायक घटनांतून जावे लागते. केवळ जमिनीच्या नव्हे तर मनाच्या वाटण्या होत आहेत, अशी भावना होते. त्याचा मानसिक त्रास सर्वांनाच भोगावा लागतो. कर्त्या व्यक्तीला घर विभक्त होऊ नये, असे वाटते. विभक्त झाल्यास एकीचे बळ कमी होईल, अशी त्याची धारणा असते. परंतु कुटुंबांतील सदस्यांचे पटत नसल्याने शेवटी वाटणीला सामोरे जावे लागते.
भावांतील मतभेद, महिलांचे न पटणे, गैरसमज अशी एक ना अनेक कारणे वाटणीसाठी कारणीभूत ठरतात. काही घटनांमध्ये कुटुंबांचा कर्ता व काही सदस्य मनमानी करुन वाटणीत जास्त हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करतात. या परिस्थितीत समान वाटणी व हक्कासाठी कायदा नेमका काय सांगतो, त्यात काय तरतुदी आहेत, हे माहिती करून घेऊयात.
हिंदू कायद्यानुसार, सहधारकाची संकल्पना ही संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचा एक अविभाज्य पैलू आहे. प्रत्येक हिंदू एकत्रित कुटुंबाच्या प्रत्येक सहधारकाला संयुक्त हिंदू कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा असतो. पूर्वी विवाहित मुलींना हिंदू एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळत नव्हता, मात्र कायद्यातील २००५ च्या सुधारणेनुसार प्रत्येक सहदयकांना (विवाहित मुलीसह) संयुक्त मिळकतीमध्ये समान हिस्सा मिळतो. संयुक्त हिंदू कुटुंबाच्या मालमत्तेची वाटणी झाल्यास त्याची संयुक्त कुटुंब म्हणून अस्तित्व संपुष्टात येते.
समान पूर्वज आणि कोणत्याही पिढीपर्यंतचे त्याचे सर्व वंशज, तसेच एका पूर्वजांच्या पती/पत्नी (विधवा) आणि वंशजांच्या अविवाहित मुली, हे हिंदू संयुक्त कुटुंबाचे सदस्य होय.
एकत्र कुटुंब कर्ता हा हिंदू संयुक्त कुटुंबातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. शक्यतो कर्ता हा कुटुंबातील सर्वात वयस्कर पुरुष सदस्य असतो. कोणत्याही कारणामुळे जर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ किंवा वयस्कर पुरुष कर्ता म्हणून आपली जबाबदारी पाळण्यास असमर्थ असेल/अपात्र असेल तर त्याच्या ऐवजी कुटुंबातील इतर सदस्य देखील एकत्र कुटुंब कर्ता म्हणून काम करू शकतो.
हिंदू संयुक्त कुटुंबाची वैध वाटणी होण्यासाठी आवश्यक असलेल्या वाटणीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी व त्यासंबंधित कायदेशीर तरतुदींवर प्रकाश टाकणे हा या भागाचा मुख्य उद्देश आहे. हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रत्येक सह-धारकाला हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये त्याचा अविभक्त हिस्सा मागण्याचा अधिकार असतो.
वाटणी करणे म्हणजे काय? वाटणी मागण्याचा अधिकार कोणाला?
वाटणी करणे म्हणजे एकत्रित कुटुंबाच्या सर्व संपत्तीचे (चल-अचल) सर्व सदस्यांमध्ये सरस-निरस मानाने सीमांकन करून (Meets & Bounds) हिस्से करणे, विभाजन/वाटणी करताना प्रत्येक सदस्याचा वाटा सुनिश्चित केला जातो.
कोणत्या संपत्तीची वाटणी करता येत नाही?
साधारणतः हिंदू एकत्रित कुटुंबाच्या संपूर्ण चल-अचल मिळकतींची वाटणी करता येते, परंतु यास काही अपवाद देखील आहेत. त्यामुळे काही मिळकती अशा आहेत ज्याची वाटणी करता येत नाही. अशा मालमत्ता पुढील प्रमाणे आहेत.
घराचा जाण्या-येण्याचा मार्ग (एकच असल्यास)
सहदायकांमध्ये सर्व संपत्तीची वाटणी झाल्यास सर्व सहदायकांना त्यांचा हिस्सा प्राप्त होतो. वाटणीमध्ये वडिलोपार्जित घराचे देखील विभाजन केले जाते. सहदायकांना मिळणाऱ्या घरातील व शेतीतील हिस्से रस्ता ही अत्यंत आवश्यक बाब आहे, म्हणून वाटणीमध्ये हिस्सेधारकांना वापरासाठी सामाईक रस्ता सोडला जातो.
एखाद्या घरास एक जिना/पायऱ्या असतील आणि सदर घराच्या वाटण्या झाल्या तर अशा सामाईक पायऱ्यांची वाटणी करता येत नाही. पायऱ्यांचे विभाजन करता येत नाही. कारण या पायऱ्या सर्व सहदायकांना वापरण्यासाठी सोडलेल्या असतात. हे घटक सामाईक असतात, म्हणून रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेची वाटणी करता येत नाही. सदरचा मार्ग हा कायम सामाईक राहतो, मग तो रस्ता घरासाठी सोडलेला असो किंवा शेतीसाठी.
पाण्याची विहीर
एकत्रित कुटुंब असताना पाण्याची विहीर खोदलेली असते. त्या विहिरीतून सर्व जमिनीला सिंचनाची व्यवस्था केलेली असते. जेव्हा वाटणी केली जाते, तेव्हा सदरील विहीर असलेली मालमत्ता कोणत्या तरी एका सदस्याच्या वाटणी हिश्यामध्ये येते. ज्याच्या हिश्यामध्ये सदरील विहीर येते, तो सदस्य विहिरीवर एकटा हक्क सांगू शकत नाही. कारण त्या वाटणीनंतर देखील सदर विहिरीतील पाणी घेण्याचा अधिकार सर्व सहदायकांना असतो. विहिरीतील पाण्यामध्ये वाटणीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व सहदायकांचा अविभक्त हिस्सा असल्याने विहिरीची वाटणी करता येत नाही.
घरातील मंदिर आणि देवी,देवतांच्या मूर्ती
एकत्र कुटुंबामध्ये पूजा अर्चना करण्यासाठी एखादे मंदिर बांधलेले असेल आणि त्या मंदिरामध्ये देवी देवतांची मूर्ती असेल, तर वाटणी करतेवेळी अशा मंदिराची किंवा आतील देवतांची वाटणी करता येत नाही. कारण सर्व सदस्यांच्या श्रद्धेचे ते ठिकाण असते.
उदा. एखाद्या मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्मिणी, राधा-कृष्ण, राम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती असतात. वाटणीमध्ये एका सदस्यास एका देवतेची मूर्ती व दुसऱ्यास सदस्यास दुसऱ्या देवतेची मूर्ती अशी वाटणी करता येत नाही. त्यामुळे घरातील मंदिर व देवी-देवतांच्या मूर्तीची वाटणी करता येत नाही.
स्वकष्टार्जित मालमत्ता
जर एकत्र हिंदू कुटुंबामध्ये एका सदस्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाने एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, तर ती त्याची स्वतःची मालमत्ता समजली जाते. सदर मालमत्ता हिंदू एकत्रित कुटुंबाच्या वाटणीमध्ये समाविष्ट करून ती विभाजित करता येत नाही.
उदा. एखादा एकत्रित हिंदू कुटुंबातील सदस्याने स्वतः नोकरी/व्यवसाय/व्यापार करून जर एखादी मालमत्ता संपादित केली असेल आणि अशी मालमत्ता संपादित करताना एकत्र हिंदू एकत्रित कुटुंबातील उत्पन्न वापरले नसेल तर अशी मालमत्ता ही त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता होईल. सदरची मालमत्ता ही त्याची स्वतःची मालमत्ता असल्यामुळे संयुक्त कुटुंबाच्या वाटणी होत असताना स्वकष्टार्जित मालमत्तेची वाटणी करता नाही. परंतु एखाद्या सदस्याने आपली स्वकष्टार्जित मालमत्ता ही संयुक्त कुटुंबाची म्हणून वाटणी वेळेस जाहीर(declaration) केली तर मात्र स्वकष्टार्जित मालमत्तेची देखील एकत्रित कुटुंबाची मालमत्ता म्हणून इतर सहदायकांसोबत वाटणी होऊ शकते. त्यात सर्वाना हिस्सा मिळेल.
रूढी परंपरेनुसार प्राप्त वारसा
एखाद्या प्रथेनुसार कुटुंबातील प्रथम जन्मलेल्यास समाज व सामाजिक उत्सवात मान मिळतो, यास प्रिमोजेनिचर (Primogeniture) असे म्हणतात. उदा.सण-उत्सव, मिरवणुका, उरूस, पूजा-अर्चा, इत्यादी. परंपरेने एखाद्या सदस्यास बैल पोळ्यास तोरण तोडण्याचा मान, नवरात्रीस देवीच्या मिरवणुकीचा मान असतो. अशा मानाची वाटणी करता येत नाही. म्हणजेच एकच बहुमान अनेक सदस्यास विभागून देता येत नाही. त्यामुळे त्याची वाटणी करता येत नाही.
भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ द्वारे व विशेष विवाह कायदा १९५४ द्वारे विनियमित होणारी कोणतीही मालमत्ता (Any property whose succession is regulated by the Indian Succession Act १९२५, by reason of special Marriage Act, १९५४)
वर उल्लेखित सहा मालमत्ता वगळता हिंदू एकत्रित कुटुंबाच्या संपूर्ण सर्व चल-अचल मालमत्तेची वाटणी करता येईल. एखादा सदस्य त्यास विरोध करीत असेल तर त्याच्या हक्काची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करून घेता येईल. त्यामुळे आपण पुढील भागात वाटणी मागण्याचा हक्क कोणास आहे,वाटणी हिस्सा कोणास किती प्रमाणात मिळतो याची प्रक्रिया पाहणार आहोत.
: bvberule@gmail.com (लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.