Property Right: मालमत्तेमध्ये वाटणी मागण्याचा हक्क

Legal share in Family Property: मागील लेखामध्ये आपण हिंदू एकत्र कुटुंबामध्ये कोणकोणत्या मालमत्तेची वाटणी करता येत नाही, याची माहिती घेतली. आजच्या भागात आपण हिंदू एकत्रित कुटुंबातील कोणकोणत्या सदस्यास वडिलोपार्जित आणि एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार आहे, याची माहिती घेत आहोत.
Property Right
Property RightAgrowon
Published on
Updated on

भीमाशंकर बेरुळे

Right of Heirs to Joint Family Property: वाटणी करणे म्हणजे एकत्रित कुटुंबाच्या सर्व संपत्तीचे चल-अचल मालमत्तेचे विभाजन करणे. प्रत्येक सदस्यास त्यांचा वाटणी हिस्सा देणे. सदर विभाजन/वाटणी करताना प्रत्येक सदस्याचा कायदेनिहित ठरावीक वाटा सुनिश्‍चित केला जातो. एकत्रित कुटुंबाच्या सर्व चल-अचल संपत्तीचे विभाजन करता येते. खालील व्यक्तींना वाटणी मागायचा अधिकार आहे.

वडील

सामान्यतः वडील म्हणजे घरातील कर्ता व सर्वांत ज्येष्ठ पुरुष होय. आपली संस्कृती ही पुरुष प्रधान असून, यामध्ये वडिलांना फार महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. अलीकडच्या काळात वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरण, ओस पडत असलेली खेडी यामुळे समाज व्यवस्था विस्कळीत होत आहे. या प्रवाहात कुटुंब व वडीलधाऱ्या मंडळीचा दबदबा जसा जसा कमी होत आहे, त्या प्रमाणात कुटुंब विभाजनाचे प्रमाण देखील वाढले आहे.

वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, त्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते. अशावेळी वडील हे त्यांच्या वडिलोपार्जित व एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे विभाजन करून मागू शकतात. तसा त्यांना कायदेशीर हक्क आहे. सदर वाटणीमध्ये त्यांचा हिस्सा घेण्याचा व तो त्यांचा इच्छेनुसार विल्हेवाट लावण्याचा किंवा त्यांचा सांभाळ करणाऱ्या एका मुलास, किंवा मुलाच्या नातवास, किंवा कालपरत्वे विक्री करण्याचा अधिकार आहे.

Property Right
Property Rights: मिळकतीमध्ये समान वाटणी, हक्कासाठी कायदा

त्या वेळी इतर सदस्यांचे सदर क्षेत्रावरील हक्क वडिलांच्या हयातीपर्यंत कायमचे संपुष्टात येतात. वडील हयात असेपर्यंत ते त्यांच्या वाटणी हिश्शाचे स्वतंत्र मालक होतात. जर वडिलांनी त्यांच्या हयातीत त्यांना प्राप्त वाटणी हिश्‍शाची विल्हेवाट न लावता ते मयत झाले तर त्यांच्यापश्‍चात वडिलांच्या वाटणी हिस्से आलेल्या मालमत्तेची पुन्हा त्यांच्या वारसांमध्ये कायद्यानुसार ठरलेल्या प्रमाणात विभाजन होईल. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील सदस्यांच्या संमतीशिवाय एकत्रित कुटुंबातील मालमत्तेमधील त्यांचा हिस्सा मागण्याचा अधिकार आहे.

मुलगा

आपण यापूर्वीच्या लेखात पहिले, की चार पिढ्यांपर्यंत सहदायकांची साखळी असते. एकत्रित कुटुंबातील प्रत्येक सदस्यास सहदायक असे संबोधले आहे. त्यामुळे सर्व मुले, मुलांची मुले, मुलांच्या मुलांची मुले हे सहदायक होत असून, या सर्वांना म्हणजेच मुलगा, मुलाचा मुलगा (नातू), मुलाच्या मुलाचा मुलगा (पणतू) एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमधील त्याचा वाटणी हिस्सा मागण्याचा अधिकार आहे.

वाटणी झाल्यानंतर जन्माला येणारा मुलगा

पूर्वीच्या काळी आजच्या तुलनेत वैद्यकीय सुविधेचा अभाव आणि बहुपत्नीकत्व यामुळे देखील बऱ्याच वेळा एकत्रित कुटुंबाची वाटणी होत असे. त्यानंतर एखादे मूल किंवा मुले जन्माला येत असत. आता परिस्थिती अशी, की सदर मूल जन्माला येण्यापूर्वीच एकत्रित कुटुंबाची वाटणी झालेली आहे.

मूल जन्मल्यानंतर त्यास वाटणी हिस्सा देण्यासाठी क्षेत्र शिल्लक नसे. अशा वेळी वाटणीनंतर जन्मलेल्या मुलास देखील वाटणी होऊन त्याचा हिस्सा मिळवण्याचा अधिकार आहे. त्या वेळी झालेली वाटणी रद्दबातल होऊन परत वाटणी होते, त्यास वाटणी उघडणे म्हणतात. त्याबद्दल सखोल माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत.

Property Right
Property Matters : मालमत्तेविषयी हवा निकोप दृष्टिकोन

वाटणीच्या वेळी मातेच्या उदरात असणारा आणि वाटणीनंतर जन्माला येणारा पुत्र

मूलतः एकत्रित कुटुंबाच्या सर्व चल-अचल संपत्तीमध्ये सर्व सहदायकांचा जन्मतः हिस्सा असतो. गर्भधारणा म्हणजेच मुलाचा जन्म असे होत असून, वाटणीवेळी एकत्रित कुटुंबाच्या कर्त्याची पत्नी गर्भवती असेल, तर सदर गर्भधारणा कालावधीपर्यंत वाटणी करू नये किंवा जर वाटणी झालीच तर गर्भातील मुलाचा/मुलीचा देखील हिस्सा ठेवण्यात यावा अशी कायद्याने अपेक्षित आहे. परंतु काही सहदायक यास बागल देत वाटणी करून घेतात. सदर गर्भातील मुलाचा/मुलीचा हिस्सा काढून ठेवत नाहीत. त्यामुळे वाटणी झाल्यानंतर मूल जन्मास आलेल्या मुलास/मुलीस देखील वाटणी सर्व मालमत्तेत त्याचा हिस्सा मागण्याचा अधिकार आहे.

दत्तक पुत्र

मूल न होणाऱ्या दांपत्यांना मूल दत्तक घेणे ही एक कायदेशीर तरतूद आहे. कारण एखाद्या दांपत्यास कोणत्याही कारणास्तव मूल होत नसेल तर त्याचे वृद्धापकाळातील जीवन हे हलाखीचे होते. यासाठी मूल होत नसलेले दांपत्य एखादे मूल दत्तक घेतात, त्याचा सांभाळ करतात. परंतु सदर दांपत्यास जर पुढे चालून मूल झाले, तर दत्तक पुत्र वंचित राहू नये म्हणून, दत्तक पुत्रास देखील स्वतःच्या पोटी जन्मलेल्या मुलाएवढेच समान हक्क आहेत. त्यास वाटणीमध्ये समान हिस्सा मागण्याचा व मिळविण्याचा अधिकार आहे.

अवयस्क सदस्य

जर परिवाराची वाटणी होत असेल आणि सदर वाटणीवेळी एखादा सदस्य अज्ञान असेल, तर त्याला देखील सदर वाटणीमध्ये इतर सदस्यांएवढाच समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे. वाटणीमध्ये जर सदर अज्ञान सदस्यास वाटणी दिली नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर त्याचा वाटणी हिस्सा मिळवू शकतो. त्यास सदर वाटणी रदबातल करून नव्याने वाटणी मागण्याचा अधिकार आहे.

Property Right
Property Deal : घरकुलांबाबतचा व्यवहार करा जपूनच

वाटणीच्यावेळी अनुपस्थित सदस्य

हिंदू एकत्रित कुटुंबातील कोणत्याही सदस्याने वाटणी करून त्याचा हिस्सा मागणी केली तर सर्व सदस्यांमध्ये वाटणी होऊन सर्वांना हिस्सा देणे अपेक्षित आहे. परंतु काही वेळा वाटणी होत असताना एखादा सदस्य हा बाहेरगावी असतो, लष्करीसेवेमध्ये असतो, किंवा तीर्थयात्रेस गेलेला असतो, किंवा एखादा सदस्य त्याच्या कोणत्याही वैद्यकीय कारणास्तव वाटणी घेण्यास उपलब्ध नसेल, फरार असेल, घर सोडून निघून गेलेला असेल, तर त्याचा वाटणी हिस्सा न देता किंवा न काढून ठेवता, इतर सदस्य आपापसांत वाटणी करून घेतात. त्यानंतर सदर गैरहजर सदस्य परत आला किंवा त्यांची वैद्यकीय असमर्थता दूर झाली तर सदर सदस्यास वाटणी झालेली वाटणी रद्दबातल करून नव्याने वाटणी मागण्याचा आणि त्याचा हिस्सा मिळविण्याचा अधिकार आहे.

एकत्रित संपत्तीमध्ये काही हिस्सा विकत घेतलेली व्यक्ती

जर एखाद्या सहदायकाने त्याचा अविभक्त हिस्सा वाटणीपूर्वीच विक्री केला तर अशा खरेदीदारास एकत्रित कुटुंबाची वाटणी होत असताना त्याच्या विक्रेत्याच्या वाट्यास येणारा हिस्सा घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्यास वाटणी करून त्याच्या विक्रेत्यातर्फे वाटणी मागण्याचा अधिकार नाही.

वाटणीत हिस्सा घेण्याचा अधिकार

हिंदू सहदाकांना जन्मतःच हिस्सा मिळतो, वाटणीमुळे त्याचे विभाजन होते. सदर एकत्रित कुटुंबातील सदस्यांना वाटणी मागण्याचा अधिकार आहे, तसा स्वतःहून वाटणी मागण्याचा अधिकार काही सदस्यांना नाही, परंतु इतर कोणा सदस्याच्या मागणीमुळे वाटणी होत असेल तरच खालील व्यक्तींना वाटणी हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे.

आई

जर पती आणि मुलांमध्ये वाटणी होत असेल तर आईला मुलाएवढाच हिस्सा मिळू शकतो. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त पत्नी असतील, तर प्रथम लग्न झालेल्या पत्नीस वाटणीमध्ये हिस्सा मिळतो, परंतु दुसऱ्या पत्नीस मिताक्षरा संकल्पनेत हिस्सा मिळत नाहीत, तर दयाभागा संकल्पनेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त पत्नींना मुलाएवढाच समान हिस्सा मिळतो.

विधवा आई

विधवा आईस स्वतःहून वाटणी मागण्याचा अधिकार नाही, परंतु जर वाटणी होत असेल तर विधवा आईस तिच्या मुलाएवढाच हिस्सा मागण्याचा अधिकार आहे.

सावत्र आई

सावत्र आईस देखील स्वतःहून वाटणी वाटणी मागण्याचा अधिकार नाही, परंतु जर वाटणी होत असेल तर विधवा आईस तिच्या मुलाएवढाच हिस्सा मागण्याचा अधिकार आहे.

आजी

जर मुलाच्या मुलांमध्ये किंवा मयत मुलाच्या मुलांमध्ये वाटणी होत असेल, तर मिताक्षरा संकल्पनेनुसार वडिलांच्या आईस (आजी) देखील वाटणीत हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे.

मुलाची विधवा

मयत सहदायकाच्या विधवा पत्नीस एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वाटणी मागण्याचा अधिकार नाही, परंतु वाटणी होत असेल तर तिला सदर वाटणीमध्ये हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे.

मुलगी

पूर्वी मुलीला वाटणी करून तिचा पृथ्थक हिस्सा मागण्याचा अधिकार नव्हता, परंतु २००५ च्या कायद्यातील दुरुस्तीनंतर मुलीला स्वतःहून वाटणी मागण्याचा आणि मुलाइतकाच समान वाटणी हिस्सा मिळवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

bvberule@gmail.com (लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com